Sunday, July 21, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनअमेठी व वाराणसी; काँग्रेसचा जुगार

अमेठी व वाराणसी; काँग्रेसचा जुगार

स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर

उत्तर प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष अजय राय यांनी राहुल गांधींनी अमेठीतून आणि प्रियंका वाड्रा यांनी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे म्हटले आहे. राहुल व प्रियंका दोघे बहीण-भाऊ उत्तर प्रदेशातून २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक लढणार असल्यास काँग्रेस आपल्या सर्व शक्तिनिशी त्यांच्या पाठीशी उभी राहील, अशीही पुस्ती त्यांनी जोडली आहे. खरोखरच राहुल गांधी हे अमेठीतून आणि प्रियंका वाराणसीतून निवडणूक लढवतील का?, अशी चर्चा पक्षात सुरू आहे. उत्तर प्रदेश हा भाजपचा भक्कम किल्ला आहे. या किल्ल्याचे किल्लेदार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. त्यामुळे राहुल आणि प्रियंका हे अमेठी व वाराणसीतून निवडणूक लढविण्याचे धाडस करणार नाहीत असे वाटते. पण त्यांनी खरोखरच लढवायचे ठरवले, तर तो मोठ्ठा जुगार ठरेल.

अमेठीतील मतदारांनी गेल्या वेळी चूक केली, ती चूक त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत सुधारायची आहे, म्हणूनच तेथील मतदार व पक्षाचे कार्यकर्ते राहुल गांधी यांनी अमेठीतून निवडणूक लढवावी अशी मागणी करीत आहेत, असे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी म्हटले आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या वेळी (२०१९ मध्ये) उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळमधील वायनाड अशा दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी त्यांचा अमेठीत पराभव केला. मात्र ते वायनाडमधून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले.

राहुल गांधी अमेठीतून सन २००४, २००९ आणि २०१४ अशा तीन निवडणुकांमधून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले होते. राहुल गांधी यांचे वडील व माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हे सुद्धा अमेठी मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा येथे पराभव झाल्यामुळे अमेठीची जागा इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुजिव्ह अलायन्स) नावाच्या विरोधी आघाडीतील मित्र असलेला समाजवादी पक्ष काँग्रेसला सोडेल का? हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे. इंडिया या विरोधी आघाडीत काँग्रेस व सपा दोघेही आहेत व लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ची उभारणी झाली आहे.

सन २०१७ मध्ये काँग्रेस आणि सपा यांची आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी झाली होती, पण ती दोन्ही पक्षांना लाभदायक ठरली नाही. मोदी-योगींच्या झंझावातापुढे सपा व काँग्रेसचा धुव्वा झाला. सन २०१७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या ४०३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ ७ आमदार निवडून आले, तर सपाचे ४७ आमदार विजयी झाले. सन २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे केवळ २ आमदार विजयी झाले. विशेष म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा केवळ एकच उमेदवार लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आला, त्या म्हणजे सोनिया गांधी रायबरेलीतून विजयी झाल्या. काँग्रेसचे बाकीचे सारे उमेदवार पराभूत झाले. उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष शोधावा लागतो, अशी परिस्थिती आहे. अशा वातावरणात राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविण्याची हिम्मत दाखवतील का?

पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक सोनिया गांधी रायबरेलीतून लढवतील का?, हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. सोनिया, राहुल आणि प्रियंका तिघेही निवडणूक लढवणार असतील, तर भाजपला परिवारवादाचा मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडण्याची आपसूकच संधी मिळेल. उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी किंवा पक्ष कार्यकर्त्यांनी कितीही आळवणी केली तरी राहुल व प्रियंका या राज्यातून निवडणूक लढवायला तयार होतील का? हा यक्षप्रश्न आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यापासून राहुल यांनी अमेठीपासून फारकतच घेतली आहे. राहुल अमेठीकडे फिरकत नसल्याने त्यांचा जनसंपर्क राहिलेला नाही. याच अमेठीने राहुल गांधी यांना तीन वेळा खासदार म्हणून लोकसभेवर पाठवले पण त्यांनी मतदारांशी संपर्कच ठेवलाच नाही. त्यांची प्रतिमाही येथे कुणाला आकर्षित करेल, असे वातावरण नाही. आपल्या वडिलांची, आजीची पुण्याई हीच त्यांची पुंजी आहे, त्या जोरावरच ते निवडून येत होते. पण या पलीकडे त्यांनी या मतदारसंघाला काहीही दिले नाही. या उलट २०१९ मध्ये त्यांचा पराभव करून भाजपच्या स्मृती इराणी अमेठीतून खासदार झाल्या, केंद्रात मंत्रीही झाल्या. पण त्यांनी मतदारसंघाशी सतत संपर्क ठेवला आहे.

मतदारसंघात केंद्र व राज्याच्या अनेक विकास योजना राबवल्या जात आहेत. अमेठीवासीयांच्या सुख-दु:खात सहभागी होणारी लोकप्रतिनिधी अशी स्मृती इराणी यांची तेथे प्रतिमा आहे. अमेठीची जनता राहुल यांना किती स्वीकारेल, याबद्दल साशंकता आहे. बहुसंख्य मुस्लीम मतदार असलेला केरळमधील वायनाड मतदारसंघ हा राहुल यांच्यासाठी अधिक सुरक्षित आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांना वाटते. प्रियंका पण वाराणसीतून लढेल, असे वाटत नाही. गांधी परिवार नेहमीच सुरक्षित मतदारसंघ निवडतो व नेहरू-गांधी नावाच्या पुण्याईवर वर्षानुवर्षे निवडणूक लढवतो. प्रियंका आपले राजकीय करिअर वाराणसीपासून सुरू करेल, याची सुतराम शक्यता वाटत नाही. विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी उत्तर प्रदेश हे मुळीच सुरक्षित राज्य नाही. आजवर निवडणूक पूर्व जे जे सर्व्हे झाले, त्यात उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये भाजपला शत-प्रतिशत यश मिळेल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात इंडियाला काहीही भवितव्य नाही. वाराणसीमधून पाच वेळा आमदार झालेला भाजपचा नेता म्हणतो, सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे प्रमुख ओम प्रकाश राजभर हे भाजपप्रणीत एनडीएमध्ये का सामील झाले? सन २०१७ च्या निवडणुकीत राजभर यांचा पक्ष भाजपच्या आघाडीत मित्र होता. पण २०२२ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली व ते समाजवादी पक्षाचे मित्र झाले. गेल्याच महिन्यात ते पुन्हा एनडीएमध्ये परतले. गेल्या विधानसभा व लोकसभा निवडणकीत काँग्रेस आणि सपा यांनी कामगिरी अत्यंत खराब होती हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मान्य करतात. पण २०२४ची लोकसभा निवडणूक ही वेगळी असेल, असे सांगतात. गुजरातमधील भ्रष्ट कंत्राटदारांना उत्तर प्रदेशात मोठी कामे दिली आहेत, असा आरोप राय यांनी केला आहे. मात्र त्या कामांचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. उत्तर प्रदेशमधील स्थानिक कंत्राटदारांना छोटी व किरकोळ कामे दिली जातात. गुजरातच्या कंत्राटदारांना मोठी कामे दिली जातात. राज्यातील तरुणांना सर्वसाधारण नोकऱ्या किंवा रोजगार दिला जातो. जिथे चांगली कमाई आहे, तिथे इतरांच्या नेमणुका केल्या जातात, असा आरोप काँग्रेस पक्ष करीत आहे.

राज्यात बेरोजगार प्रचंड आहेत. रोजगार नोकरीसाठी राज्यातील तरुणांना मुंबई, दिल्ली, चेन्नई किंवा बंगळूरुला जावे लागते, वर्षानुवर्षे ही परिस्थिती आहे. बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, सरकारी यंत्रणांचा गैरवापर यांनी उत्तर प्रदेशला वेढले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राय सांगत आहेत. अर्थात हेच प्रश्न देशात सर्व राज्यांत आहेत. जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथे हे प्रश्न अधिक तीव्र आहेत. म्हणून हे मुद्दे रेटून काँग्रेसला यश मिळेल, असे ठामपणे सांगता येणार नाही. स्वत: राय यांनी तीन लोकसभा निवडणुका लढवल्या व तिन्ही वेळा ते पराभूत झाले. सन २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांचा सणसणीत मतांनी पराभव झाला. सन २००९ मध्ये त्यांचा मुरली मनोहर जोशी यांच्यापुढे वाराणसीत सपाचे उमेदवार म्हणून पराभव झाला. पक्ष बदलला तरी ते एकदाही निवडणूक जिंकू शकले नाहीत आणि आता ते राहुल आणि प्रियंका यांना अमेठी व वाराणसीतून निवडणूक लढविण्याची गळ घालत आहेत. राहुल यांच्यासमोर स्मृती इराणी यांची अनामत ठेव जप्त होईल, अशी दर्पोक्ती करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून ते राहुल व प्रियंका यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवत आहेत. दोघांना भाजपच्या विरोधात जुगार खेळण्याचा आग्रह करीत आहेत. धन्य ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -