‘चांदोबा चांदोबा भागलास का… निंबोणीच्या झाडामागे लपलास का… निंबोणीचं झाड करवंदी… मामाचा वाडा चिरेबंदी’
हे ग. दि. माडगूळकर यांचे गाणे आजही आबालवृद्धांच्या ओठावर ऐकायला येते. आज या चंद्रमाचे अनोखे दर्शन देशवासीयांना झाले. ४० दिवसांचा चांद्रयान-३ चा यशस्वी प्रवास चंद्रावर थांबला आणि भारत मातेच्या पुत्रांनी आज चंद्राला आपलेसे केल्याने भारताने इतिहास रचला. देशभर जल्लोष साजरा झाला. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असतानाही व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होऊन वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. ‘हा क्षण भारताच्या ताकदीचा आहे. हा भारतातील नव्या ऊर्जेचा, नव्या विश्वासाचा, नव्या चेतनेचा क्षण आहे. अमृत काळात अमृताचा वर्षाव झाला. आपण पृथ्वीवर एक प्रतिज्ञा घेतली आणि ती चंद्रावर साकार केली. अंतराळात नव्या भारताच्या नव्या उड्डाणाचे आपण साक्षीदार आहोत,’ असे मोदी म्हणाले. चंद्राच्या कोणत्याही भागात यान उतरवणारा आपला भारत देश हा चौथा देश मानला जातो. यापूर्वी केवळ अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीनने हे यश मिळवले आहे. मात्र, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला आहे.
चांद्रयान-३ हे चांद्रयान-२ चे फॉलो-ऑन मिशन म्हणजे पुढील टप्पा होता. चांद्रयान-३ मध्ये लँडर आणि रोव्हर पाठवण्यात आला होता. चांद्रयान-३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करेल. त्यानंतर विक्रम लँडरमधील रोव्हर तेथील पाण्याचे साठे शोधणे आणि चंद्रावरील माती, दगड यांचे नमुने आणि इतर आवश्यक माहिती गोळा करेल. त्यासाठी चांद्रयानच्या लँडरचे नाव विक्रम आणि रोव्हरचे नाव प्रज्ञान ठेवण्यात आले होते. भारतासाठी अत्यंत अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि गौरवाची असलेली चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आता सूर्य आणि शुक्र ग्रहाबाबत विशेष मोहीम आखण्याचा संकल्प करा, असा ऊर्जावान संदेश भारतीय शास्त्रज्ञांना दिला आहे. २०१९मधील चांद्रयान-२ चा अनुभव लक्षात घेऊन इस्रोने चांद्रयान-३ साठी संपूर्ण काळजी घेतली. विक्रम लँडरच्या मागे-पुढे आणि वरील बाजूस अँटेना जोडण्यात आलीत. त्यामुळे लँडर मॉड्युलच्या स्थितीच्या प्रत्येक ससत काळजी घेतली होती. या आधीही अंतराळ क्षेत्रात भारताने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने ३० जुलै रोजी एकाच वेळी ७ उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते. यामध्ये एक स्वदेशी आणि सिंगापूरच्या सहा उपग्रहांचा समावेश आहे.
हे उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून PSLV-C56 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले होते. सिंगापूरने पृथ्वीचे निरीक्षण करणारे उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी इस्रोची मदत घेतली. त्यासाठी इस्रोच्या PSLV-C56 रॉकेटद्वारे सिंगापूरच्या DS-SAR आणि इतर ६ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. या सर्व उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले. चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण करत असताना इस्रोची ही आणखी एक यशस्वी कामगिरी आहे. पृथ्वीच्या बाहेर चंद्र हा एकमेव खगोलीय पिंड आहे जिथे मानव पोहोचला आहे. आतापर्यंत १०० हून अधिक अंतराळयान चंद्रावर पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी २४ मानव चंद्रावर उतरले आहेत, त्यापैकी १२ लोक त्याच्या पृष्ठभागावरदेखील चालले आहेत. पृथ्वीवरील प्रयोगांसाठी चंद्रावरून आतापर्यंत ३८२ किलो माती आणि दगड आणण्यात आले आहेत.
चांद्रयान-१ या आपल्या पहिल्या अंतराळातल्या दूरवरच्या चंद्र मोहिमेचे अंतर्गत इस्रोने ऑक्टोबर २००८ मध्ये मूल्यमापन करताना जी निरीक्षणे नोंदवली आहेत, त्याप्रमाणे, “चंद्राच्या पृथ्वीपासून जवळच्या आणि अत्यंत दूरच्या अशा दोन्ही बाजूंचे त्रिमितीय नकाशे तयार करणे आणि चंद्राच्या संपूर्ण पृष्ठभागावरच्या रासायनिक तसेच खनिज उपलब्धतेचे नेमके नकाशा रेखाटन करणे हे प्राथमिक उद्दिष्ट होते. चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी आणि हायड्रॉक्सिलचे अस्तित्व असल्याचे मिळालेले पुरावे हा चंद्रयान-१ या मोहिमेअंतर्गत लावलेला मोठा शोध आहे. तिथल्या ध्रुविय क्षेत्रात पाणी आणि हायड्रॉक्सिल विपुल प्रमाणात असल्याची माहितीही या शोधासंदर्भातल्या माहिती साठ्यातून समोर आली आहे. पाण्याचे अस्तित्व असल्याच्या पुराव्यांच्या शोधाशिवाय, इस्रोने चंद्राच्या पृष्ठभागावर टिटॅनिअम, कॅल्शिअम, ॲल्युमिनिअम आणि मॅग्नेशिअमसारखी खनिजे असल्याचाही शोध लावला असून त्याचेही पुरावे मिळवले.
एखाद्या सामान्य व्यक्तीला यात विशेष असे काही जाणवणार नसले तरी, जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष इस्रोच्या संशोधनाकडे लागले आहे. सामान्य माणसांसाठी चंद्रयानाचा ऑर्बिटर उपग्रह म्हणजे मोहीम नाही, असे वाटते असले तरी इस्रोच्या शास्त्रज्ञांसाठी हा ऑर्बिटर म्हणजे अशी एक मोहीम पार पाडण्यासाठी तयार केलेली कृत्रिम तांत्रिक वस्तू आहे, जी चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी आणि खनिजांचे अस्तित्व शोधण्यासाठीची मोहीम पार पाडण्यासाठी तयार करण्यात आली. चंद्राची भौगोलिक स्थिती, चंद्राच्या पृष्ठभागावरच्या खनिजांची उपलब्धता याविषयी समजून घेणे हा चंद्रयान-१ या मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट होते. आता आपल्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-३ ची मोहीम यशस्वी केली आहे. सूर्य चंद्राला दैवत्व देऊन त्याची पूजा करणाऱ्या भारताने आता वैज्ञानिक प्रगतीतून जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी केली आहे.