भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वीपणे पार पडली आहे. ‘चांद्रयान-३’ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सुरक्षितपणे लँड झाले. त्यानंतर चंद्राच्या या भागात सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला. हे यश म्हणावे तितके सोपे नव्हते. त्यासाठी शास्त्रज्ञांनी अपार कष्ट, प्रचंड मेहनत आणि कमालीचा आत्मविश्वास बाळगून ही मोहीम आखली आणि यशस्वी केली. या मोहिमेकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष लक्ष होते. या मोहिमेसाठी आवश्यक ते सर्व सहाय्य सरकारतर्फे पुरविण्याचे आदेश त्यांनी दिले होते. तसेच शस्त्रज्ञांनाही त्यांनी वेळोवेळी प्राेत्साहन दिले. चांद्रयान-३चा हा प्रवास खरं तर चांद्रयान-१च्या यशानंतरच सुरू झाला होता.
पहिल्या चांद्रयानाने चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा शोध लावला होता. त्याचाच अधिक अभ्यास करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर जाणे आवश्यक होते. त्यामुळे चांद्रयान-२ मोहीम आखण्यात आली. दुर्दैवाने चांद्रयान-२ हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकले नाही. मात्र त्यामुळे इस्रोचे वैज्ञानिक खचले नाहीत. ‘चांद्रयान-२’ हे चंद्रावर क्रॅश झाले असले, तरी ते चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचले होते. त्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांना हुरूप आला होता. म्हणून लगेचच तिसऱ्या चांद्रयान मोहिमेची तयारी सुरू करण्यात आली. सॉफ्ट लँडिंग आणि चंद्राच्या जमिनीचा अभ्यास, हेच लक्ष्य डोळ्यांसमोर ठेऊन नव्याने चांद्रयानाची निर्मिती सुरू झाली. ‘चांद्रयान-२’ मोहिमेच्या अपयशातून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी धडा घेतला. त्यामुळेच ‘चांद्रयान-३’चे मॉडेल हे सक्सेस बेस्ड नाही, तर फेल्युअर बेस्ड होते. मागील चांद्रयान हे शेवटच्या काही मिनिटांमध्ये क्रॅश झाले होते. त्यामुळे लँडिंगच्या या फेजसाठी चांद्रयान-३मध्ये विशेष काळजी घेण्यात आली. चांद्रयानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत नेणे ही गोष्ट दुसऱ्या मोहिमेत देखील यशस्वी झाली होती.
भारताच्या या यशाचे संपूर्ण श्रेय हे नक्कीच पूर्णपणे इस्रोच्या वैज्ञानिकांचे आहे. या यशात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्यासह ‘चांद्रयान-३’ मोहिमेचे संचालक मोहन कुमार, रॉकेट संचालक बीजू सी. थॉमस यांचा मोठा वाटा आहे. ‘इस्रो’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘चांद्रयान-३’ या मोहिमेत ५४ महिला अभियंत्या आणि शास्त्रज्ञांचा सहभाग होता. ‘इस्रो’च्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या केंद्रातील विविध विभागांत त्या अधिकारीपदावर काम करीत आहेत. भारताच्या या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण देशासह अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. रशियानेही लुना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि त्यांची ती मोहीम अपयशी ठरली. अशात भारताची चांद्रयान मोहीम ही यशस्वी होईल, असा विश्वास इस्रोने व्यक्त केला होता. त्यानुसार ही मोहीम यशस्वी झाली आहे. आम्ही चांद्रयान-२ च्या अपयशातून खूप काही शिकलो आहोत, असे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले होते. या ऐतिहासिक कामगिरीसाठी जगभरातून भारतावर कौतुकाचा वर्षाव झाला. ‘नासा’चे ॲडमिनिस्ट्रेटर बिल नेस्लन, ब्रिटिश स्पेस एजन्सी, युरोपीय स्पेस एजन्सी अशा सर्वच दिग्गज संस्थांनी आणि कित्येक देशांनी ‘इस्रो’चे आणि देशाचं अभिनंदन केले.
‘चांद्रयान-३ च्या ‘विक्रम’चे चंद्रावर यशस्वी अवतरण होताच देशभरात उत्साहाचे वातावरण संचारले. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाली. शालेय विद्यार्थ्यांनीही शाळांच्या आवारात ढोल-ताशे वाजवत आनंदोत्सव साजरा केला. चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होण्यासाठी सकाळी विविध मंदिरांमध्ये काहींनी साकडे घातले होते. त्यानंतर सायंकाळी चांद्रयान-३ विक्रमचे यशस्वी लॅन्डिंग झाल्याची आनंदाची वार्ता कानी पडताच सर्वत्र जल्लोष सुरू झाला. मिठाई वाटण्यात आली. या वर्षी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आर्टेमिस करारांवर स्वाक्षरी केली. यानंतर आर्टेमिस अकॉर्ड्समध्ये सहभागी होणारा भारत २६वा देश झाला. त्यासोबतच, भारताचा नासासोबत भविष्यातील संयुक्त मोहिमांसाठीही करार झाला आहे.
अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने जगभरातील कित्येक देशांसोबत आर्टेमिस करार केला आहे. त्यानुसार, अंतराळ संशोधनाबाबत काही गाइडलाइन्स सेट करण्यात आल्या आहेत. भविष्यातील अंतराळ मोहिमा अधिक सुरक्षित करण्यासाठी हा करार महत्त्वाचा आहे. यानुसार, अंतराळात अडकलेल्या कोणत्याही देशाच्या अंतराळवीर किंवा उपग्रहांना मदत करण्यासाठी इतर देश प्रतिबद्ध आहेत. यासोबतच, अंतराळ मोहिमा पारदर्शक ठेवणे आणि मिळालेलं संशोधन शेअर करणे हादेखील याचा भाग आहे. त्यामुळेच भारताची चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्याने त्याचा फायदा कित्येक देशांना होणार आहे. भविष्यात अंतराळ मोहिमा राबवण्याच्या आणि चंद्रावर मानव पाठवण्याच्या तयारीत असणाऱ्या देशांसाठी चांद्रयान-३ने गोळा केलेली माहिती उपयोगी असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेत आहेत. त्यांनी तेथूनच या ऐतिहासिक यशासाठी भारतीयांचे आणि इस्रोचे अभिनंदन केले. अखंड भारतासाठी हा महत्त्वाचा आणि नवी चेतना देणारा ठरणारा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. काही दिवसांतच इस्रोकडून पहिली ‘सूर्य मोहीम’ लाँच करण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आता अवकाशात उपग्रह पाठवून सूर्यावर २४ तास नजर ठेवणार आहे.