मुंबई : वन विभागातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गाची भरती प्रक्रिया टी.सी.एस.- आय.ओ. एन. यांच्यामार्फत ३१ जुलै २०२३ ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऑनलाईन परीक्षेद्वारे (ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न) घेण्यात येत आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रश्नपत्रिका शिफ्टनिहाय वितरण करणे, परीक्षा घेणे, निकाल प्रकाशित करणे याबाबतची टीसीएस आयओएन या कंपनीची यंत्रणा ही अत्यंत गोपनीय मजबूत व अत्यंत सुरक्षित आहे. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या बातम्या निराधार, तथ्यहीन व चुकीच्या असल्याचा खुलासा वनविभागाने केला आहे.
वनविभागाची परीक्षा टी.सी.एस.आय.ओ.एन. या कंपनीकडून घेण्यात येत असून वनविभागाकडून परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावणे तसेच वरिष्ठांकडून परीक्षा केंद्राची तपासणी करण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. याव्यतिरिक्त उमेदवारांना व नागरिकांना https://mahaforest.gov.in/ या संकेतस्थळावरूनही सूचनावजा आवाहन करण्यात आले असून अतिरिक्त दक्षता घेण्यात आली आहे. याचबरोबर नागपूर येथून परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची गंभीरतेने दखल घेऊन याबाबत सतर्क राहण्याबाबत पोलीस आयुक्त, नागपूर शहर, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, पोलीस अधीक्षक, वर्धा, पोलीस अधीक्षक, भंडारा व पोलीस अधीक्षक गोंदिया यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच पोलीस विभागाच्या सायबर सेललासुद्धा सतर्क राहण्याचे व भरती प्रक्रियेसंदर्भात समाज माध्यमांमध्ये अफवा पसरवणाऱ्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याच्याही सूचना देण्यात आलेल्या असल्याचे वनविभागाने कळविले आहे.
माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या घटना औरंगाबाद जिल्ह्यातील नेमून दिलेल्या सात परीक्षा केंद्रांवरील नसून ती खासगी अॅकेडमी असून त्याबाबत पोलीस यंत्रणेकडून तपास सुरू आहे यामध्ये उल्लेखित राणा अॅकेडमी परीक्षा केंद्राचा वन विभागाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रामध्ये समावेश नसल्याचे, वन विभागाने स्पष्ट केले आहे. या परीक्षेदरम्यान गैरकृत्य करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध रीतसर पोलीस कारवाई करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे. यासंदर्भात वन विभागाचे कक्ष अधिकारी वि. श. जाखलेकर यांनी खुलासा प्रसिद्धीस दिला आहे.
औरंगाबादेत वनरक्षक भरती परीक्षेत हायटेक कॉपीच्या तीन घटना
औरंगाबादमध्ये वनरक्षक भरती परीक्षेत हायटेक कॉपीचे तीन प्रकार समोर आले आहेत. सुराणानगर आणि चिकलठाणा एमआयडीसी आणि वाळूज येथील परीक्षा केंद्रावर तीन परीक्षार्थींना ब्ल्यू टूथ, मोबाईल, मख्खी हेडफोन, मास्टर कार्ड रिडरसहीत ताब्यात घेतले. या प्रकरणी 2 ऑगस्टला जिन्सी आणि एमआयडीसी सिडको ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. 3 ऑगस्टला सातारा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परीक्षा केंद्रातील बाथरुममध्ये आधीपासूनच त्यांच्यासाठी हायटेक कॉपीचे साहित्य ठेवलेले होते, असे समोर आले. सचिन अंबादास राठोड, नितीन संजय बहुरे (19, रा. बेंबळ्याची वाडी, घोडेगाव, जि. औरंगाबाद) आणि सतीश मदनसिंग जारवाल (28, रा. टाकळेवाडी, ता. गंगापूर, औरंगाबाद) अशी परीक्षार्थींची नावे आहेत. बहुरेला मदत करणारा करण चतरसिंग गुसिंगे याचाही आरोपींमध्ये समावेश आहे.
वनपरीक्षेत्र अधिकारी विशाल कवडे यांनी जिन्सी ठाण्यात फिर्याद दिली असून, ते सुराणानगर येथील केंद्रावर परीक्षा निरीक्षक होते. 2 ऑगस्टला सकाळी साडेसहा वाजेपासून सव्वाआठ वाजेपर्यंत उमेदवारांना तपासणी करून त्यांनी आत सोडले. त्यानंतर परीक्षा सुरु झाली. दरम्यान 8.50 वाजता निरीक्षणासाठी एका हॉलमध्ये गेले. तेथे उमेदवार नितीन संजय बहुरे याच्याजवळ गेल्यावर तो कच्चे काम करताना दिसला. काही वेळाने ते पुन्हा त्याच्याजवळ गेले असता तो पुन्हा कच्चे काम करताना आढळला. संशय बळावल्यामुळे पर्यवेक्षक विश्वजित बुळे यांना झडती घेण्यास सांगितले असता नितीन बहुरेकडे मोबाइल, मास्टर कार्ड रिडर, मख्खी हेडफोन आदी साहित्य मिळून आले. तर त्याला त्याचा साथीदार करण चरतसिंग गुसिंगे (रा. पिवळवाडी, जि. छत्रपती संभाजीनगर) यानेच बाथरुममधील हे साहित्य काहीही करून घेऊन जा, असे बजावले होते, अशी कबुली त्याने दिली. बहुरेला अटक केली असून अधिक तपास सहायक निरीक्षक अनिल मगरे करीत आहेत.
दुस-या एका घटनेत वन परीक्षेत्र अधिकारी राहुल मराठे यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात फिर्याद दिली. ते आयऑन डिजीटल झोन परीक्षा केंद्र, एमआयडीसी चिकलठाणा येथे परीक्षा निरीक्षक होते. सचिन अंबादास राठोड हा तेथे परीक्षा देत असताना सकाळी 10 वाजता तो लघुशंकेला जाऊन आला. त्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानामार्फत त्याचे फ्रिस्कींग केले असता त्याच्याकडे वायर्ड हेडफोन आढळले. त्यानंतर त्याला होमगार्ड मार्फत पोलिस ठाण्यात पाठविले. त्याच्यावर मराठे यांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक अर्जुन राऊत करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत सतीश मनसिंग जारवाल हा परीक्षार्थी वाळूज येथील बजाज ऑटो लि. जवळील एक्सलन्स कम्प्युटर सेंटरवर परीक्षेसाठी गेला. हॉलमध्ये जाण्यापूर्वी त्याची तपासणी करताना त्याच्याकडे हॉलतिकिट, मायक्रो हेडफोन, इलेक्ट्रिक ब्लू टूथ, त्यात सीमकार्ड मिळून आले. त्याच्याविरुद्ध सहायक वन संरक्षक आशा एकनाथ चव्हाण यांनी सातारा ठाण्यात फिर्याद दिली, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.