चांद्रयान-३ मोहिमेचं थेट प्रक्षेपण आपण घरबसल्या लाइव्ह पाहू शकता, अशी ब्रेकिंग न्यूज सतत टीव्हीच्या वेगवेगळ्या चॅनल्सवर आदळत होती आणि मी माझ्या खिडकीतून दिसणाऱ्या माझ्या मनातल्या चंद्रबिंबाची वाट पाहत होते. मला सहजच कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या :
‘या चंद्राचे त्या चंद्राशी, मुळीच नाही काही नाते… त्या चंद्रावर अंतरिक्षयानात बसूनी, शास्त्रज्ञांना जाता येते… या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही…’
मी विचार करू लागले की खरंच हा चंद्र आभाळात राहात असला तरी त्याचं ठिकाण सर्वत्र व्यापलेलं आहे. बालगोपाळांना खेळात चांदोमामा सापडतो, तर आईच्या अंगाईत तो लिंबोणीच्या झाडामागे लपलेला असतो. प्रियकराच्या तो हृदयात, तर प्रेयसीच्या डोळ्यांत तो लपलेला दिसतो. तसा हा चंद्र आपल्याला आयुष्याच्या विविध टप्प्यांवर भेटत असतो. असंख्य घटनांचा तो साक्षीदारही असतो आणि त्याच्याबद्दलचं गूढ व आकर्षण प्रत्येकाला जाणवतं. तो किती, कसा आणि कुठे कुठे भरून राहिलाय पाहा ना.
मुलांचं आवडतं मासिक चांदोबा. ते नाव किती सार्थ होतं हे आज कळतं. गावी सुट्टीत गेलो की चांदोबाची मासिकं पूर्ण वाचून झाल्यावर छोटीशी नाटुकली सादर करण्यात आम्ही दंग होत असू. बसने वा रेल्वेने प्रवास करताना आकाशातला चंद्र माझ्यासोबत धावतोय असे वाटे कधी झाडामागे लपे, तर कधी अदृश्य होई मग पुन्हा त्याला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करते असे, असा माझा आणि चंद्राचा लपाछपीचा डाव नेहमीच रंगत असे. तारुण्यात पदार्पण केलेल्या प्रेमिकांसाठी चंद्र म्हणजे जणू ब्रँड अँबेसेडरच असतो. साहित्यिक व कवींना त्यांच्या प्रतिभेला खुलवण्यासाठी चंद्र कधी चौदहवी का चांद, तर कधी पौर्णिमेचं पूर्ण बिंब होऊन अवतरतो. शुक्रतारा मंद वाऱ्यासवे तो स्वप्नांचा वाहक होतो, तर भुकेल्या जीवांसाठी भाकरीचं प्रतीक होऊन अवतरतो. चित्रपट निर्मात्यांसाठी, तर तो कथानकाच्या गरजेनुसार विविध रूपांत धावून येतो. मुळात आपली कालगणना चंद्राच्या कलांप्रमाणे असल्याने आकाशात तो दिसो वा न दिसो आपण त्याचा पिच्छा सोडवू शकत नाही.
संकष्टीला हिंदू भाविक भक्तांसाठी, तर ईदला मुस्लीम बांधवांसाठी चंद्राचं दर्शन किती महत्त्वाचं असतं हे वेगळं सांगायला नको. उत्तर भारतातील करवा चौथ आणि महाराष्ट्रातील कोजागिरी ही सुद्धा चंद्राशीच निगडीत असलेली मंगलमयी पर्व. वयाची ८० वर्षं पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा केला जातो. कारण त्यांनी तोवर १००० वेळा पूर्ण चंद्र पाहिलेला असतो. एकूण चंद्र हा कोणी सजीव प्राणी नसला तरी त्याला त्रिकालाबाधित सत्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच तर आपण ‘आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे’ असं गौरवगीत गातो. त्यातही धगधगत्या, तेजस्वी सूर्यापेक्षा सौम्य, शीतल चंद्र आपल्याला अधिक जवळचा, हवासा वाटतो. कदाचित त्यामुळेच आपल्या भावविश्वात आपण त्याला सहज सामावून घेतलं असावं. सृष्टीतल्या प्रत्येक घटनेच्या साक्षीला चंद्र असतो. चंद्राचा कलेमुळे सागरात भरती ओहोटी होते.
माझी आत्या लहानपणी एक गोष्ट सांगे. एकदा चांदोबाने आईकडे अंगारखा शिवून देण्याचा हट्ट धरला. आईने अंगरखा शिवला. पण तो चंद्राच्या कलेप्रमाणे लहान-मोठा होई. अखेर आई वैतागली आणि म्हणाली, जा! आता तुला मी अंगारखाच शिवणार नाही. तेव्हापासूनच बिचारा चंद्र तसाच अंगरख्याविना फिरू लागला. लहानपणी ही कथा ऐकताना आम्हाला खूप मजा येत असे. आता मोठे झाल्यावर कोणी स्थूल व्यक्ती दिसली की मिश्किलपणे बोलले जाते, चंद्र जसा कलेकलेने वाढतो तसा तू किलोकिलोने वाढत चाललायस अन् मग एकच हशा पिकतो.
चंद्राच्या सुंदर कथांमध्ये एक शापकथाही आहे. गणेश चतुर्थीला चंद्राचं दर्शन घेऊ नये असं मानलं जातं. म्हणून लहानपणी या भीतीने आम्ही चुकूनही वर आकाशाकडे पाहायचं टाळत असू. अध्यात्मात पौर्णिमेला एक वेगळं स्थान आहे. श्री हनुमान, गौतम बुद्ध, व्यास मुनी अशा असामान्य दैवी महात्म्यांची जन्मतिथी पौर्णिमेचीच. गुरुपौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा, शरद पौर्णिमा अशा प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेला तर रात्र जागवण्यासाठी चंद्रावर आधारित अनेक गाणी गायली जातात, नृत्य सादर केले जाते. चंद्राच्या शीतल प्रकाशातले दूध प्रसाद म्हणून प्राशन केले जाते. तर असा हा चंद्र गोष्टीतला, मानवी भावविश्वातला आणि प्रत्यक्ष विज्ञानातला!
भारताचं चांद्रयान-३ चंद्रावर सुरक्षितपणे अलगद उतरलं, तेव्हा या अभूतपूर्व क्षणाचे आपण साक्षीदार ठरल्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाप्रमाणे माझ्याही उरात दाटून आला व त्याच वेळी मनातला चंद्रही गाली हसत गाऊ लागला,
‘पान जागे फूल जागे भाव नयनी जागला…’
मग मी त्यापुढची ओळ पूर्ण करत नकळतपणे गुणगुणू लागले,
‘चंद्र आहे साक्षीलाss चंद्र आहे साक्षीलाsss’
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…