
सर्व्हरच्या समस्येमुळे सोबत आलेला नवरा संतप्त
अमरावती : आज महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये तलाठी भरती परीक्षा पार पडते आहे. परंतु सर्व्हर डाऊन (Server Down ) असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे. सध्या ही समस्या सुटली असून विद्यार्थ्यांना हळूहळू आत सोडण्यात येत आहे, मात्र या गोंधळामुळे विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्यासोबत आलेले नातेवाईकही संतप्त झाले आहेत. अमरावतीच्या (Amravati) परीक्षा केंद्रावर एक महिला आपल्या एक वर्षाच्या तान्ह्या मुलाला घरी ठेवून तलाठीची परीक्षा देण्याकरता आली होती. तिच्यासोबत तिचा नवरा देखील याठिकाणी आला होता. यावेळेस घरी असलेल्या मुलाच्या काळजीने बापाने संतप्त प्रतिक्रिया दिली.
त्या बापाने सांगितले की, मी माझ्या पत्नीसोबत इथे आलो होतो. आमचं बारा महिन्यांचं मूल घरी ठेवून आम्ही इथे आलो आहोत. सकाळी सहा वाजता आम्ही इथे पोहोचलो आणि त्या गडबडीत अजून नाश्ताही केलेला नाही. परिक्षेसाठी यांनी नऊची वेळ दिली होती आणि आता दहा वाजल्यानंतर हे मुलांना आत सोडत आहेत. आता आम्ही घरी कधी जाऊ आणि मुलाला कधी पाहू? हे अधिकारी फक्त अरेरावी करतात. पण यांनी ही समस्या आधीच सोडवायला हवी होती. तांत्रिक बिघाडाचे कारण देता पण परीक्षा तर तीन दिवस सुरु आहे, मग तेव्हा ही समस्या कशी नाही उद्भवली? ९०० रुपये फी तुम्ही कशासाठी घेतली? हा सगळा ओंगळ कारभार आहे, दुसरं काही नाही, अशी प्रतिक्रिया चिंताग्रस्त बापाने दिली.
महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या ४ हजार ६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या जागांसाठी राज्यातून १० लाख ४१ हजार इच्छुकांनी अर्ज सादर केला आहे. तलाठी पदाच्या परीक्षेच्या शुल्कावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आता ऐन परीक्षेच्या वेळी मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला होता. सध्या सर्व्हरची समस्या अनेक केंद्रांवर सुटली असून परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यात येत आहे.