प्लास्टिकचा पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेच्या विशेष पथकांनी १ जुलै २०२२ पासून संपूर्ण मुंबई महानगरात प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू केली होती. मधल्या काळात ही कारवाई थंडावली होती. आता पुन्हा सोमवारपासून मुंबई महापालिकेच्या हद्दीत प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी सुमारे ८७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले, तर दोन लाख ९५ हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक) अधिसूचना, २०१८ प्रकाशित केली आहे. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या असून एकल वापराच्या म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिक वस्तू उत्पादन, वापर, वाहतूक, वितरण, घाऊक आणि किरकोळ विक्री आणि साठवणूक यावर बंदी घालण्यात आलेली आहे. यानंतर केंद्र शासनानेही सिंगल यूज प्लास्टिक अधिसूचना ही १२ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकाशित केली होती. महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना २०१८ आणि केंद्रीय शासनाची सिंगल यूज प्लास्टिक अधिसूचना २०२१ अंतर्गत खालील वस्तूंचे उत्पादन, उपयोग, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवण प्रतिबंधित आहेत.
सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्स), हॅण्डल असलेल्या व नसलेल्या (सर्व जाडीच्या) नॉन ओव्हन पॉलिप्रॉपीलीन बॅग्स – ६० ग्रॅम प्रति चौरस मीटर (स्क्वेअर मीटर), (जीएसएम) पेक्षा कमी वजन असलेल्या प्लास्टिक डिश, बाऊल, कॅन्टेनर (डबे), प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टिरर्स) इत्यादी, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक भांडे व वाटी (कंटेनर व बाऊल) प्लास्टिक कोटिंग तसेच प्लास्टिक थर असणाऱ्या पेपर/अॅल्युमिनियम इत्यादींपासून बनविलेल्या डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटे, वाडगा, कंटेनर इत्यादींचा समावेश आहे. तसेच सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकॉल मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटच्या पाकिटावरील प्लास्टिकची आवरणे, प्लास्टिकच्या काड्यांसह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी कांड्या, आईस्क्रीम कांड्या, प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर (१०० मायक्रॉनपेक्षा कमी) आदींचा यामध्ये समावेश आहे. प्लास्टिक बंदीचे नेमके निकष काय आहेत याबाबत बाजारातून वस्तू खरेदी करणारा सर्वसामान्य ग्राहक अनभिज्ञ आहे.
या बंदीमुळे पर्याय काय आहे याबाबत त्याला पुरेशी माहिती नसल्याने, काहीसा बाजारात गोंधळ उडाला आहे. ज्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली त्यांना पाच हजार दंड ठोठावण्यात आल्याने, काही दुकानदारांची दिवसभराची कमाई दंड रक्कमेत गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्लास्टिकच्या पिशव्यांचे उत्पादन करणारे कारखाने माहिती असताना त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा साध्या दुकानदारांना टार्गेट करून फायदा काय असा प्रश्न यानिमित्ताने छोट्या दुकानदारांकडून उपस्थित केला जात आहे. एकूण पर्यावरण आणि मानवी आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, प्लास्टिक बंदीचे कोणीही समर्थनच करेल. प्लास्टिकचा शोध बराच आधी लागला तरी दुसऱ्या महायुद्धानंतर प्लास्टिकने सारे जग वेगाने काबीज केले. आज जगाची लोकसंख्या सात अब्ज सहाशे कोटी आहे. यातल्या प्रत्येक जीवाच्या नावावर आज निदान एक टन प्लास्टिक जमा आहे. यातले ७०-८० टक्के प्लास्टिक जगभर कचऱ्याच्या रूपात पडून आहे.
पृथ्वीवरील महासागरांमधील जलचरांचे वजन आणखी ३० वर्षांनी सागरातील प्लास्टिकपेक्षा कमी भरणार आहे! प्लास्टिक हे नैसर्गिकरीत्या तयार होणारे उत्पादन नाही, त्याऐवजी ते हळूहळू प्लास्टिकच्या लहान तुकड्यांमध्ये मोडतात ज्याला मायक्रोप्लास्टिक म्हणतात. तरीही त्याचा नाश होत नाही. त्यात एक प्रकारचा रासायनिक घटक आढळतो, जो मातीसह जलमार्गाने जलाशयात पोहोचतो आणि तेथे राहणाऱ्या प्राण्यांना हानी पोहोचवतो. तो जमिनीत किंवा पाण्यात विरघळत नाही. या कारणास्तव प्लास्टिक अत्यंत हानिकारक आणि नाशवंत आहे. काही प्लास्टिकच्या वस्तू जसे की पिशव्या इत्यादींचे विघटन होण्यास बराच वेळ लागतो आणि या दरम्यान ते आपली माती आणि पाणी दोन्ही प्रदूषित करते. प्लास्टिक तयार करण्यासाठी काही विषारी रसायने वापरली जातात जी प्रथम प्राण्यांच्या उतींमध्ये रूपांतरित होतात आणि नंतर मानवी अन्न साखळीत प्रवेश करतात. मग या पदार्थांचे सेवन केल्याने ते आपल्या शरीरात पोहोचते आणि त्याचाही परिणाम होतो. असे प्लास्टिक प्राणी किंवा मानवाने खाल्ल्यास त्यांच्या मज्जासंस्थेला, फुप्फुसांना आणि इतर काही अवयवांना मोठे नुकसान होऊ शकते. सजीव प्राणी आणि मानवी शरीराव्यतिरिक्त त्याचा पर्यावरणावरही परिणाम होतो.
प्लास्टिकची उत्पादने मातीत मिसळली की, त्यामध्ये आढळणारी घातक रसायनेही मातीत मिसळतात. त्याचा विपरीत परिणाम होतो, या शास्त्रीय बाबी आहेत; परंतु सर्वसामान्य जनतेला शिस्त लावण्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे. कारण आज-काल प्लास्टिकच्या पिशव्या बाजारात मोठ्या प्रमाणात दिसतात, पण त्याऐवजी तुम्ही बाजारातून कापडाची किंवा ज्यूटची कॅरीबॅग विकत घ्या आणि ती सोबत घेऊन जा, असे सांगण्याची गरज आहे. घरोघरी दूध ही अत्यंत गरजेची वस्तू आहे. तीस वर्षांपूर्वी मुंबईत आरेचे स्टॉल असायचे. त्यावेळी काचेच्या बाटलीतून दूध वितरीत केले जात असे.
आता प्लास्टिकच्या बॅगमधून मोठ्या प्रमाणात दूध वितरीत केले जाते. जशी प्लास्टिक बंदीची मोहीम प्रशासनाने तीव्र केली आहे, तशी मुंबईतच नव्हे तर राज्यात दूध वितरण करताना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये इंजेक्शनचा वापर करून त्यात भेसळ केल्याच्या अनेक तक्रारी या आधी प्राप्त झालेल्या आहेत. लहान मुलांच्या नव्हे तर सर्वसामान्य माणसांच्या आरोग्याशी निगडित दूध भेसळ रोखण्याचा प्रयत्न प्रशासनाने करायला हवा. त्यासाठी पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन विभाग यांची मुंबई महापालिका प्रशासनाने मदत घ्यायला हवी. आता ही कारवाई प्रशासनाच्या माध्यमातून कधीपासून जोमाने सुरू होणार आहे याकडे लक्ष द्यावे लागेल.
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…