‘करलो दुनिया मुठी में’, असे रिलायन्स समूहाचे एक ब्रीदवाक्य आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनसुद्धा आपल्या ध्येयचिकाटीने देशातील उद्योगक्षेत्रात स्वत:ची वेगळी छाप निर्माण करणाऱ्या रिलायन्स समूहाच्या तिसऱ्या पिढीकडे आता उद्योग व्यवसाय वाढविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. धीरूभाईंचे मोठे पुत्र मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या संचालक मंडळातून पायउतार होणार असल्याची माहिती देतानाच त्यांची मुले – ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांचा कंपनीच्या कार्यकारी संचालक मंडळात समावेश करण्यात आल्याची घोषणा केली. या खास क्षणी मुकेश अंबानी भावुक झाले होते. यावेळी त्यांना १९७७ मध्ये जेव्हा ते बोर्डात सामील झाले “त्या दिवसाची” आठवण झाली. जेव्हा माझ्या वडिलांनी मला रिलायन्सच्या संचालक मंडळात समाविष्ट केले होते, तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो. आज ईशा, आकाश आणि अनंतमध्ये मला, मी आणि माझे वडील दिसत आहेत. या सर्वांमध्ये मला धीरूभाईंची ज्योत दिसते. माझ्या तीन मुलांनी धीरूभाईंची मानसिकता आत्मसात केली आहे आणि धीरूभाईंच्या “उद्देश, तत्त्वज्ञान, उत्कटता आणि पायनियरिंग स्पिरिट”साठी ते वचनबद्ध आहेत, असे त्यांनी बोलून दाखवले.
धीरूभाई अंबानी यांनी आपल्या कष्टाने रिलायन्स उभी केली असली तरी मुकेश अंबानींच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. २००२ मध्ये उद्योगपती-वडील धीरूभाई अंबानी यांच्या आकस्मिक निधनानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सूत्रे हाती घेणारे मुकेश अंबानी यांना २१ वर्षे पूर्ण झाली आणि या काळात कंपनीच्या महसुलात वाढ झाली, तर नफा २० पटीने वाढला. आज रिलायन्स इंडस्ट्रीज केवळ पेट्रोलियमच्या जगातच नाही तर डिजिटल, मोबाइल, रिटेल आणि ग्रीन एनर्जीमध्येही आपले पाय पसरविले आहेत. त्याचे श्रेय मुकेश अंबानींना जाते. मुकेश अंबानी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने रिलायन्सचा व्यवसाय सतत वाढवला. टेलिकम्युनिकेशनसोबतच रिलायन्स जिओमार्टच्या माध्यमातून रिटेल व्यवसायात वेगाने वर्चस्व निर्माण केले. रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्मवर जगातील मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली असून रिलायन्स आज पूर्णपणे कर्जमुक्त कंपनी आहे.
मागील दोन दशकांमध्ये रिलायन्सने अनेक नवीन व्यवसाय सुरू केल्याचे आपल्या पाहण्यात येतात. ज्यात रिलायन्सने २०१६ मध्ये जिओ सुरू केला आणि दोन वर्षांत ती भारतातील टॉप तीन कंपन्यांपैकी एक बनली. मुकेश यांनी सूत्रे हाती घेतल्यावर रिलायन्सने २००६ मध्ये रिटेलमध्ये आणि २०२१ मध्ये नवीन ऊर्जा सुरू केली. रिलायन्स इंडस्ट्रीजने तेल शुद्धीकरणाची क्षमता दुप्पट केली आणि सर्वात वाईट कच्च्या तेलाचे निर्यातक्षम इंधनात रूपांतर करण्याची एक अद्वितीय क्षमता जोडली. यात जगातील काही सर्वात मोठी डाऊनस्ट्रीम युनिट्स देखील जोडली गेली. यादरम्यान रिलायन्सचा पेट्रोकेमिकल्सचा पारंपरिक व्यवसायही गेल्या दोन दशकांत अनेक पटींनी वाढला. याशिवाय त्यांच्या नेतृत्वाखाली फेसबुक, गुगल आणि बीपीसारख्या कंपन्यांनी रिलायन्समध्ये गुंतवणूक केली आहे. तेलापासून सुरुवात करून कंपनीने आजच्या काळात दूरसंचार आणि रिटेल क्षेत्रात प्रवेश केला आहे.
मुकेश अंबानी हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी डेटाला ‘न्यू-ऑइल’ म्हटले आहे. ते इंधन तुमच्या आयुष्यात किती प्रमाणात शिरले आहे, हे आज आपण सर्वजण पाहत आहोत. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स जिओने देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. जिओने डेटा क्षेत्रात मोठी क्रांती आणली असून पूर्वी २५० रुपये प्रति जीबी दराने मिळणारा डेटा आता १० रुपयांवर आला आहे. फक्त किंमतच कमी झाली नाही, तर डेटा वापरातही वाढ झाली आहे आणि यात जिओचे मोठे योगदान आहे. त्यामुळे देश-विदेशात मुकेश अंबानी यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही, असे वलय त्यांनी स्वत:च्या नावाभोवती केले आहे.
धीरूभाई अंबानी हयात असताना मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी या भावांमध्ये जीवापाड प्रेम होते. ६ जुलै २००२ रोजी धीरूभाईंचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर दोन्ही भावांमध्ये वाद सुरू झाला. त्याचे कारण धीरूभाई यांनी आपल्या मागे कोणतेही मृत्यूपत्र ठेवले नव्हते. मात्र आई कोकिलाबेन अंबानी यांनी दोन्ही भावांमध्ये व्यवसायाची वाटणी करून वाद मिटविला होता. संपत्ती वाटपात मोठा मुलगा मुकेशच्या पदरी पेट्रोकेमिकल्स, रिफायनिंग आणि टेक्स्टाईलसह तेल आणि वायू व्यवसाय आला, तर अनिल अंबानी यांना आर्थिक सेवा, ऊर्जा, मनोरंजन आणि दूरसंचार व्यवसायांची जबाबदारी देण्यात आली. मागील २१ वर्षांपासून मुकेश यशस्वीपणे रिलायन्सची सूत्रे सांभाळत आहेत.
मात्र जेव्हा वाटणी झाली, तेव्हा अधिक फायदेशीर असलेले व्यवसाय अनिल अंबानींना देण्यात आले होते. तरीही आज व्यावसायिक जगतात काहीतरी नवीन करण्याची जिद्द आणि कार्यक्षमता यामुळे मुकेश अंबानी यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. २०१६ पर्यंत अंबानी ३८व्या क्रमांकावर होते आणि गेल्या दहा वर्षांपासून फोर्ब्स मॅगझिनच्या यादीत त्यांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान मिळवले आहे. फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीत ते एकमात्र भारतीय उद्योजक आहेत. जानेवारी २०१८ पर्यंत, मुकेश अंबानी यांना फोर्ब्सने जगातील १८व्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान दिले. मालमत्तेवरून भविष्यात अंबानी परिवारात वाद होऊ नये यासाठी मुकेश अंबानी यांनी विशेष काळजी घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांनी कंपनीची सूत्रे तीन मुलांकडे सोपवली आहेत.