पावसाच्या आगमनाची सर्व सजीवसृष्टी वाट पाहत असते. वाऱ्याचा आवाज, पानांची सळसळ, पक्षीरव, पावसाची रिमझिम हे सगळं एकरूप होतं आणि त्यामुळे सगळं जग नवचैतन्याने फुलून जातं. श्रावण महिन्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू असतो. संत, कवी यांनाही श्रावणातील बहरलेली सृष्टी पाहूनच अभंग व गीते स्फुरली असावीत. श्रावणमहिमा पाहून काव्य स्फुरले नाही असा कवी आणि श्रावणगीते आठवली नाहीत, असा रसिकही विरळाच…!
“ग्रीष्म पातला सूर्य तापला, ऊन कडक जिकडे-तिकडे” असे म्हणत असतानाच, अंगाची लाही लाही होत असतानाच सृष्टीत अचानक बदल होतो. निरभ्र आकाश काळ्या ढगांनी आच्छादून जातात आणि वर्षाऋतूला प्रारंभ होतो नि मग ना. धो. महानोरांच्या कवितेची आठवण होते.
“नभ उतरू आलं, चिंब थरथर वल
अंग झिम्माड झालं हिरव्या बहारात”
कारण पावसाच्या आगमनाची सर्व सजीवसृष्टी वाट पाहत असते. वाऱ्याचा आवाज, पानांची सळसळ, पक्षीरव, पावसाची रिमझिम हे सगळं एकरूप होतं आणि त्यामुळे सगळं जग नवचैतन्याने फुलून जातं. भेगाळलेल्या जमिनी जालाभिषेक झाल्याने तृप्तीची ढेकर देतात आणि वातावरणात मातीचा सुगंध दरवळून जातो. जिकडे-तिकडे हिरवेगार दिसणारे गवत, त्या गवतावर येणारी फुले जणू लहान बालकांना साद घालतात.
मग मुलंही “रंगरंगुल्या, सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला” असे म्हणत त्या तृणांशी संवाद साधतात. खरं तर लहान मुलांची कवितेची ओळख ही पावसाच्या गीतांनीच होते.
‘येरे येरे पावसा तुला देलो पैसा’ किंवा’ सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच’ म्हणत निसर्गाच्या व पक्ष्यांच्या जगात ही गीते या बालकांना घेऊन जातात. आषाढ पागोळ्या बरसल्यावर कधी पाऊस नकोसा वाटत असतानाच सर्व मासातील राजा श्रावण मासाचे आगमन होते.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ म्हणत संत तुकाराम महाराजांनी वनस्पती सृष्टिशी मनुष्याचे नाते जोडले, तर ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ असे म्हणत संत सावता माळी यांनी मळ्यातच पंढरी शोधली. या संतांनाही श्रावणातील बहरलेली सृष्टी पाहूनच हे अभंग स्फुरली असावीत. श्रावणमहिमा पाहून काव्य स्फुरले नाही असा कवी विरळाच आणि श्रावणगीते आठवली नाहीत, असा रसिकही विरळाच.
‘भिजूनी उन्हे चमचमती
क्षण दिपली क्षण लपली
नितळ निळ्या अवकाशी
मधुगंध तरल हवा
ऋतू हिरवा ऋतु बनवा’
कवयित्री शांताबाई शेळके यांनी श्रावणसृष्टीचे हुबेहुब वर्णन यां काव्यपंक्तीत केले आहे.
‘श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा उलगडला झाडातून अवचित मोरपिसारा’
या मंगेश पाडगावकरांच्या या काव्यातून सर्व मासातील ‘राजा’ श्रावणमासाचे वर्णन येथे केले आहे. पावसाच्या सरींना रेशीम धारा संबोधले आहे. कारण श्रावणात बरसणारा पाऊस हा शांत, सुसह्य असा असतो. तसेच,
‘भेट तुझी माझी स्मरते
अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती
रात पावसाची’
या गीतपंक्तीतून पाडगावकरांनी युगुलांच्या स्मृतिगंधांना उजाळा दिला आहे.
श्रावण महिन्यात कधी ऊन, तर कधी पाऊस असा ऊन पावसाचा खेळ असतो तो आपल्या आयुष्याच्या सुख-दुःखाचे प्रतीक बनून येतो.
‘श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे’
या काव्यात बालकवींनी वर्णीलेल्या नवचैतन्याने बहरलेल्या सृष्टीची अनुभीती होते. सृष्टी जणू नवा साज ल्याली आहे. नभी इंद्रधनुष्याची कमान दिसत आहे, तर पृथ्वीने हिरवा शालू परिधान केला आहे. अशी कवी कल्पना मनाला मोहून टाकते.
‘येरे घना येरे घना न्हाऊ घाल माझ्या मना’ आरती प्रभूंच्या या काव्यातून तरुणींच्या तरल तारुण्यसुलभ भावनांना मूर्त रूप दिले आहे, अतिपावसाने नको झालेल्या जीवाला श्रावणसरी आल्हाददायी वाटतात कारण, श्रावणात ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो. कधी कधी तर उन्हातच पाऊन बरसतो आणि द्वयींचे मिलन पाहायला मिळते उन्हातील पाऊस अत्यंत मोहक वाटलो.
श्रावणात सात्त्विकतेचा स्पर्श होतो. कारण या काळात उपास-तापास, ग्रंथ-पोथी वाचन सुरू होत, भजन, कीर्तने प्रवचने आयोजित केली जातात. त्यातून वैचारिक देवाण-घेवाण होते. त्याचबरोबर या काळात आपल्या आहारातही सात्त्विकता येते. सणांची मांदियाळी असलेल्या या श्रावणात वैविध्यपूर्ण सात्विक पदार्थांची रेलचेल असते. विविध मिष्टान्नांचे सुवास घराघरांतून दरवळतात. शास्रात चातुर्मासात शुद्ध शाकाहार सांगितला आहे. कारण आपली पचनशक्ती या काळात मांसाहार पचवू शकत नाही. तसेच जलचरांचाही हा सृजनतेचा काळ असतो कदाचित म्हणूनच पूर्वजांनी, ऋषीमुनींनी या काळात मांसाहार निषिद्ध मानला आहे. निसर्गही त्यासाठी पर्याय उपलब्ध करतो अनेक प्रकारच्या पावसाळी भाज्या बाजारात दिसू लागतात. शेवळ, टाकळा श्रावण घेवडा, कंटोळी (करटुळ) आणि भरपूर क्षारयुक्त कोवळ्या बांबूची भाजीसुद्धा या दिवसांत बनविली जाते. निसर्ग आपल्याला कायम देत आला आहे. दातृत्वान कृतज्ञतेचा भाव आपण सणाच्या माध्यमातून जोडतो.
आपला देश शेतीप्रधान आहे. शेतातील पिकांचे रक्षण सर्प करत असतात. त्यांच्या नकळपणे आपल्यावर होणाऱ्या उपकाराला आपण कृतज्ञ बुद्धीने नागपंचमीच्या निमित्ताने त्यांना नमस्कार करतो, पूजा करतो. ‘शीतला सप्तमी’ला घरातील चुलीला आराम दिला जातो. कारण कृतज्ञतेच्या पायावर उभी असलेली भारतीय संस्कृती या गृहदेवतेचे उपकार कसे विसरेल? तेच श्रावण वद्य अमावस्याला येणारा पोळा सणाचेही महत्त्व आहे. या दिवशी आपल्या कृषिवलांवर अनंत उपकार करणारी मुकी जनावरे म्हणजे आपली गुरे यांची ही कृतज्ञतापूर्वक पूजा केली जाते. याच दिवसाला मातृदिनही म्हटले जाते. आईमध्ये सांस्कृतिक दृष्टीने भगवंत पाहायचे सुरू करून भगवंतातच आई निरखण्याची आपल्याला अध्यात्मिक दृष्टी हा सण देतो. या सणांच्या रेलचेलीत नवविवाहितेला माहेरी येण्याची, हसण्या-खिदळण्याची, नटण्या-थटण्याची संधी मिळते. मंगळागौरीचा खेळ रंगतो. या खेळातून परंपरा जपली जाते. शारिरीक व्यायामाबरोबरच आजच्या आधुनिक मंगळागौरीतून वैचारिक प्रबोधन केले जाते. या श्रावणात सर्वात जास्त आनंद देणारा सण म्हणजे गोकुळाष्टमी-गोपाळकाला. लहानथोरांच्या उत्साह उधाण आणणारा व भक्तिरसात न्हाऊन टाकणारा गोपाळकाला. दही-पोह्यापासून फळ, विविध मिठाई या सगळ्यांचा आस्वाद हा सण देतो. भगवान श्रीकृष्ण म्हणजे सांस्कृतिक निस्पृह, निरहंकारी व नम्र उपासक. श्रीकृष्णाने असूरी वृत्तीचा नाश केला, त्याप्रमाणे आपण. आपल्या मनातील असुरी विचार दूर करण्यास हा सण आपल्याला प्रवृत्त करतो. ‘रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात’ अशा या श्रावणी सुरात चिंब भिजावं, बहरावं, आहार-विहार आणि विचारांनी समृद्ध व्हावं.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…