Thursday, September 18, 2025

BMC : मुंबईत पुढील २४ तास अनेक भागात पाणी कपात!

BMC : मुंबईत पुढील २४ तास अनेक भागात पाणी कपात!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) मुंबईतील एम पूर्व (M East) आणि एम पश्चिम (M West) भागामध्ये २४ आणि २५ ऑगस्ट या दिवशी पाणी बंद (Water cut) राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सकाळी १० पासून पाणी बंद राहणार असल्याचे पालिकेने कळवले आहे.

एम पश्चिम मध्ये चेंबूर आणि एम पूर्व मध्ये मानखुर्द, देवनार आणि शिवाजी नगर या भागाचा समावेश आहे. या भागामध्ये दुरूस्तीच्या काही कामांसाठी पाणी कपात केली जाणार आहे. पालिका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रॉम्बे उच्च-स्तरीय जलाशय (Trombay High-Level Reservoir) मध्ये हे काम केले जाणार आहे. ट्रॉम्बे उच्च-स्तरीय जलाशय चेंबूरच्या अणुशक्ती नगर येथे आहे.

याव्यतिरिक्त, महानगरपालिकेने गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान १,८०० मिमी इनलेटचा वापर करून पुन्हा पाणी भरण्याची योजना आखली आहे.

महानगरपालिकेने संपूर्ण पाणीकपात लागू होणाऱ्या भागांची यादी जाहीर केली आहे. अधिकार्‍यांनी प्रभावित वॉर्डातील रहिवाशांना पुरवठा निलंबन लागू होण्यापूर्वी पुरेसा पाणीसाठा सुनिश्चित करण्याचे आवाहन केले आहे. महानगरपालिकेने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये पुरवठा खंडित होण्याच्या कालावधीत पाणी भरून ठेवत रहिवाशांच्या सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मंगळवारी पाण्याची पाईपलाईन तुटल्याने महानगरपालिकेच्या एच वेस्ट वॉर्डमध्ये खार दांडा येथील काही भागाचा पाणीपुरवठा प्रभावित झाला. मोहम्मद रफी चौकात पाईप खराब झाला आहे. वांद्रे पश्चिमेला मेट्रो रेल्वेचे काम सुरू असल्याने त्याचा परिणाम झाला आहे. खार दांडा, गझदरबंध, दांड पाडा आणि खारच्या काही भागांना पाणीपुरवठा होण्यास विलंब झाला असल्याचे बीएमसीच्या एच वेस्ट वॉर्डने ट्विटरवर म्हटले आहे.

दरम्यान, महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या मुंबई तुळशी, तानसा, विहार, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या सात जलाशयांमधील एकत्रित पाणीसाठा आता १२,११,६८६ दशलक्ष लिटर किंवा ८३.७२ टक्के इतका आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment