उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून आमदार, खासदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने निघून गेले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले. निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही त्यांना बहाल केले. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात मोठा उठाव होऊन वर्ष उलटून गेले पण आपण सत्ता गमावली, मुख्यमंत्रीपद गेले यापासून मातोश्री काही बोध घेण्याच्या अजून मन:स्थितीत नाही. शिवसेनेच्या आमदार, खासदार, पदाधिकारी किंवा सामान्य शिवसैनिकांपेक्षा आपल्याला पैशाचा लोभ अधिक आहे, हेच उबाठा सेनेच्या प्रमुखांनी दाखवून दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी आणि १३ खासदारांनी मातोश्रीला सोडचिठ्ठी दिली, तेव्हापासून त्यांना गद्दार म्हणून हिणवले जात आहे. डुक्कर म्हणून त्यांची संभावना केली. शिंदे सरकारची नेहमीच मिंधे सरकार म्हणून टवाळी केली. पण हेच सर्व शिलेदार शिवसेना वाढविण्यासाठी वर्षानुवर्षे रक्ताचे पाणी करीत होते, याचा मातोश्रीला विसर पडला. जोपर्यंत ते मातोश्रीच्या नेतृत्वाखाली गप्पगुमान काम करीत होते तोपर्यंत ते चांगले होते, निष्ठावान होते, पण ज्या दिवशी त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला तेव्हापासून त्यांना गद्दार ठरवले गेले. शिवसेना फोडण्यासाठी प्रत्येकाला ५० खोकी दिली गेली असाही अपप्रचार उबाठा सेनेने वर्षभर चालवला व आजही चालवला जात आहे. शिंदे यांच्या शिवसेनेतील कोणी आमदार-खासदर नुसते कुठे दिसले की, पन्नाश खोके, एकदम ओके अशा घोषणा देऊन त्यांना अपमानीत करण्याचा सातत्याने प्रयत्न झाला. शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. पण त्यांचा सदैव मिंधे म्हणून उल्लेख करणे हे कोणत्या संस्कृतीत बसते? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्याविषयी काही भाष्य केले तर मुख्यमंत्र्यांचा अवमान झाला म्हणून राणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा कशी राबवली गेली हे सर्व महाराष्ट्राने बघितले आहे. एकनाथ शिंदे हे दिलदार व उदार मनाचे आहेत, आपल्याला वारंवार मिंधे म्हणून टोमणे मारतात व अपमान करतात म्हणून त्यांनी ठाकरे व त्यांच्या सग्या- सोयऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची फौज वापरली नाही. जो दिलदारपणा शिंदे यांच्याकडे आहे तो ठाकरे यांच्याकडे नाही.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी संस्थगित झाले. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाचे पूर्ण वस्त्रहरण केले. पैशासाठी उबाठा गट कसा उतावीळ आहे, हे त्यांनी महाराष्ट्राला सांगितले. मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे सभागृहाला एक कागद दाखवून उबाठा गटाकडून ५० कोटींसाठी एक पत्र आल्याचे सांगितले. ५० खोके, एकदम ओके अशा घोषणा देता आणि शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी आमच्या खात्यावर वर्ग करा अशी मागणी करणारे आम्हाला पत्र पाठवता. आम्हाला गद्दार म्हणायचे आणि ५० कोटी द्या म्हणून पत्र पाठवायचे… असा भांडाफोड करून मुख्यमंत्र्यांनी उबाठा सेनेची लक्तरेच राज्याच्या वेशीवर टांगली.
उबाठा सेनेच्या गटाचा कसा दुटप्पीपणा आहे, हे मुख्यमंत्र्यांनी उघड केले. निवडणूक आयोगाने खरी शिवसेना कोणती हा निर्णय दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिकृत आहे व त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. मग शिवसेनेच्या खात्यावर असलेले ५० कोटी हे उबाठा सेना आमच्या खात्यावर वर्ग करा असे कसे काय म्हणू शकते? खरे तर एकनाथ शिंदे ते पैसे आपल्याकडे ठेऊ शकले असते. तो पैसा पक्षाचा आहे. संघटनेचा आहे. शिंदे यांच्याकडे खरी शिवसेना आहे असा निकाल असताना ते पैसे उबाठाला देण्याची गरज नव्हती. पण शिंदे यांचा दिलदारपणा मोठा आहे. तुमचे पैसे आम्हाला नकोत, तुमचे आम्हाला काहीही नको असे बाणेदारपणे सांगणारे एकनाथ शिंदे यांच्यासारखा दुसरा नेता शोधावा लागेल. खरी शिवसेना आमच्याकडे आहे पण ते पैसे त्यांना देऊन टाका, त्यांचे काही आपल्याला नको अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.
मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले, आम्हाला काहीही नको. केवळ बाळासाहेबांचे विचार पाहिजेत. त्यांना फक्त पैशाचेच पडले आहे. एकनाथ शिंदे आपले आमदार, खासदार, पदाधिकारीही घेऊन गेले, तरी त्यांचा डोळा शिवसेनेच्या खात्यात असलेल्या पैशावर आहे. आमचे आमदार, खासदार, पदाधिकारी आम्हाला परत करा, असे उबाठा सेना म्हणत नाही, तर शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी आमच्याकडे वर्ग करा असे सांगत आहे. २०१९ ची लोकसभा व विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपने युती करून लढवली होती. महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेने युतीच्या बाजूने कौल दिला होता. दोन्ही निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचा दारूण पराभव झाला होता. राज्यातील जनतेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारले होते. आम्हाला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल निवडणुकीत जनतेने दिला आहे, असे स्वत: शरद पवार म्हणाले होते. मग ज्यांना लोकांनी नाकारले, त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे सरकारमध्ये मांडीला मांडी लावून कसे बसले? केवळ मुख्यमंत्रीपदाच्या लोभापायी जनतेने नाकारलेल्या पक्षांबरोबर ठाकरे यांनी सरकार कसे चालवले? ठाकरे यांनी भाजपचा विश्वासघात केला हे सर्व महाराष्ट्राने अनुभवले आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी त्यांची संभावना महाराष्ट्रातील महागद्दार अशी केली आहे.