Friday, October 11, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखमोदींवर आरोप; देशाची बदनामी...

मोदींवर आरोप; देशाची बदनामी…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर

अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे अघोषित उमेदवार खासदार राहुल गांधी यांनी लडाखच्या भूमीवर चीनच्या सैन्याने ताबा घेतला असल्याचे भाष्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहेच. पण आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करीत आहोत याचे भानही त्यांचे सुटले आहे. राहुल गांधी मोदींवर आरोप करताना ते संयम बाळगत नाहीत. राहुल यांच्या आरोपाने भारतीय सैन्य दलाच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षा, एकता, अखंडता याला आपण छेद देणारे वक्तव्य करीत आहोत, याचाही त्यांना विसर पडलेला दिसतो. काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून पंतप्रधान मोदींना त्यांचा विरोध असणे समजू शकते. तो त्यांच्या राजकारणाचा भाग असू शकतो. पण मोदींना विरोध करताना देशाची मान खाली जाईल, अशी वक्तव्ये करणे हे राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे. राहुल तरुण असले तरी त्यांचेही वय वाढत चालले आहे. राहुल गांधी जबाबदार व सशक्त नेता कधी बनणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे.

लडाखच्या जमिनीवर चिनी सैन्याने कब्जा केला आहे, असा राहुल गांधी यांनी जो दावा केला आहे, तो घाईघाईत केलेला दिसतो, एवढेच नव्हे तर कोणताही विचार न करता केलेला आहे, असे म्हणावे लागते. चीनने भारताचा हिस्सा असलेल्या लडाखच्या भूमीवर कब्जा केला हे त्यांना कसे कळले, त्याचा स्त्रोत काय आहे, त्यांना ही कोणी माहिती दिली? राहुल यांचा पंतप्रधानांवर विश्वास नाही, देशाच्या संरक्षण मंत्र्यांवर विश्वास नाही किंवा परराष्ट्र मंत्र्यांवरही विश्वास दिसत नाही. भारतीय सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर किंवा निवृत्त वरिष्ठांवर त्यांचा विश्वास नाही हेच त्यांच्या वक्तव्यातून जाणवते.

दक्षिण ऑफ्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष झिंग जीपिंग हे एकमेकांना भेटत असताना राहुल यांनी चीनने लडाखची हजारो किमी भूमी बळकावली, असा आरोप करीत होते. यामागे त्यांचे काही निश्चितच गणित असावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे सांगतात की, भारताची एक इंचही जमीन कोणीही घेतलेली नाही. सन २०२० मध्ये झालेल्या गलवान धुमश्चक्रीनंतर पंतप्रधानांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, भारताची एक इंचही जमीन कोणीही घेतली नसल्याचे म्हटले होते. पण पंतप्रधान खोटे बोलतात, असा आरोप राहुल गांधी करतात, हे जास्त गंभीर व देशाला धोकादायक आहे. भारतीय सैन्याने कठोर प्रतिकार केल्यामुळे व दाखविलेल्या शौर्यामुळेच गलवान खोऱ्यातून चिनी सैन्याला माघार घ्यावी लागली, असे भाजपचे प्रवक्ते रवि शंकर प्रसाद यांनी त्याच वेळी स्पष्ट केले होते. तरीही चीनने भारताची भूमी बळकावली, असा अपप्रचार राहुल यांनी चालूच ठेवला आहे.

भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरवर सर्जिकल स्ट्राइक केला किंवा हवाई हल्ले केले होते, तेव्हाही त्यांनी प्रश्न उपस्थित करून पुरावे मागितले होते. भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईचे पुरावे मागणे म्हणजे त्यांच्या बेजबाबदारपणाचे वर्तन आहे. काँग्रेस पक्षातील ते आज सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी संरक्षण किंवा परराष्ट्रविषयक मुद्द्यावर बोलताना अतिशय सावधपणे बोलणे अपेक्षित आहे. पण लडाखच्या भूमीवर चीनचा कब्जा, असा आरोप करणे म्हणजे निव्वळ उथळपणा आहे. भारताच्या सरहद्दीवर असलेली चीन व पाकिस्तान ही भारताची शत्रू राष्ट्रे आहेत. भारताच्या विरोधात त्या देशांना मदत होईल किंवा त्यांची प्रशंसा होईल, असे बोलणे कोणत्याही भारतीय नेत्याला शोभादायक नाही. चीनचा जो अजेंडा आहे, त्याला पूरक अशी वक्तव्ये करणे देशाला धोकादायक आहे, याचे भान राहुल यांनी ठेवले पाहिजे. डोकलामचा वाद चालू असताना राहुल गांधी हे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला न कळवता चिनी राजदूताला जाऊन भेटले होते. जेव्हा त्यांच्या मुलाखतीची जाहीर वाच्यता झाली, तेव्हा आपण वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी चिनी राजदूतांना भेटलो, असा खुलासा त्यांनी केला होता. देशाच्या सरहद्दीवर काय घडले, याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शत्रू राष्ट्राच्या राजदूताला भेटणे यापेक्षा बेजबाबदार वर्तन कोणते असू शकते?

काँग्रेस आज केंद्रात विरोधी पक्ष आहे. केवळ चार राज्यांत या पक्षाची सत्ता आहे. लोकसभेत विरोधी पक्ष म्हणून या पक्षाला अधिकृत मान्यता मिळविण्याइतपतही खासदार नाहीत. राज्यसभेत मात्र हा पक्ष मान्यताप्राप्त विरोधी पक्ष आहे. मग या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने जबाबदारीने बोलायला नको का? भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचण होईल असे प्रश्न विचारून किंवा आरोप करून राहुल गांधी यांना काय साध्य करायचे आहे? राहुल गांधी यांना चीनला सहानुभूती मिळावी असे वाटते का? राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून देणगी मिळविण्याची खरोखरच गरज पडली होती का? सन २००८ मध्ये बिजिंग दौऱ्यावर असताना सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी तेथे कम्युनिस्ट पक्षाबरोबर काय चर्चा केली? कोणते समझोते केले हे देशाला समजेल का?

जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधापदाच्या कारकिर्दीत चीनने तिबेटवर कब्जा केला आणि १९६२ ला भारतावर युद्ध लादून भारताचे मोठे नुकसान केले, याचा राहुल गांधी यांना विसर पडला का? नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून चीनलाच काय पण कोणत्याही देशाला भारताकडे वाकड्या नजरने बघण्याची हिम्मत झालेली नाही. चीनला वेळोवेळी त्याची जागा दाखवून देण्याचे काम भारताने केले आहे. एकीकडे नरेंद्र मोदी यांची जगात विश्वनेता म्हणून प्रतिमा निर्माण झाली असताना व ते ब्रिक्स परिषदेत चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा करीत असताना चीनने भारताच्या लडाख प्रांताची जमीन हडप केली, अशी आवई राहुल यांनी उठवणे यामागे त्यांची व काँग्रेस पक्षाची कोणती कुटनिती आहे?
देशाची जनता नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील फरक चांगला जाणून आहे. चीन किंवा पाकिस्तानला ऊर्जा मिळेल अशी वक्तव्ये करून मोदींना प्रश्न विचारणे किंवा आरोप करणे वा पुरावे मागणे यातून देशाची बदनामी होत असते हे राहुल यांना समजत नसावे का? गलवान खोऱ्यात भारतीय सैन्य व चिनी सैनिकांत झालेल्या धुमश्चक्रीबाबत राहुल यांनी ज्या पद्धतीने प्रश्न विचारले ते आपल्या सैन्याच्या शौर्यावर आणि बलिदानावर संशय घेणारे होते.

आंतरराष्ट्रीय प्रश्न पंतप्रधान मोदींनी अत्यंत मुत्सद्दीपणे हाताळले आहेत. दुसरीकडे राहुल गांधी यांचा त्यात उथळपणा जगापुढे प्रदर्शित झाला आहे. राहुल गांधी यांच्या मनात मोदी, अमित शहा, भाजप, संघ परिवार यांच्याविषयी द्वेष आहे. त्यांच्या आरोपातून आणि वक्तव्यातून तो वेळोवेळी प्रकट होतो आहे. राहुल यांच्या आरोपांनी मोदी यांच्या जागतिक प्रतिमेवर काहीही परिणाम होणार नाही, उलट ते किती अपरिपक्व नेते आहेत, हेच जगापुढे येत आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे पक्षाच्या कोणत्याच पदांवर नाहीत. पण कोणतेही पद नसताना पक्ष संघटनेची सूत्रे ही त्यांच्या हाती आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जरी असले तरी सोनिया व राहुल यांनी हिरवा झेंडा दाखविल्याशिवाय ते कोणताच महत्त्वाचा निर्णय जाहीर करू शकत नाहीत. गांधी परिवाराशिवाय पक्ष चालू शकत नाही, ही काँग्रेस पक्षाची असहाय्यता आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार कमजोर व्हावे आणि मोदी यांच्या जागतिक प्रतिमेला तडे जावेत, असा काँग्रेसकडून वारंवार प्रयत्न होत असतो. पण त्यात काँग्रेस आणि राहुल गांधी हेच उघडे पडतात हे वेळोवेळी दिसून येते. मोदी सरकारने गेल्या साडेनऊ वर्षांत जे चांगले काम केले, ते काँग्रेसला दिसत नाही. देशात सर्वच वाईट चालले आहे, देशात सर्वत्र अंधार आहे, असे समजून काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदींना, त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला व भाजपला विरोध करीत आहे.

[email protected]
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -