
दोघे फिरायला गेले होते... पण असं काही घडलं की...
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस महिला सुरक्षेचा (Women safety) प्रश्न गंभीर होत चालला आहे. ट्रेन, रिक्षा, बस एवढंच नव्हे दिवसाढवळ्या भर रस्त्यातही महिला सुरक्षित नसल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. मुंबईच्या लोकल ट्रेन्समधून अज्ञाताने तरुणीवर अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. मीरा रोड येथे पत्नीचे तुकडे करुन ते शिजवून कुत्र्याना खायला घातलेल्या प्रकरणी तर अख्खा समाज हादरुन गेला होता. समाजातली ही विकृती वाढीला लागली असून आयुष्याचा साथीदार असलेला व्यक्तीच जीवावर उठल्याची आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील खार येथे (Khar Crime) एका पतीने पत्नीवर भररस्त्यात चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना (Mumbai crime news) घडली आहे. काल ३० जुलैला रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली तर पतीने मात्र ताबडतोब घटनास्थळावरुन पळ काढला. माहिती मिळताच खार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी महिलेला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखलं केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नेमकं काय घडलं ?
संबंधित घटनेतील जोडपं धारावी (Dharavi) पट्ट्यातील राहणारं आहे. दोघांचं वैवाहिक आयुष्य फारसं सुरळीत नव्हतं. त्यांच्यात वाद सुरु होते. शिवाय या प्रकरणी त्यांनी न्यायालयाचे दारही ठोठावले होते. रविवारी ३० जुलैला रात्री धारावीच्या शाहू नगर परिसरातून खार इथे फिरायला गेले असता त्यांच्यात पुन्हा भांडण झालं. दोघांमधील वादावादी वाढली. रात्री साडेआठच्या सुमारास ते दोघे १४ व्या रोडवर होते, त्यावेळी पतीने त्याच्याजवळ असलेल्या पेपर कटरने पत्नीवर हल्ला केला आणि तिच्या गळ्यावर वार केले. यानंतर तो तिला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून गेला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांची या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. खार पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आणि तिला रुग्णालयात दाखल केलं.
पोलिसांचा तपास सुरु
सध्या तिची प्रकृती स्थिर असली तरी बोलायला त्रास होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र त्याही अवस्थेत तिने आपल्या पतीविषयी काही माहिती पोलिसांना दिली आहे. आरोपी पतीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डेटा रेकॉर्ड तपासत असल्याचं पोलीस म्हणाले. दरम्यान पतीकडे चाकू नेमका कुठून आला, हा गुन्हा रागाच्या भरात घडला की पत्नीची हत्या करण्याचा त्याचा कट होता या संदर्भात आता खार पोलीस अधिक तपास करत आहेत. तर महिलेच्या सुरक्षेसाठी पोलिसांची एक टीम हॉस्पिटलमध्ये तैनात करण्यात आली आहे, असंही पोलिसांनी सांगितलं.