Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीकुठे हरवली माणुसकी?

कुठे हरवली माणुसकी?

अपघातग्रस्त जखमीला मदत करण्याचे सोडून लोकांची डिझेल लुटायला झुंबड

धुळे : धुळे शहरापासून काही अंतरावर डिझेलचा टँकर भर रस्त्यात उलटला. (A diesel tanker overturned in dhule) त्यामुळं सर्व डिझेल रस्त्यावर सांडले होते. हे डिझेल पाहून रस्त्यावर उपस्थित नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. उलटलेल्या डिझेल टँकरमधून सांडणारे डिझेल गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. परिसरातील नागरिकांनी जे काही भांडं मिळेल, त्यात डिझेल भरण्यास सुरुवात केली.

याबाबत माहिती अशी की, मुंबई आग्रा महामार्गावर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजरातहून चंद्रपूरकडे जात असताना डिझेलचा एक टॅंकर पलटी झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा डिझेलचा टँकर उलटला. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्याचवेळी अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे.

दरम्यान, डिझेलचा ट्रक पलटी झाल्यानंतर नागरिकांनी डिझेल नेण्यासाठी एकच झुंबड केली. वाहनधारकांनी आपली वाहने थांबवून अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी डिझेल पळवण्यासाठी चढाओढ लागल्याचं दृश्य पाहायला मिळालं. ही बातमी काही क्षणात परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि आजूबाजूच्या नागरिकांचीही तिथं एकच गर्दी झाली. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळंच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मिळेल त्या भांड्यात डिझेल भरण्यास सुरूवात केली. याचे काही व्हिडिओही समोर आले आहेत. सध्या हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे हा ट्रकचालक जखमी अवस्थेत असूनही लोकांनी ना त्याला मदत केली ना त्याच्याकडे लक्ष दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -