एक काळ असा होता जेव्हा मराठी नाट्य व्यावसायिक निर्माते राज्य नाट्य स्पर्धेची आतुरतेने वाट बघत, कारण स्पर्धा असे हौशी रंगकर्मींची. मात्र त्यातील काही संहिता या व्यावसायिक सफलता मिळवून देण्याच्या पात्रतेच्या असत. हौशी नाटककारांनी लिहिलेली अनेक नाटके व्यावसायिक रंगभूमीवर यश मिळवून गेली. अशा हौशी नाट्य स्पर्धांमधून जसे अनेक कलावंत घडले तसेच अनेक लेखकही घडले. हौशी नाट्यस्पर्धा अनेक रंगकर्मींसाठी व्यावसायिकतेची शिडी ठरली. फक्त नाटकेच नव्हे, तर अनेक एकांकिकादेखील पुढे व्यावसायिक मंचावर आर्थिकदृष्ट्या सफल झाल्याचा इतिहास आहे.
एकांकिकांची नाटके झाली आणि नवलेखकांनाही चांगले दिवस आले. मात्र कोविड काळानंतर हे समीकरण पूर्ण बदलून गेले. हमखास यशाचे गणित सोडविणारी नाटकं त्यातही कमी खर्चिक, हौशी कलावंतांच्या सहाय्याने रंगभूमीवर येऊ लागली. अर्थात ही व्यावसायिक तडजोड सर्वसामान्य प्रेक्षकांनीही अंगीकारली. ठप्प झालेल्या जीवनशैलीवर जिवंत कलाविष्कार असलेले नाटक, करमणुकीचा स्त्रोत बनले आणि कोविड पश्चात नाटकाचा एका वेगळ्या व्यावसायिक फाॅर्म्युलाचा जन्म झाला आहे.
नाट्यवेड्या मराठी प्रेक्षकांनी या बदललेल्या नाटकाच्या दृष्यात्मक तडजोडी स्वीकारल्या. आज मराठी नाटक गेल्या वर्षभरात स्थिरस्थावर होण्याच्या मार्गावर जरी दिसत असले तरी पारंपरिक विषयांच्या गर्ततेतून ते आजही सुटलेले नाही. मानवी नातेसंबंधांच्या भोवती मराठी लेखक आजही रुंजी घालताना दिसतात.
गेल्या महिन्यात वर उल्लेखिलेल्या अशाच जातकुळीचे अथवा कौटुंबिक सामाजिक धाटणीचे नाटक मराठी रंगमंचावर यशस्वी होताना दिसत आहे. नाटक आहे, प्रा. नरेश नाईक लिखित ‘नात्याची गोष्ट’. यंदाच्या ६१व्या मराठी हौशी राज्यनाट्य स्पर्धेत हे नाटक अव्वल ठरले होते. आटोपशीर पात्रसंख्या, आटोपशीर नेपथ्य, प्रकाश योजना अथवा वेशभूषेसारख्या नाट्य-सहाय्यक अंगाचे अवडंबर नसलेले ‘नात्याची गोष्ट’ केवळ आणि केवळ नाटकातल्या कंटेंटमुळे (विषय भिन्नतेमुळे) प्रेक्षकांच्या मनाचा
ठाव घेते.
संयत आणि प्रगल्भ अभिनय बघताना प्रेक्षकवर्ग एखाद्या हौशी नटसंचाचे नाटक बघतो आहोत हे विसरतो. नाही म्हणायला नीलेश गोपनारायणसारखा व्यावसायिक नट यात प्रमुख भूमिका पार पाडत असला तरी तो अद्याप प्रसिद्धीच्या दुष्टचक्रात अडकलेला नाही. ‘अलबत्या गलबत्या’सारख्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेल्या बालनाटकात जरी तो धमाल उडवून देत असला तरी चेटकिणीच्या मुखवट्यामुळे फेसव्हॅल्यूपासून तो वंचित राहिला आहे. नात्यातील उर्वरित कलाकारांपैकी दीपाली शहाणे, अद्वैत चव्हाण, अधिराज कुरणे व धनश्री साटम आपापल्या भूमिका चोख पार पाडताना दिसतात. मुळात या सर्व कलाकारांच्या अभिनयात स्पर्धात्मक धैर्य व धाडस आढळून येते. प्रत्येक प्रयोग स्पर्धात्मक गुणवत्तेच्या कसोटीस खरा उतरावा याबाबत चिकाटी दिसून येते.
निर्माते आणि सादरकर्ती संस्था नागबादेवी कलामंच यांनी एक अनोखा मार्केटिंग फंडा या नाटकाच्या निमित्ताने शोधला आहे. सध्या नाटकाचे तिकीट फक्त एक रुपया आहे. नाटक संपले की, कर्टनकाॅलला सूत्रधार अनिकेत शहाणे तमाम प्रेक्षकांना स्वेच्छा दानमूल्यासाठी आवाहन करतात आणि बघता-बघता पेटीत २०-२५ हजारांची रक्कम सहज जमा होत जाते. नाटकाचा एकूण खर्च या जमा रकमेच्या जवळपास असल्याने आजतागायत ‘नात्याच्या गोष्टी’चे ३५ प्रयोग सादर झाले आहेत. मुळात दमदार शेवट असलेल्या, भावनाप्रधान कौटुंबिक नाटकाचा पाणावलेल्या डोळ्यांचा परिणाम म्हणून प्रेक्षक सहजगत्या खिशातून पाच-पंचवीस रुपये दानपेटीत टाकतात.
कथाबीज फारसे नावीन्यपूर्ण नाही. मात्र नरेश नाईकांची कथासूत्र मांडण्याची हातोटी प्रेक्षकांच्या विचारांशी खेळंत राहाते. घटस्फोटित जोडप्याचा मुलगा कालांतराने दुसरा विवाह केलेल्या आपल्या आईला भेटायला तिच्या घरी येतो आणि मग मनुष्यनिर्मित नाती, त्यांचा ऊहापोह, भावभावनांची घुसळण अशा चखपल फाॅर्म्युलाला आपण सामोरे जातो. शेवटी शेवटी तर आपण विनयच्या व्यक्तिरेखेत अडकत जातो. प्रथमदर्शनी नकारात्मक वाटणारी विनयची व्यक्तिरेखा पुढे सकारात्मक होण्यातच नाटकाचे यश सामावलेले आहे. आजपर्यंत अनेक लेखक नाटककारांनी घटस्फोटितांचे आयुष्य रेखाटले. त्यांच्या मुलांवर होणारा मानसिक ओढाताणीचा परिणाम आणि तोदेखील तरुण मुलांची बाजू सांगणारा, नाट्यरूपात प्रदर्शित झाला असण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे पात्रापात्रांतील एका वेगळ्या संघर्षाची बाजू आपल्यासमोर येत राहाते. विनयच्या आईने दुसरे लग्न केलं असल्याने तिच्याबरोबर विनयची सख्खी बहीण राहात असते, ही आणखी एक नाट्यमय, संघर्ष स्थिती व पात्र पेरणी लेखकाने कथानकात करून ठेवली आहे.
सशक्त कथाबीजाला पूरक नाट्यप्रसंगांची फोडणी दिली की, चविष्ट पाककृती समोर यावी असे या नात्याच्या गोष्टीबाबत घडत राहते; परंतु प्रामुख्याने समोर येत राहते ते आई-मुलामधील संघर्ष नाते.
विशेष उल्लेख करावे असे बबडीच्या भूमिकेतील धनश्री साटम आणि श्रीच्या भूमिकेतील अधिराज कुरणे नाटकाला एका सहजतेच्या पातळीवर नेऊन ठेवतात. धनश्रीला या अगोदर अनेक एकांकिका स्पर्धांमधून पाहिलेले होते. तिची अभिनयक्षमता तरुण रंगकर्मींच्या तुलनेत नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. या नाटकातही ती लक्ष वेधून घेते. बाकी वाॅचमनच्या भूमिकेत गौरव वणे आणि कुरियर बाॅय अक्षय नवाथे आपापल्या जागी चपखल आहेत. राजेश शिंदे यांची प्रकाश योजना आणि दिग्दर्शकीय नेपथ्य करणारे तुषार घरत, गौरव वणे आणि मेहुल राऊत यांचा प्रकर्षाने उल्लेख करणे भाग आहे. घटस्फोटितांच्या मुलांचे नातेसंबंध अधोरेखित करणारे ‘नात्याची गोष्ट’ हे संघर्षनाट्य नाट्यजाणीव निर्माण करून जाते, हे मात्र खरं आहे.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…