- रवींद्र मुळे, नगर
साधारण गेल्या दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत स्वातंत्र्यानंतर शालेय शिक्षण घेणाऱ्यांना दरवर्षी या दिवशी आठवत असेल ती आपल्या महाराष्ट्रात नियमितपणे शाळेत होणारी वक्तृत्व स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील आवर्जून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी. अनेक मान्यवर वक्ते घडले या शालेय स्पर्धेतून. १ ऑगस्ट म्हणजे नित्याने अनेक शाळांमध्ये ‘टिळक’ आठवण्याचा दिवस होता.
अलीकडील काळात महाराष्ट्रातील काही महापुरुषांना, त्यांच्या कर्तृत्वाला जाणीवपूर्वक समाजाने विसरावे याचे जे प्रयत्न झाले, त्यातून या स्पर्धा कधी काळाच्या पडद्याआड गेल्या हे कुणालाच कळले नाही. शेंगाच्या टरफलाच्या गोष्टीची कितीही चेष्टा झाली तरी त्यात संस्काराची बीजे होती. ‘संत’ शब्दाच्या गोष्टीत ज्ञान आणि शिक्षण होते. शरीर सुदृढ असेल तर तुम्ही तुमच्या जीवन ध्येयाकडे अधिक चांगली वाटचाल करू शकता हा संदेश त्यांच्या चरित्रात होता. घरातील दुःखद घटनेनंतरही अग्रलेख पूर्ण करणारे टिळक आम्हाला कर्मयोग शिकवत होते. आम्हाला कळत होते अशा स्पर्धा आणि भाषणातून.
दुर्दैवाने जीवन घडवणारे आदर्श व्यक्तिमत्त्व कालबाह्य ठरवताना त्यांची बदनामी करण्याचा एक रोग अलीकडे महाराष्ट्रात वाढला आहे आणि मग त्यातून अनेक महापुरुषांची बदनामी (कुठल्या तरी पुस्तकांचे चुकीचे संदर्भ घेत) करण्याची जणू चढाओढ होताना दिसते आहे. यातून खरे तर सर्वांनीच सावरण्याची गरज आहे. महापुरुषांचे समाजाने घेण्याचे गुण याला महत्त्व देऊन त्यांच्या खासगी जीवनात घुसण्याचा प्रयत्न थांबवला पाहिजे. तार्किक आधारावर त्यांच्या कार्याचे मूल्यमापन जरूर करावे आणि समाजाला निर्णय घेऊ द्यावा पण अलीकडे हे घडताना दुर्दैवाने दिसत नाही आणि विचारवंत होऊन बसतात. असो.
यावर्षी १ ऑगस्ट रोजी दरवर्षी दिला जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार हा पंतप्रधान मोदी यांना दिला गेला. तो घोषित झाला तेव्हापासून अनेकांचा जळफळाट होत होता. मुळात गांधी आणि नेहरू या नावांचा राजकीय फायदा घेण्यासाठी अनेक प्रांतातील काँग्रेस पक्षाचे स्वातंत्र्य चळवळीतील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हे जाणूनबुजून वाळीत टाकण्याचा प्रयत्न झाला. बिहारमध्ये बाबू राजेंद्रप्रसाद, गुजराथमध्ये वल्लभभाई, पंजाबमध्ये लाला लजपतराय, बंगालमध्ये बिपिनचंद्र पाल हे जसे अडगळीत टाकले गेले तसेच अलीकडे लोकमान्य टिळक यांच्याबाबतीत झाले. त्यामुळे लोकमान्यांची कधी ही आठवण न काढणारे मोदीजी यांना पुरस्कार देणे कसे चुकीचे आहे याचे ज्ञान पाजळत होते.
आणखी एक आमच्या मराठी माध्यमकर्मी लोकांना दुःख होत होते ते म्हणजे या कार्यक्रमात शरद पवार उपस्थित राहणार होते. मग या सगळ्यांचे राजकीय कवित्व सुरू झाले होते. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, शिवाजी महाराज असे काही विषय, काही व्यक्ती ही राजकारणाच्या पलीकडची आहेत, असतात हे या मंडळींना आकलन होतच नाही ही एक महाराष्ट्राची दुर्दैवी वैचारिक दिवाळखोरी झाली आहे. आज मोदीजी यांना मिळालेला पुरस्कार यापूर्वी अनेकांना मिळाला. पण कै. पूजनीय बाळासाहेब देवरस, अटलबिहारी वाजपेयी आणि आता मोदीजी यांना मिळालेल्या पुरस्काराचे एक महत्त्व म्हणजे हे तिघे ज्या विचार विश्वात वाढले त्या विचार विश्वाचे प्रवर्तक पूजनीय डॉ. हेडगेवार हे निस्सीम टिळक भक्त होते. लोकमान्यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ काँग्रेसचे ते धडाडीने काम करत होते हे आपण विसरता कामा नये. पूजनीय बाळासाहेब यांनी या पुरस्काराची रक्कम ही देवल यांच्या म्हैसाळ येथील शोषित, पीडित समाजाच्या प्रकल्पाला दिली, तर मोदीजी यांनी लोकमान्य यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते. त्याला स्मरून नमामि गंगे प्रकल्पाला दिली, हे या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
वास्तविक मोदीजी यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व हे लोकमान्य टिळकांनी अंगीकारलेल्या जीवन ध्येयाशी जितके मेळ खाणारे आहे तेवढे आज भारतात क्वचितच कुणाचे असेल. पण असा विचार प्राकृत असतो तो विकृत डोक्यामध्ये शिरणार नसतो. अभ्यासाच्या आधारावर घटना आणि कार्यक्रम याचे समालोचन करण्याऐवजी राजकारणाची बाधा झालेले पत्रकार आणि विचारवंत ही महाराष्ट्राची अवस्था बदलण्याची गरज आहे. लोकमान्य टिळकांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. मोदीजी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. यातून विज्ञान, उत्पादन, संरक्षण, औषधे या सर्वच क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला होता. त्यासाठी शाळा काढल्या, महाविद्यालये काढली. मेकॉलेच्या प्रभावातून भारतीयांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मोदीजी यांनी पुढाकार घेऊन नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आणले आणि खऱ्या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्य उत्तर काळात
‘स्व’ चा बोध शिक्षणातून सुरू झाला. डाव्या आणि काँग्रेसी लिबरल, लोकांनी भारतीय मानगुटीवर बसवलेले मेकॉले नावाचे इंग्रजी भूत उतरवण्याचे लोकमान्यांचे अपूर्ण कार्य मोदीजींनी सुरू केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोकमान्यांनी स्वराज्याची कल्पना नुसती मांडली नाही, तर तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे ठणकावून सांगितले होते. मोदीजींनी खऱ्या अर्थाने स्वराज्याची ओळख करून देताना संसेदच्या नव्या सभागृहाची उभारणी केली. संगोल प्रतिष्ठित केले. राजपथ कर्तव्यपथ बनवले. नौदलाच्या चिन्हावर छत्रपती शिवराय यांची मुद्रा आणली. प्रजासत्ताक दिनाच्या नंतर होणाऱ्या परेडमधील इंग्रजी धून काढून भारतीय गीताची प्रतिष्ठापना केली. स्वराज्यासाठी आवश्यक असणाऱ्या कितीतरी गोष्टी ७० वर्षांत झाल्या नव्हत्या. त्या मोदीजी यांनी आपल्या ९ वर्षांत करून दाखवल्या हे निर्विवाद सत्य आहे.
विदेशी बहिष्कार हा मुद्दा आजच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत कदाचित शक्य नसेल पण मेक इन इंडियाचा मोदी यांनी दिलेला नारा हा विदेशी वस्तूंची रेष छोटी करण्यात यशस्वी ठरला आहे हे येथे आवर्जून लक्षात घ्यावे लागेल. लोकमान्य टिळकांनी भगवतगीता हा राष्ट्रीय ग्रंथ मानून कर्मयोगाचे चालते-बोलते उदाहरण प्रस्तुत केले. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला. मोदीजींनी प्रधानमंत्री झाल्यावर भेटीला येणाऱ्या परदेशी राष्ट्रप्रमुख व्यक्तींना भगवत गीता ग्रंथ देण्यास प्रारंभ केला आणि लोकमान्य टिळकांच्या गीता या ग्रंथास राष्ट्रीय ग्रंथ म्हणून असणाऱ्या धारणेला राजमान्यता दिली.
लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला गणपती उत्सव आणि शिवजयंती सार्वजनिक करत एक अधिष्ठान प्राप्त करून दिले. मोदीजी यांनी शिवरायांच्या राज्यकारभारातूनच प्रेरणा घेतली. पवारांनी सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख केला. पण येथे हे लक्षात ठेवावे लागेल. मोदीजी यांनी शिवरायांचा इतिहास वाचलेला आणि गिरवला असल्यामुळे आजवर जी गोष्ट कुठल्या सरकारने करून दाखवली नाही ती गोष्ट त्यांनी दोनदा करून दाखवली. कारण शिवराय हे मोदीजी यांच्या राज्यकारभाराचे अधिष्ठान आहे. म्हणूनच सुरतमध्ये त्यांच्या पुढाकाराने शिवरायांचा भव्य पुतळा उभा राहिला आहे.
गणपतीच नव्हे तर सर्व हिंदू देवतांचे उत्सव आज हिंदू समाज उत्साहाने सुरक्षित वातावरणात साजरे करतो आहे. उज्जैन, वाराणसीपासून सर्व मंदिरे मोकळा श्वास घेत आहेत. यामागे मोदीजी यांची हिंदू श्रद्धेवर असणारी स्वतःची जीवन जगण्याची पद्धत कारणीभूत आहे. जी लोकमान्यांना अभिप्रेत होती आणि त्यामुळेच दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेताना आज पुण्यात त्यांच्या मनात कुठलाही निधर्मी संकोच नव्हता. (बहुतेक पुण्याच्या या ग्रामदेवतेचे दर्शन घेणारे ते पाहिले पंतप्रधान असावेत.) लोकमान्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी कार्याचे महत्त्व जाणले होते आणि त्यामुळे प्रसंगी अप्रत्यक्षरीत्या काही वेळेस प्रोत्साहन पण दिले होते. चाफेकर बंधू यांच्याकडून रँडचा झालेला वध हे त्याचे उदाहरण होय. सावरकर यांच्यातील क्रांतीची ज्योत अगदी सुरुवातीलाच त्यांनी ओळखली होती. त्यामुळेच सावरकर यांना ब्रिटनमध्ये जाऊन क्रांतिकार्य करण्यास त्यांचे प्रोत्साहन होते. मोदीजी यांनी आपल्या कृतीतून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांती कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्याच प्रयत्नातून पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांचा अस्थिकलश भारतात आणून त्याचे विसर्जन केले गेले हे येथे नमूद करावे लागेल.
राजकारणाच्या शेणातच फक्त वळवळणाऱ्या ठरावीक विचारांच्या मंडळींना निषेध, काळे झेंडे दाखवण्याचा कितीही विकृत विचार मनात आला तरी पुणेकर नागरिकांनी मोदीजी यांना दिलेला उदंड प्रतिसाद हा या मंडळींच्या द्वेष पूर्ण वृत्तीला पुरेसे उत्तर देणारा होता हे सत्य आहे. महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकर यांचा नक्कीच आहे. पण महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, अाध्यात्मिक जडण- घडणीत संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांची भक्ती परंपरा, छत्रपती शिवराय ते संताजी-धनाजी यांची शौर्य परंपरा, लोकमान्य टिळक ते सावरकर राजकीय परंपरा, कर्मवीर भाऊराव पाटील, आगरकर, महर्षी कर्वे यांची शैक्षणिक परंपरा याचा पण आपला आपला वाटा आहे हे लक्षात ठेवावे लागेल. या सर्वांचा मिळून एकात्मिक महाराष्ट्राचा समृद्ध वारसा तयार झाला आहे याचा बोध यानिमित्ताने महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांना व्हावा ही
माफक अपेक्षा आहे. मोदी आले, ते बोलले आणि नेहमीप्रमाणे ते जिंकले. पुण्यात जन्मलेल्या महापुरुषाच्या स्मृतीच्या कार्यक्रमात राजकीय भूमिका घेऊन स्वतःचा हाताने स्वतःचा मुखभंग करून घेणाऱ्यांना श्रीमंत दगडूशेठ गणपतीने सद्बुद्धी देवो हेच यानिमित्ताने म्हणावे वाटते.