
सचिन आणि सीमाचं जोडपं आता होणार बॉलिवूड हिरो-हिरोईन
मुंबई : सीमा हैदरच्या (Seema Haider) प्रकरणात नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. तिच्या पावलांवर पाऊल ठेवत काही तरुणी देखील प्रियकराला भेटण्यासाठी एका देशातून दुसर्या देशात जात आहेत (Love beyond Boundaries). स्वतःच्या प्रेमासाठी कोणत्याही अधिकृत प्रक्रियेशिवाय थेट भारतात घुसणारी सीमा हैदर ही प्रचंड चर्चेचा विषय बनली आहे. एखादी फिल्मी कथाच वाटावी असं हे प्रकरण सध्या खूप गाजतंय. त्यातच आता चित्रपटात काम करण्यासाठी एक उत्तम संधी मिळावी याकरता वर्षांनुवर्षे मेहनत करणार्यांच्या नाकावर टिचून सीमा हैदरला बॉलिवूडची (Bollywood) ऑफर आली आहे. मेरठमधील एका निर्मात्याने सीमा हैदरसोबत सचिन मीनालाही आपल्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे.
पाकिस्तानी सीमा हैदरला बॉलिवूड निर्माता अमित जानी (Amit Jani) यांच्याकडून चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. तर सचिन मीनालाही बॉलिवूड चित्रपटात काम करण्याची ऑफर आली आहे. सीमा आणि सचिनची यांची प्रेम कहाणी बऱ्याच दिवसांपासून व्हायरल झाली आहे. यानंतर एका निर्मात्याने त्यांना चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली असून त्यांना मदत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. दरम्यान, हा चित्रपट त्याच्या प्रेमकथेवर आधारित नसून राजस्थानमधील टेलर कन्हैयाच्या हत्येवर आधारित आहे.
पाकिस्तानी सीमा आणि भारतीय सचिन यांची मैत्री पबजी खेळताना झाली. ऑनलाईन गेम खेळताना दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सचिनसाठी सर्व सीमा पार करत पाकिस्तानातून आपल्या चार मुलांना घेऊन नेपाळमार्गे भारतात येणारी सीमा आता या चित्रपटाची ऑफर स्वीकारणार का, हे पाहावं लागेल.