
भुज: मुंबईच्या(mumbai) एका हॉटेलमध्ये रविवारी हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत एनआयआर किशन हलाई आणि त्याची भावी पत्नी २५ वर्षीय रुपाली वेकारिया यांचा मृत्यू झाला. किशन आणि रूपाली यांचे लग्न होणार होते. त्यासाठी ते मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र नशिबाला हे मान्य नव्हते. आगीच्या या दुर्घटनेत हलाई आणि वेकारिया यांच्यासह तीन लोकांचा मृत्यू झाला.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मांडवी तालुक्याच्या रूपनगर गावाचे सरपंच सुरेश कारा यांनी दिलेल्या माहितीनुसार हलाई, रूपल, त्यांची आई आणि बहीण सांताक्रुझ येथील चार मजल्याच्या गॅलॅक्सी हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांच्या विमानाच्या उड्डाणाच्या वेळेत बदल झाल्याने त्यांची व्यवस्था या हॉटेलमध्ये करण्यात आली होती.
रविवारी दुपारी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. या आगीत किशन हलाई, रूपल वेकारिया आणि कांतिलाल वारा यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत रूपलची आई मंजुलाबेन, बहीण अल्पा आणि अस्लम शेख हे जखमी झाले.
काराने सांगितले की हलाई आणि त्याची भावी पत्नी रूपल वेकारिया अनेक वर्षांपासून नैरोबीला राहत होते. अनेक वर्षे परदेशात राहूनही ते आपल्या कुटुंबाशी जोडलेले होते. किशन आणि रूपल यांचा साखरपुडा झाला होता आणि नैरोबीला पोहोचल्यावर ते लग्न करणार होते. तेथे ते आपल्या आई-वडील तसेच बहीण-भावांसोबत राहत होते.
किशन, रूपल आणि त्यांचे कुटुंबीय किशनच्या छोट्या भावाच्या लग्नासाठी एक महिनाआधी भारतात आले होते. नैरोबीला जाण्यासाठी ते सगळे शनिवारी अहमदाबाद येथून मुंबईला पोहोचले. जेव्हा विमानाच्या उड्डाणाच्या वेळेत बदल झाला त्यामुळे विमान कंपनीने त्यांना सांताक्रुझ येथील हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था केली. या हॉटेलमध्ये रविवारी आग लागली.