
४ जणांची प्रकृती गंभीर
भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील एका आदिवासी आश्रमशाळेतील (Ashram School) ४१ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा (Food poisoning) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुमसर तालुक्यातील येरली येथील शाळेत हा प्रकार घडला असल्याची माहिती मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे.
उलटी, मळमळ, पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर रात्री उशिरा ३६ विद्यार्थ्यांना तुमसर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आणखी पाच जणांची प्रकृती बिघडली. त्यामुळे आता उपचार घेणार्या विद्यार्थ्यांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. यातील चार विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात २३ तर तुमसर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात १८ विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत.
भंडारा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने यासंबंधी सविस्तर माहिती दिली. तिने सांगितल्यानुसार, काल वर्गात गेल्यावर मुलांनी वाटाणा, चणा आणि बटाट्याची भाजी खाल्ली. त्यानंतर काही जणांना पोटदुखीचा त्रास सुरु झाला व त्यांनी शिक्षकांना याबद्दल माहिती दिली. त्यामुळे मुलांना ताबडतोब रुग्णालयात आणून उपचार सुरु करण्यात आले.
दरम्यान, रुग्णालयाच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. सुचिता वाघमारे यांनी मुलांना योग्य ते उपचार देण्यात येत आहेत, तसेच ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना इमर्जन्सी सुविधा पुरवल्या जात आहेत, अशी माहिती दिली.