Gajanan Maharaj : ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी

  119

गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला.


अध्याय क्रमांक सोळामध्ये कवरपुत्र त्र्यंबक यांचे कथानक आले आहे. अकोला शहरात एक मध्यम प्रतीचा सावकार राहत असे. सोने-चांदी देणे-घेणे असा त्याचा सराफीचा व्यवसाय होता. ज्याचे नाव राजाराम कवर असे होते. याला दोन पुत्र होते. पहिला गोपाळ आणि दुसऱ्या पुत्राचे नाव त्र्यंबक असे होते. या कवराला श्री महाराजांची भक्ती होती. त्याचे दोन्ही पुत्र महाराजांचे भक्त होते. यातील कनिष्ठ पुत्र म्हणजे त्र्यंबक यास भाऊ असे म्हणत असत. तो डॉक्टरी शिकण्याकरिता हैदराबाद येथे गेला होता. या भाऊला लहानपणापासूनच देवाच्या भक्तीची आवड होती. त्याची गजानन महाराजांवर आत्यंतिक श्रद्धा होती. महाराज हेच त्याचे दैवत होते म्हणा ना. एकदा हा भाऊ सुट्टीमध्ये अकोल्यास आला. त्यावेळी त्याच्या मनात श्री महाराजांकरिता त्यांच्या आवडीचे पदार्थ तयार करून शेगाव येथे नेऊन महराजांना जेऊ घालावे, अशी इच्छा उत्पन्न झाली. पण हे व्हावे कसे? असा त्याला विचार पडला. त्याने मनोमन आपली विवंचना महाराजांना सांगितली :
भाऊ म्हणे गुरुनाथा।
काय तरी करू आता।
मरून गेली माझी माता।
लहानपणीच दयाळा॥ ६८॥
घरी माझे नाही कोणी।
एक बंधूची कामिनी।
जीचे नाव आहे नानी।
स्वभाव तापट तियेचा॥ ६९॥
पुढे त्र्यंबक म्हणाला,
माझ्या आहे ऐसे मनी।
आपणा करावी मेजवानी।
आपुल्या आवडीचे करोनी।
पदार्थ सारे गुरुराया॥ ७०॥
भाकरी ती जवारीची।
कांदा भाजी अंबाडीची।
ऊन पिठले हिरवी मिरची।
ऐसे तयार करावे॥ ७१॥


पण वर आलेल्या वर्णनाप्रमाणे नानीचा स्वभाव असल्यामुळे नानीला हे कसे करून मागावे, हा त्याला प्रश्न होता. त्यामुळे भाऊ निवांत बसला होता. एवढ्यात नानी काही कामानिमित्त तेथे आली आणि तिने भाऊस “काय झाले? मुखश्री म्लान का झाली आहे?” असे विचारले असता भाऊ तिला म्हणाला, “पूर्ण सत्ता असल्याशिवाय काही करता येत नाही. तुला काय सांगू.” त्यावर नानी म्हणाली, “तू माझा धाकटा दीर आहेस. ज्येष्ठ बंधू हा पित्यापरी असून त्याची पत्नी ही मातेसमान असते. मला सांग सर्व काही. कोणताच आडपडदा ठेऊ नकोस.”


भाऊने नानीला आपल्या मनातील विचार सांगितला. नानी म्हणाली, “काय काय करावयाचे आहे ते सांगा. आपल्या घरी गजानन महाराजांच्या कृपेने कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही.” मग भाऊने तिला महाराजांच्या आवडीचे पदार्थ सांगितले. त्याप्रमाणे नानी आनंदाने स्वयंपाकाला लागली. सर्व पदार्थ तयार झाल्यावर नानी भाऊला म्हणाली, “गाडीची वेळ झाली आहे. शेगावी जाण्याकरिता निघावे. गाडी निघून गेली, तर ही सर्व तयारी वाया जाईल. महाराजांच्या भोजनाच्या वेळी पोहोचला, तरच उपयोग.” भाऊदेखील वडीलबंधूस विचारून लगेच निघाला. भाऊ स्टेशनवर पोहोचला तो बाराची गाडी निघून गेली होती. त्यामुळे भाऊला वाईट वाटले. तो महाराजांना उद्देशून बोलला, “महाराज माझा अव्हेर का केलात? मी नैवद्य घेऊन येत होतो, तर माझी गाडी निघून गेली. क्षमा करा.” हा प्रसंग दासगणू सांगतात :
अति हिरमोड त्याचा झाला।
पाणी आलें लोचनांला।
म्हणे महाराज कां हो केला।
अव्हेर माझा ये कालीं?॥ ९१॥
मी मुळींच हीन दीन।
कोठून घडावें मला पुण्य?।
आम्हां कावळ्यांकारण।
लाभ केवीं मानसाचा ॥ ९२॥
अक्षम्य ऐसी कोणती।
चुकी झाली माझ्या हातीं।
म्हणून माझी गुरुमूर्ति।
गाडी चुकली ये वेळां?॥ ९३॥
हाय हाय हे दुर्दैवा।
त्वां माझा साधिला दावा।
माझ्या करीं गुरुसेवा।
घडूं न दिली आज तूं॥ ९४॥
ही माझी शिदोरी।
ऐशीच आज राहिली जरी।
नाहीं करणार भोजन तरी।
सत्य सत्य त्रिवाचा॥ ९५॥
गुरुराया कृपारासी। नका उपेक्षूं लेंकरासी।
ही शिदोरी सेवण्यासी।
यावें धावून सत्वर॥९६॥
थोर आपुला अधिकार।
क्षणांत पहाता केदार।
मग या या येथवर।
कां हो अनमान करितसां?॥ ९७॥
मी न आज्ञा तुम्हां करितो।
प्रेमाने हांका मारितों।
म्हणूनियां हा न होतो।
अपमान तुमचा यत्किंचित॥९८॥
यातून भाऊच्या मनाला होणाऱ्या यातना समजून येतात.


इकडे मठात महाराजांकरिता अनेक भक्तांनी नैवेद्याची ताटे वाढून आणली होती. त्यात नानाविध प्रकारची पक्वान्ने, मिठाई असे सर्व पदार्थ होते. बाळाभाऊ महाराजांना म्हणाले, “महाराज, बराच वेळ झाला आहे. आपण जेवण करून घ्या. म्हणजे सर्व भक्तांना जेवण करता येईल.” त्यावर महाराज बोलले, “आज माझे जेवण उशिरा (चौथ्या प्रहरी) होणार आहे.


ज्यांना थांबावयाचे असेल, त्यांनी थांबावे. ना तरी घरी जावे” आणि महाराज जेवले नाहीत. दुपारी तीनच्या गाडीने त्र्यंबक शेगावास पोहोचला, तर महाराज त्याची वाट बघत होते. ते भाऊला म्हणाले, “वाह, बरीच मेजवानी केलीस आम्हाला.” त्यावर भाऊ म्हणाला, “काय करू महाराज? बाराची गाडी सुटून गेली, आता आलो.” बाळाभाऊ म्हणाले, “काय आणले महाराजांना जेवण्याकरिता?” त्र्यंबकाने सर्व पदार्थ काढून बाळाभाऊंजवळ दिले. त्यात लोणी माखलेल्या ३ भाकरी, पिठले, कांदे व हिरवी मिरची असे पदार्थ होते. त्यापैकी २ भाकऱ्या महाराजांनी ग्रहण केल्या आणि उर्वरित एक भाकरी भक्त मंडळींमध्ये प्रसाद म्हणून वाटून दिली. भाऊने तिथेच प्रसाद घेतला.


त्यांतील भाकरी दोन। समर्थें केल्या भक्षण।
एकीची तो प्रसाद म्हणून।
अवघ्या भक्तां वांटिली॥१७॥
तो प्रकार पहातां। आश्चर्य झालें समस्तां।
कळली स्वामींची योग्यता।
खरेच भक्तवत्सल ते॥१८॥
जेवीं हस्तिनापुरांत। भगवंतानें ठेविला हेत।
सोडून पक्वानाप्रत।
विदुराच्या हुलग्यांवरी ॥१९॥
तैसेंच येथें आज झालें।
आमचें पक्वान्न नाहीं रुचलें।
भाकरीवरी गुंतलें।
चित्त कवराच्या स्वामींचें ॥१२०॥
भाऊंनीही घेतला। समर्थप्रसाद शेगांवला।
सद्भाव येथें उदेला।
तेथें ऐसेंच होणार॥२१॥
समर्थ बोलले कवरासी।
जा आतां अकोल्यासी।
पास होशील पुढचे वर्षी।
तूं डॉक्टरी परीक्षेत॥२२॥
महाराजांनी भाऊला “तुझा डॉक्टरीचा अभ्यास यशस्वीरीत्या पूर्ण होईल” असा आशीर्वाद दिला. अशा रीतीने त्र्यंबक कवर या भक्ताची महाराजांना जेवू घालण्याची इच्छा श्रीमहाराजांनी पूर्ण केली. अनेक भक्तांनी आणलेली पंचपक्वान्ने ग्रहण न करता महाराज तोपर्यंत उपाशीच राहिले. खरेच भक्तवत्सल ते….


क्रमश:



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव आणि मोदकांची गोड परंपरा! बाप्पासाठी १० दिवस १० प्रकारचे हटके मोदक बनवा, ही सोपी रेसिपी पहा

गणेश चतुर्थी म्हटली की महाराष्ट्रात उत्साह, भक्ती आणि आनंदाचा सोहळा सुरू होतो. हा केवळ धार्मिक सण नसून, प्रत्येक

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला ‘या’ राशी आहेत सर्वाधिक प्रिय, त्यांना मिळणार गुडन्यूज

मुंबई: गणेश चतुर्थी हा सण लवकरच येत आहे आणि देशभरातील गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

Ganpati Arati : सुखकर्ता, दु:खहर्ता...! गणेशोत्सवात घर दुमदुमवणाऱ्या लोकप्रिय ५ आरत्या

१. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पा मोरया! या सोप्या पद्धतीने करा बाप्पाची प्राण प्रतिष्ठा, मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या

मुंबई : गणेशभक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण