
कारच्या दरवाजावर पाकिट चिटकवून व्यावसायिकास १० लाखांची खंडणी मागून दिली जीवे मारण्याची धमकी
पुण्यातील उच्चभ्रू ठिकाण असलेल्या कोरेगाव पार्क येथे बारामतीतील एका व्यावसायिकाला त्याच्या कारच्या दरवाजावर बंद पाकिट चिटकवून १० लाखांची खंडणी मागून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली होती. हा प्रकार ३१ जुलै रोजी घडला होता. याप्रकरणी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
सोलापूर जिल्हय़ाच्या माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या या तरुणास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. श्रीनाथ शेडगे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यवसायिक हे मूळचे बारामती येथील रहिवासी आहेत. ते हॉटेल व्यावसायिक असून, त्यांचा जमीन-खरेदी विक्रीचाही व्यवसाय आहे.
३१ जुलै रोजी रात्री साडे आठ वाजता त्यांचा मित्र पंकज निकुडे यांच्यासोबत ते कोरेगावपार्क येथील लेन नंबर ७ येथील डेझर्ट वॉटर हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेडगे यांने त्यांच्या कारवर चिठ्ठी चिकटवली. त्यामध्ये त्यात ‘मला दहा लाखांची गरज आहे. मला पैसे दिले नाही व पोलिसांना सांगितले, तर तुझ्या कुटुंबातील एक-एक व्यक्तीला मारून टाकेन,’ अशी धमकी देण्यात आली होती. त्या चिठ्ठीवर दिलेल्या नंबरवर फिर्यादी यांनी मित्राच्या मोबाईलवरुन फोन केल्यावर कोणी उचलला नाही. त्यानंतर दुसर्या दिवशी ते जेजुरी येथे असताना फिर्यादीच्या मोबाईलवर फोन आला. तुला, तुझ्या कुटुंबियांचा जीव वाचवायचा असल्यास आम्हाला कोरेगाव पार्क या ठिकाणी १० लाख रुपये आणून दे, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली होती.
आरोपी श्रीनाथ शेडगे याचे आई-वडील गावी शेती करतात. मागील आठ महिन्यांपासून तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आला होता. दरवेळी परीक्षा थोडय़ा मार्काने हुकत असल्याने तो कर्जबाजारी झाला.त्याने झोमॅटोमध्ये काम सुरू केले होते. तसेच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यावरही त्याला नुकसान झाले. त्यामुळे त्याने सीआयडी मालिका पाहून प्लॅन रचला होता. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.