दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
स्त्रीही सोशिक असते. तिच्यावर कितीही अन्याय झाला तरी ती कोलमडून न जाता त्यावर जिद्दीने मात करत पुन्हा उभी राहते. आलेल्या संकटाशी मोठ्या धैर्याने दोन हात करते. संधी मिळताच स्वत:ला सिद्ध करते. तिची कथा काही अंशी अशीच आहे. घरात मुलगी असताना पुन्हा मुलगीच जन्माला आल्यामुळे तिची आई खिन्न झाली होती. तिनं त्या मुलीकडे लक्षच दिलं नाही. आई असूनसुद्धा ती चिमुरडी मायेला पोरकी झाली होती. मात्र तिच्या बाबांनी तिला एखाद्या मुलाप्रमाणेच वाढवलं, शिकवलं. लग्नानंतर सुख येईल असं वाटलेलं, पण हे दुष्टचक्र कायम राहिलं. आयुष्यभरासाठी मिळालेला जोडीदार दारू पिऊन यायचा आणि दारूच्या नशेत प्रचंड मारायचा. सुख हे जणू तिच्या नशिबी नव्हतंच मुळी. मात्र त्याच वेळी तिचं जीवन सावरलं ते भारतीय प्राचीन जीवनशैलींनी. विपश्यना, निसर्गोपचारामुळे ती सावरली. इतरांना मार्ग दाखवू लागली. शेणापासून विविध कलाकृती महिलांना शिकवून त्यांच्यासाठी ती सामाजिक उद्योजिका झाली. ही गोष्ट आहे नागपूरच्या डॉ. साधना कनोजे यांची.
विदर्भातील मागासलेला एक जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. या भंडारा जिल्ह्यातील तुमसर गावात फत्तुलालजी कनोजे आणि सिंधुताई कनोजे हे दाम्पत्य राहत होते. फत्तुलालजी महाराष्ट्र शासनाच्या सिंचन विभागात अधिकारी पदावर कार्यरत होते. या कनोजे दाम्पत्यास ५ मुली आणि १ मुलगा. कनोजे दाम्पत्यास दुसऱ्यांदा मुलगी झाल्यावर त्या मुलीच्या आजोबांनी सिंधुताईंनाच दोष दिला. याचा परिणाम मात्र आयुष्यभर त्या मुलीला भोगावे लागले. लहानपणापासून देखण्या असणाऱ्या त्या मुलीला सिंधुताईंनी कधी मायेने जवळ घेतले नाही. सख्खी आई असून सुद्धा इतर भावंडांच्या तुलनेत दुर्लक्ष केले. या सापत्न वागणुकीमुळे या दुसऱ्या मुलीच्या, साधनाच्या मनावर आणि शरीरावर परिणाम दिसू लागले. ती कमालीची अशक्त झाली आणि मनामध्ये न्यूनगंड देखील कमालीचा निर्माण झाला.
पुढे ती शाळेत जाऊ लागली. प्राथमिक शिक्षण तिरोरा जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले, तर बारावीपर्यंतचं शिक्षण तुमसर जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्याकाळी ग्रामीण भागात विशेषत: दहावी-बारावी झाली की डी.एड करण्याची जणू प्रथाच होती. डी.एड केल्याने शिक्षकाची नोकरी पक्की असं काहीसं ते गणित होतं. साधनाने डी.एड गोंदियाच्या दंडेगावमधून केले. त्यानंतर बीए आणि एमए तुमसरच्या एस. एन. मोर महाविद्यालयातून पूर्ण केले. पुढे गोंदियाच्या अध्यापक विद्यालयातून बी.एडची पदवी प्राप्त केली. तुमसरच्याच एका संगीत विद्यालयातून साधना हार्मोनियम आणि शास्त्रीय गायन यामध्ये संगीत विशारद झाली.
पुढे तिने बी.ए.एम.एस, डी.एन.वाय.एस (डिप्लोमा इन नॅचरोपथी ॲण्ड योगिक सायन्स) आणि योगविद्येमधील टी.टी.सी. ही पदवी पण मिळवली. आता ती निसर्गोपचारतज्ज्ञ डॉक्टरसोबत एक आहारतज्ज्ञ म्हणून देखील ओळखली जाते. मन आणि देहाने अशक्त मुलगी एवढ्या पदव्या मिळवेल, असा कोणी विचार देखील केला नसेल.
खरं तर याची सुरुवात झाली, ती मुळातच निसर्गोपचार केंद्राने. कोणीतरी अशक्त देहाच्या त्या चिमुरड्या साधनाला कोटांगले गुरुजींकडे नेले. त्यांनी साधनाला एक नैसर्गिक काढा पिण्यास दिले आणि नियमितपणे त्याचे सेवन करण्यास सांगितले. तो प्यायल्यानंतर काहीच दिवसांत तिच्यामध्ये फरक जाणवायला लागला. पुढे महात्मा जगदीश्वरानन्दजींसारखे गुरू साधनाला लाभले. साधना त्यांच्या आश्रमात जाऊ लागली. ध्यानधारण, विपश्यना तिने केले. निसर्गोपचार शिकली. यामुळे तिचा शारीरिक आणि मानसिक विकास झाला. मनाने आणि शरीराने ती सशक्त झाली. पुढे तिने अनेक पदव्या प्राप्त केल्या. एका शाळेत शिक्षिका म्हणून ती शिकवू लागली. दरम्यान तिचं लग्न झालं. मात्र व्यसनी असलेला पती आयुष्यात आला होता. प्रसंगी तो मारहाणसुद्धा करायचा. एकीकडे आईचं प्रेम कधीच न मिळालेली साधना आयुष्यभराच्या जोडीदाराकडून सुद्धा प्रेमासाठी वंचितच राहिली. तिच्या जागी कोणी दुसरी असती, तर कदाचित तिने स्वत:ला संपवलं असतं. मात्र साधनाला सावरलं ते ती शिकलेल्या विद्यांनी, गुरूंनी आणि या मातीतल्या निसर्गोपचारांनी.
आपण जे काही शिकलो ते आता समाजाला पुन्हा परत करायचे, या ध्यासाने तिने डॉ. कनोजे नॅचरोपथी नावाचे निसर्गोपचार प्राकृतिक चिकित्सा केंद्र आणि अष्टांग योगसाधना केंद्र सुरू केले. या केंद्राच्या माध्यमातून पंचकर्म, पंचगव्य, चिकित्सा आणि प्रशिक्षण आदी सेवा दिल्या जातात. अनेक लोकांनी या केंद्राचा लाभ घेतला असून ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ झाले आहेत. पंचकर्म आणि पंचगव्य या उपचार पद्धतींचा लाभ घेण्यासाठी विदर्भ, महाराष्ट्र तसेच देशातील काही भागातून घेण्यासाठी लोक या केंद्रात येतात. देशी गाय हे भारतासाठी वरदान आहे ज्याचे प्राचीन काळापासून पूजन केले जाते.
“देशी गाईचे दूध, दही, तूप हे नैसर्गिकदृष्ट्या गुणकारी आहेच. पण गायीच्या शेणात किरणोत्सर्ग रोखण्याची ताकद असते. शेणाचा हाच गुण ध्यानात घेऊन आम्ही आमच्या केंद्रात शेणापासून शोभिवंत वस्तू तयार करतो. ज्याला जगभर प्रचंड मागणी असते.” असे डॉ. साधना कनोजे सांगतात. भिंतीवरील घड्याळ, वाणसामान ठेवण्यासाठी डब्बे, मोबाइल ठेवण्याचा स्टॅण्ड तसेच घर सजविण्यासाठी आवश्यक असणारे तोरण आणि तत्सम अनेक शोभिवंत वस्तू या केंद्रामार्फत तयार केल्या जातात, यामुळे सहा महिलांना थेट रोजगार मिळतो. गोवंश आणि शेणाचे गुणकारी लाभदेखील लोकांना समजतात. या केंद्राच्या माध्यमातून त्या २० महिला आणि ७ पुरुषांना रोजगार देतात. खऱ्या अर्थाने हे महिला सबलीकरणाचे केंद्र आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
डॉ. कनोजे नॅचरोपॅथी नेचरक्युअर इन्स्टिट्यूटतर्फे एक वर्षाचा नॅचरोपॅथी डिप्लोमा चालविण्यात येतो. या अभ्यासक्रमामध्ये माती, पाणी, हवा, सूर्यप्रकाश, औषधी वनस्पती, ॲक्युप्रेशर, रसाहार, चुंबक चिकित्सा, मसाज, योगासन, प्राणायाम, सुजोक, आहार चिकित्सा इत्यादी अनेक उपचार पद्धती शिकवण्यात येतात. भारतीय प्राकृतिक चिकित्सा संघ, दिल्ली व इंडियन बोर्ड ऑफ नॅचरोपथी, नवी दिल्ली यांची या अभ्यासक्रमास मान्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दिल्ली येथील कार्यालयाने या अभ्यासक्रमाची दखल घेतलेली आहे. हा अभ्यासक्रम इतर व्यवसाय वा शिक्षण घेऊन सुद्धा करता येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास निसर्गोपचार केंद्र/ योग केंद्र चालविता येते. ॲक्युप्रेशर मसाज केंद्र चालविता येते, चुंबकीय उपकरणाची विक्री करता येते. आयुर्वेदिक फळभाज्या/ ज्यूस सेंटर चालविता येते, हेल्थ फूड शॉप, नॅचरोपॅथी ब्युटी पार्लर व हेल्थ क्लब चालविता येते तसेच आहारविषयक सल्लागार बनता येते.
डॉ. साधना कनोजे हे नैसर्गिक पद्धतीने शेती करत. त्यामध्ये कोणत्याही रासायनिक खतांचा वा औषधांचा वापर केला जात नसे. त्यामुळे या शेतातील अन्नधान्य खाल्ल्याने सुदृढ शरीर तयार होत असे. साधना कनोजे या नैसर्गिक शेतीचा आग्रह धरतात. लोकांनी या पद्धतीने शेती करावी यासाठी त्या अनेक शिबिरे घेतात. तसेच सेंद्रिय अन्नधान्याचे विक्री केंद्रदेखील चालवतात. लोकांनी नैसर्गिक पद्धतीच्या अन्नधान्याचे सेवन केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. “जर आपण योग्य आहार घेतला, तरच आपले शरीर आणि मन चांगले राहील”, असे त्या म्हणतात. निसर्गोपचार, पंचकर्म, पंचगव्य हे सारं काही प्राचीन भारताची संस्कृती आहे. ज्याचा जगभरातील लोक लाभ घेत आहेत. मात्र आपल्या येथे हे शास्त्र लुप्त होईल की काय अशा अवस्थेत आहे. सर्वसामान्यांचे जीवन सशक्त करण्यासाठी, भारतीयांना मानसिकदृष्ट्या कणखर करण्यासाठी हे सारं प्राचीन शास्त्र तळागाळात नेण्याचे कार्य भविष्यात करण्याचा मानस डॉ. साधना कनोजे व्यक्त करतात.
स्त्री ही नेहमीच पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये दबली गेली. मात्र जेव्हा तिला संधी मिळाली, तेव्हा तिने जगाचे हित केले आहे. खऱ्या लेडी बॉसचे हेच लक्षण आहे. डॉ. साधना कनोजे त्यादृष्टीने ‘लेडी बॉस’ ठरतात.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…