
काय म्हणाले जय पवार?
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत (NCP) बंड केल्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. काहीजणांनी अजितदादांसोबत सरकारची साथ दिली तर काहीजणांनी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) राहणे पसंत केले. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून आता राष्ट्रवादीचे भविष्य काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, अजितदादांचे दोन्ही पुत्र आता राजकारणात उतरण्याची चिन्हे देखील निर्माण झाली आहेत. अजितदादांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) हे तर राजकारणात सक्रिय होतेच मात्र आता जय पवार (Jay Pawar) देखील मैदानात उतरण्याच्या मार्गावर आहेत. 'तुम्ही दादांशी बोलून घ्या, त्यांनी मला सिग्नल दिला की, मी लगेच तयार आहे,' असं विधान करत त्यांनी त्यांच्या एण्ट्रीचा संकेतच दिला आहे.
बारामतीत शनिवारी अजितदादांच्या झालेल्या जाहीर सभेत त्यांच्यासोबत पार्थ पवार देखील होते. त्यानंतर आज जय पवार बारामतीत आले होते. त्यांनी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व कार्यालयाची पाहणी केली. महिला कार्यकर्त्यांनी जय पवार यांचं औक्षण करत त्यांचं स्वागत केलं. यावेळी मी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे, असं जय पवार म्हणाले.
जय पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संवाद साधत असताना 'दादा तुम्ही आता बारामतीत ऍक्टिव्ह व्हायला हवे, आपल्याला अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे, त्यामुळे तुम्ही आता बारामतीत यायला पाहिजे', असा प्रेमळ आग्रह बारामतीतील कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यासंदर्भात तुम्ही अजितदादांना विचारा त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की मी लगेच कामाला लागतो, असं उत्तर जय पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलं. त्यांच्या या उत्तरामुळे जय पवारही लवकरच राजकारणात दिसणार असा संकेत मिळाला आहे.