मराठवाडा वार्तापत्र : डॉ. अभयकुमार दांडगे
केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत देशातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच पार पडले. या अंतर्गत महाराष्ट्रातील ४४ पैकी नांदेड विभागातील १४ रेल्वे स्थानकांचे रूप पालटणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात रेल्वेचे जाळे वाढविण्यावर यामध्ये भर देण्यात आला आहे. भाजपच्या वतीने मराठवाड्याला दिलेली ही सर्वात मोठी भेट ठरणार आहे.
मनमाड ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्ग दुहेरी होणार आहे. यासाठी ९६० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. भविष्यात या मार्गाचे दुहेरीकरण होणार असल्याने याचा फायदा दळणवळणासाठी तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी होणार आहे. मराठवाड्यातील जालना ते जळगाव तसेच जालना ते खामगाव या दोन्ही मार्गांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत जवळपास तब्बल २५ हजार कोटी रुपये रेल्वेच्या प्रवाशांना सर्व सुख-सोयी प्रदान करण्यासाठी खर्च होत आहेत. याचा थेट लाभ रेल्वे प्रवाशांना होणार आहे. अमृत भारत स्टेशन योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश असून यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीसह दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील १४ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यात नांदेड जिल्ह्यातील मुदखेड व किनवटचा समाविष्ट आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड आणि नांदेड जिल्ह्याला मोठा लाभ मिळणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेड भेटीत विकासाचा अनुशेष आम्ही दूर करू, असा विश्वास दर्शविला होता.
गृहमंत्री शहा यांच्या दौऱ्यानंतर मराठवाड्याला अनेक योजनांद्वारे भरभरून निधी मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड रेल्वे स्थानकासाठी २३ कोटी दहा लाख रुपये, तसेच किनवट येथे २३ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत रेल्वे स्थानक उभारण्यात येणार आहे. या विकास प्रकल्पात रेल्वेची इमारत, पार्किंग व्यवस्था तसेच दर्जेदार प्रतीक्षालय, लिफ्ट, एस्केलेटर, पादचारी पूल, व्हीआयपी कक्ष आदींसह स्थानकाचे पूर्ण रूप बदलण्यात येणार आहे. याबरोबरच रेल्वे विद्युतीकरण प्रगतिपथावर असून नवीन वंदे भारत रेल्वे मराठवाड्यात सुरू होणार आहे. भाजपमुळे मराठवाड्यात ही विकासाची गंगा वाहत असून याचे श्रेय घेण्यासाठी मात्र भाजपेतर पक्षाचे खासदार, आमदार तसेच माजी मंत्र्यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मराठवाड्यातील जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या पुढाकाराने मराठवाड्यात रेल्वेविषयक अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. लातूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी १९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील नऊ वर्षांच्या काळात लातूर रेल्वे स्थानकावरून अनेक नव्या रेल्वे गाड्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षण, कृषी उद्योगात आघाडीवर असलेल्या लातूर जिल्ह्यातील नागरिकांना प्रवास करणे अत्यंत सुलभ झाले आहे. वंदे भारत या अत्याधुनिक रेल्वेच्या कोचची फॅक्टरी लातूरमध्ये असल्याने स्थानिक लोकांना रोजगारदेखील उपलब्ध होत आहे. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी पायाभरणीचा कार्यक्रम रेल्वे स्थानक परिसरात पार पडला. परभणी जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, गंगाखेड आणि सेलू या रेल्वे स्थानकांचा अत्याधुनिक सुविधांनी पुनर्विकास करण्यात येणार आहे.
दरम्यान, धाराशिव येथील रेल्वे स्थानक नूतनीकरण समारंभात राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांना डावलल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. रेल्वे स्थानक नूतनीकरणाच्या कोनशिलेवर पालकमंत्र्यांचा नावाचाही उल्लेख न केल्यामुळे राज्यशिष्टाचाराचा भंग करणाऱ्या रेल्वे प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्याचे नेतृत्व करणारे पालकमंत्री असलेल्या नेत्याला डावलून हा कार्यक्रम आयोजित करून रेल्वे प्रशासनाकडून दुजाभावाची वागणूक दिली गेल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. देशात सध्या २५ वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी पाच वंदे भारत महाराष्ट्रासाठीच आहेत. मराठवाड्यातील लातूर येथील कोच फॅक्टरीत १०० वंदे भारत गाड्या तयार होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. यामुळे मराठवाड्याचे नाव संपूर्ण देशपातळीवर कोरले जाणार आहे.
मराठवाड्यातून विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्राला जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गांचे कामही लवकरच सुरू होणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीने मराठवाड्यातील विविध रेल्वेविषयक समस्यांची मागणी वारंवार केंद्र सरकारकडे केलेली होती. यवतमाळ, वर्धा रेल्वे मार्गाचे काम सुरू असले तरी नांदेडच्या बाजूने हे काम रखडले आहे. ते काम तत्काळ पूर्ण व्हावे, अशी मागणी मराठवाडा रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबरोबरच मनमाड-परभणी दुहेरीकरणाचे काम सुरू असले तरी ते काम तत्काळ पूर्ण झाल्यास या कामाला गती मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर या नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झालेले आहे; परंतु हे काम पूर्ण झाल्यास पुण्याला जाण्यासाठी मराठवाड्यातील प्रवाशांना जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. मराठवाड्यातील नांदेड रेल्वे डिव्हिजन अंतर्गत सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या स्थानकांवर उन्हाळी व हिवाळी विशेष रेल्वे सुरू करताना अनेकदा दुजाभाव केला जातो. ज्या मार्गावर उन्हाळ्यात जादा रेल्वेची गरज असते, त्या रेल्वे सुरू न करता रेल्वे विभाग स्वतःच्या सोयीच्या गाड्या सुरू करतात, असा येथील प्रवाशांचा अनुभव व आरोप आहे.
प्रत्यक्षात पूर्वी राज्याला रेल्वे संदर्भात अकराशे कोटींचा निधी मिळत होता. आता साडेबारा ते तेरा हजार कोटी रुपये निधी मिळत आहे. त्यामुळे रेल्वे संदर्भातील अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. मार्च २०२४ अखेरपर्यंत राज्यातील सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण केले जाणार आहे. याशिवाय नवीन रेल्वे मार्गही हाती घेतले आहेत. त्यात सोलापूर-तुळजापूर, वर्धा-यवतमाळ – नांदेड, अहमदनगर ते आष्टी, बीड ते परळी मार्गालाही मंजुरी दिली आहे. याबरोबरच जालना ते जळगाव रेल्वेमार्गाला रेल्वे बोर्डाने मान्यता दिली असून हे प्रकरण वित्त विभागाकडे पाठवण्यात आले आहे. मराठवाड्यात रेल्वे विकास कामाद्वारे प्रगतीच्या नव्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. याचे सर्व श्रेय भाजपला जात आहे.