शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
बारामती : राष्ट्रवादीत (NCP) नेमकं काय चाललंय हे कळणं आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) एका वक्तव्यामुळे आणखी क्लिष्ट झालं आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी साधारण दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या काही आमदारांचा पाठिंबा मिळवत भाजपसोबत हातमिळवणी केली. अजितदादा गटातील आमदारांच्या मतदारसंघांत काका-पुतण्याच्या सभा - उत्तरसभाही झाल्या. यानंतर त्यांनी वारंवार आपल्यासोबतच्या आमदारांना घेऊन शरद पवारांनीही आपल्यासोबत येऊन एकत्र काम करावे अशी गळ घातली. तेव्हा शरद पवारांनी या बाबीला दुजोरा दिला नव्हता. मात्र, आता त्यांनी एक वेगळंच विधान केलं आहे.
राज्याच्या राजकारणात उलथापालथी करण्यात आणि डावपेच करण्यात शरद पवार यांचा हातखंडा आहे, हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. 'अजित पवार आमचेच नेते, काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून फूट म्हणायचं कारण नाही' असं वक्तव्य त्यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना केलं आहे. शरद पवार म्हणाले की, "ते आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही. फूट पडली याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी येते, जेव्हा पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला देशपातळीवर, अशी स्थिती इकडे नाही. काही लोकांनी पक्ष सोडला काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आणि तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. जो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही तो त्यांचा निर्णय आहे." शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
सुप्रिया सुळेंची भूमिका काय?
विशेष म्हणजे शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) देखील हल्ली सतत अजित पवारांची बाजू घेऊन बोलताना दिसतात. त्यांनी कालच केलेलं एक वक्तव्य देखील याबाबतीत सूचक मानावं लागेल. त्या म्हणाल्या, आमच्यापैकी काही जणांनी वेगळा निर्णय घेतला आहे, मात्र राष्ट्रवादीत अजिबात फूट पडलेली नाही. राष्ट्रवादीचे देशाचे अध्यक्ष शरद पवार, तर महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्या दोघांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो. तर अजित पवार आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतल्यामुळे त्यांची तक्रार आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दिलेली आहे. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहतोय.
त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? याव्यतिरिक्त नातं आणि राजकारण यात फरक असतो आणि तो आम्ही जाणतो, अशा प्रकारची वक्तव्येही त्या करतात. मविआचेच सभासद असलेल्या संजय राऊतांनी अजितदादांविरोधी वक्तव्य केल्याने सुप्रिया सुळेंनी त्यांचादेखील समाचार घेतला होता. त्यामुळे आता पवार घराणं पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात कोणता नवा ट्विस्ट आणणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






