ब्रिटिश राजवटीपासून देशाला मुक्त करायला हवे हे जाणून त्यासाठी लढा उभारणारे बाळ गंगाधर टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख जहालवादी नेते होते. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या त्यांच्या प्रतिज्ञेसाठी ते ओळखले जात. स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी लाल-बाल-पाल या त्रिकुटांपैकी ते एक होते. टिळकांचे बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरबिंदो घोष, व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई आणि मुहम्मद अली जिना यांच्यासह अनेक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांशी घनिष्ट संबंध होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांची भूमिका, त्यांचे योगदान हे सर्व शब्दांत मांडता येणार नाहीत. टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. विशेष म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच त्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ म्हटले होते, तर जनतेने त्यांना ‘लोकमान्य’ ही पदवी बहाल केली. महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता असे म्हटले होते. अशा या महान लोकनायकाच्या नावाने लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’(Tilak Award) देण्यात येतो.
ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांना १९८३ मध्ये पहिला पुरस्कार प्रदान करून लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची(Tilak Award) सुरुवात झाली. त्यानंतर गोदावरी परुळेकर, इंदिरा गांधी (मरणोत्तर), श्रीपाद अमृत डांगे, अच्युतराव पटवर्धन, खान अब्दुल गफार खान (मरणोत्तर), अटलबिहारी वाजपेयी, टी. एन. शेषन, डॉ. रा. ना. दांडेकर, डॉ. मनमोहन सिंग, डॉ. आर. चिदम्बरम, डॉ. विजय भटकर, शरद पवार, आचार्य बाळकृष्ण, डॉ. के. सिवन, बाबा कल्याणी, सोनम वांगचूक, डॉ. सायरस पूनावाला आणि डॉ. टेस्सी थॉमस आदी मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी १ ऑगस्ट रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील कार्यक्रमात यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रतिष्ठेचा ४१ वा लोकमान्य टिळक पुरस्कार लोकमान्यांचे पणतू दीपक टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये भाजप आणि मोदी राजवटीचे कट्टर वैचारिक विरोधक शरद पवार हेदेखील उपस्थित होते. गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे नेते काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. पण पवार आणि मोदी यांनी कोणताही राजकीय अभिनिवेष यावेळी आड येऊ दिला नाही. त्यामुळे भल्याभल्यांचे आडाखे चुकले असेच म्हणावे लागेल.
पंतप्रधानपदावर असताना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करून गौरविले जाणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला होता, तर डॉ. मनमोहन सिंग आणि अटलबिहारी वाजपेयी यांना ते पंतप्रधान होण्यापूर्वी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात लोकमान्यांचा सिंहाचा वाटा होता. तर देश स्वतंत्र झाल्यावर आता देशात सुराज्य आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहोरात्र झटत आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ हे ब्रिद सोबत घेऊन सबका विश्वास प्राप्त करण्यात मोदी यशस्वी ठरलेत.
हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पोहोचपावती आहे. जगगरात मोदींचे नाव आदराने घेतले जाते. कोणी त्यांचा ऑटोग्राफर घेतात, तर कोणी सोबत फोटो काढून घेतात. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन हे तर त्यांना ग्लोबली पॉवरफुल्ल म्हणतात. अमेरिकेबरोबरच, रशिया, फ्रान्स, जपान, ब्रिटन या देशांबरोबरच आखाती देश असोत सर्व देशांसोबत भारताचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. कोरोना संकटकाळात भारताने वैज्ञानिकांवर विश्वास दाखवला, ‘मेड इन इंडिया’वर भर देत लस बनवली. ही लस अनेक देशांना पुरविण्यात आली. कित्येकांचे प्राण वाचविण्यात आले. या काळात योग्य आणि तत्पर निर्णय घेऊन फार मोठी संभाव्य हानी टाळण्यात मोदींना यश आले. त्यामुळे कोरोनाची लस तयार करण्यात पुण्याचे महत्त्वाचे योगदान असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.
भारताला आत्मनिर्भर करण्याचा नारा देत मोदींनी अनेकांना आत्मनिर्भर होण्यास मदत केली. ‘योग्य रस्ता येण्याची वाट बघण्यात आपण दिवस घालवतो. मात्र आपल्याला याचा विसर पडतो की, रस्ते हे वाट बघण्यासाठी नाहीत, तर चालण्यासाठी असतात’, असे लोकमान्य टिळक म्हणत. त्यांचा हाच उपदेश मोदींनी आत्मसात केला आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सुरू केले आहे. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत येण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो, अशी मराठीतूनच भाषणाची सुरुवात करताना त्यांनी पुणेकरांची वाहवा मिळवली. विशेष म्हणजे लोकमान्य टिळक म्हणजे स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या माथ्यावरचा टिळा आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी कैक पटीने वाढली असल्याचे नमूद करून हा राष्ट्रीय पुरस्कार मोदी यांनी १४० कोटी भारतीयांना समर्पित केला. तसेच तुमच्या सेवेत मी कुठलीही कसर ठेवणार नाही, अशी ग्वाही देखील मोदींनी देशवासीयांना दिली. त्याचवेळी पुरस्काराची १ लाखांची रक्कम त्यांनी ‘नमामे गंगे’ या योजनेसाठी देत असल्याचे जाहीर केले. मोदी यांनी यावेळी महाराष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो, असे म्हणत मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच पुणेकरांनी जोरदार टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केले. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य म्हणजेच स्वातंत्र्य प्राप्तीसाठी जीवन व्यतीत केले, तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदी हे देशात सुराज्य आणण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे प्रतिष्ठेच्या लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी मोदी यांची निवड सर्वार्थाने योग्यच म्हणायला हवी.