रंग जर आयुष्यात नसतील, तर माणसाचं आयुष्य बेरंग होईल. अनादिकाळापासून या रंगाच्या मोहात माणूस अडकून आहे. रंगाच्या विशेष छटा असतात. गुलाबी स्पर्शाने लालबुंद झालेले गाल हे तारुण्याच्या उंबरठ्यावरील रंगाचं कॉम्बिनेशन सर्व परिचित आहे. खरंच रंग नसते, तर काय झालं असतं?
रंगात रंगुनी साऱ्या, रंग माझा वेगळा
रंगाने केला माझ्या आयुष्याचा सोहळा…
असे हे माणसाच्या आयुष्याला सर्वांगाने व्यापलेले रंगांचे गारुड कायम सोबत असते, कधी नात्यांच्या रंगांमध्ये विणले जाते, तर कधी मैत्रीच्या, कधी प्रेमाच्या रंगांमध्ये गुलाबी रंग ओलेचिंब होतात, तर कधी द्वेषाच्या काळे रंग अधिक गहिरे होऊन मनाला कलुषित करतात. कधी हे रंग विलक्षण वागतात, त्या रंगाच्या विशेष छटा असतात. त्या अशा… सहजच कधीतरी कानावर शब्द पडतो, तो की नाही सरड्यासारखे रंग बदलतो? इथे त्या रंगामुळे व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्य समोर अधोरेखित होते. कालच माझी एक मैत्रीण सांगत होती, तिच्या म्हणे काकावर कोणीतरी काळी जादू केली… त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता… इथे काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे विचित्र रंगसंगतीमुळे मनात ग्लानी निर्माण करते. गुलाबी स्पर्शाने लालबुंद झालेले गाल हे तारुण्याच्या उंबरठ्यावरील रंगाचं कॉम्बिनेशन सर्व परिचित आहे. त्याचं काय ब्वा, आता त्याचं उखळ पांढरं झालंय… अशा प्रकारच्या वाक्प्रचारातून रंगांच्या अनेक छटा अर्थांची वलयं निर्माण करतात आणि समोरच्या व्यक्तीला नेमकं काय म्हणायचं तेही लक्षात येतं. मुलगी वयात आली की, तिला स्वप्न पडतात पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून येणाऱ्या राजकुमाराचे. हा पांढरा रंग तिच्या पवित्र निरागस मनाचे सुंदर विचाराचे प्रतिनिधित्व करतो.
पांढरा रंग मांगल्य, पवित्रता, निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे. नव्या गोष्टीची सुरुवात दाखवणारा हा रंग आहे, त्यामुळे अनेक धर्मांमध्ये लग्नामध्ये वधू-वर पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करतात. पांढऱ्या रंगाची वस्त्र त्यांच्या पवित्र, निर्मळ अंतकरणाचे प्रतीक दर्शवतात. पांढरा रंग शुद्ध रूपात असल्यामुळे त्यामध्ये कोणत्याही रंगाची भेसळ नसते म्हणून तो कुठल्याही रंगात मिसळून स्वतःचं अस्तित्व दुसऱ्याला बहाल करतो आणि दुसऱ्याच्या रंगाने आपलं अस्तित्व निर्माण करतो.
मागे वळून पाहताना विचार केला, तर आपल्या लक्षात येते की, या रंगाच्या छटा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बदलतात आणि त्या त्या वयामध्ये काही ठरावीक रंग माणसाच्या आवडीचे होतात. तरुण वयामध्ये भडक रंग आकर्षित करतात, तर पन्नाशीनंतर फिके रंग आवडतात. असे का होत असेल? याचे उत्तर असे आहे की, वयाबरोबर माणसाचे विचारही बदलतात आणि विचारानुसार आवड बदलते. डोळ्याला शांत वाटणारे आणि मनाला प्रसन्न करणारे कपड्यांचे रंग सकारात्मक कृतीची माणसं वापरतात. कपड्याच्या रंगसंगतीवरून माणसाचे विचार समजतात.
माणसाच्या आयुष्याला रंगीत करणारे हे रंग कोणी तयार केले असतील? की माणसांबरोबरच जन्माला आली असतील? कोणास ठाऊक काही प्रश्नांची उत्तरं अकलनीय असतात तेच खरे. जेव्हा विधात्याने या सृष्टीची निर्मिती केली असेल, तेव्हा किती विचारपूर्वक रंगाचीही वाटणी केली असावी. सृष्टीच्या विवारातूनच रंगही जन्माला आले असतील. खरंच रंग नसते, तर काय झालं असतं? जेव्हा हा विचार मनात आला, तेव्हा जरा गंमतच वाटली आणि एखाद्या चित्रकाराने कॅन्व्हास बोर्डवर निसर्गाचं ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्र काढल्यासारखं जीवनाचे चित्र समोर उभं राहिलं.
पावसाळा संपल्यानंतर तुम्ही कधी कास पठाराला गेला आहात का? तिथे उमललेल्या चिमुकल्या रानफुलांच्या असंख्य रंगाच्या छटा पाहिल्या की, त्या विधात्याच्या कारागिरीचे मन भरून कौतुक करावेसे वाटते. आकाशातील इंद्रधनुष्याची कमान पाहिली की, अद्भुतरम्य रंगांची उधळण मनाला भुरळ घालते. ब्रह्ममुहूर्तावर पूर्व दिशेला आकाशात पसरलेली ती रंगाची होळी किती विलोभनीय असते. रंग मिसळलेले आकाश डोळ्यांच्या दोन कॅमेऱ्यामध्ये भरून घ्यावेसे वाटते, ते रंग पाहून मनाला चैतन्य येते. प्रत्येकाला जन्मापासून मरेपर्यंत रंगाचे आकर्षण असते. अगदी दोन-तीन महिन्यांच्या बाळाच्या पाळण्यावर रंगीत खेळणं बांधलं की, त्या रंगीत खेळण्याकडे पाहून बाळ आनंदित होते. हातपाय हलवायला लागते. त्याच्याही मनाला हे रंग उल्हासित करतात. लहान मुलांच्या पुस्तकांमध्ये रंगीत चित्र रेखाटलेली असतात. शब्दांबरोबर रंगांचीही ओळख मुलांना होते. झाडांचा रंग हिरवा, आकाशाचा निळा हे मुलांना समजते. पांढऱ्या शुभ्र रांगोळीत रंग भरले की, ती अधिक सुंदर दिसते. चित्रातली रंगसंगती मुलांच्या मनाला साद घालते. समजायला उमजायला लागल्यापासून रंगाच्या माध्यमातून काही गोष्टी जास्त चांगल्या प्रकारे समजू लागतात. काळ्याकुट्ट अंधारात काजव्यांचा टिमटिम प्रकाश विशेष नजरेला आकर्षित करतो. आपल्या कळत नकळत अनेक गोष्टीशी आपण रंगाचं नातं जोडतो. काही रंग इतके पक्के असतात की, ते अंतर्मनात जाऊन बसतात. त्याचा विचार आपल्या मानसिकतेशी जोडला जातो. काहींना काळा रंग विशेष आवडतो, तर काही काळा रंगाचा द्वेष करतात, असं का होतं? कारण त्या त्या रंगाशी माणसाचं नातं जोडलेलं असतं.
काही अपवाद वगळता जगात बहुतेक संस्कृतींमध्ये काळा रंग हा अशुभ, वाईट मानला गेला आहे. काळ्या रंगाचा संबंध अंधार, गूढ विद्या, दुःख, क्रोध, भीती, मृत्यू यांच्याशी आहे. निषेधासाठी काळ्या रंगाच्या फिती वापरतात, यातच काय ते आले. काळे मन, काळी जादू, काळा पैसा, काळा दिवस असे शब्दप्रयोग काळ्या रंगाविषयी मनामध्ये हलचल निर्माण करतात.
दुसरी गोष्ट म्हणजे संक्रांतीला काळे कपडे घालण्याची आपल्याकडे प्रथा आहे, याचं कारण म्हणजे संक्रांत हा सण जानेवारी महिन्यामध्ये येतो त्या वेळेला थंडी खूप असते. काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि थंडीपासून आपले रक्षण करतो म्हणून या काळामध्ये काळे कपडे वापरतात आणि उन्हाळ्यामध्ये पांढरे कपडे शरीराचे रक्षण करतात. अनेक लोक सात वारांचेही विशेष शुभ रंग मानतात आणि त्या त्या रंगाचे कपडे त्या त्या वारी घालतात. जर एखाद्या व्यक्तीला नीट झोप लागत नसेल, तर डॉक्टर निळ्या रंगाचा लाइट त्या व्यक्तीच्या झोपायच्या खोलीत लावायला सांगतात. निळ्या रंगामुळे मन शांत होते, असे त्यांचे म्हणणे आहे. अनेक प्रकारच्या कलांशीही रंगांचे विशेष महत्त्व असते. चित्रकार रंगांच्या माध्यमातून विशेष रंगसंगती वापरून हुबेहूब निसर्गाचा देखावा उभा करतात. त्यामुळे पाठीमागे डोंगर समोर झाडं, बाजूला घर, वाहती नदी असा छान सीन साकार होतो, तर कवी शब्दांच्या माध्यमातूनही अनेक रंगछटातून आपल्या डोळ्यांसमोर शब्दचित्रं उभं करतो. मी शाळेत असताना ‘गवतफुला’ ही कविता मला अभ्यासाला होती ती कविता आजही तोंडपाठ आहे, याचं कारण म्हणजे कवीने वापरलेली रंगसंगती. कवितेमधील मुलगा त्या फुलाला सांगतो…
गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला
सांग तुझा रे तुझा लळा…
त्या निळनिळुल्या रंगापाशी माझं मन थबकलं आणि त्या शब्दकळा मनात रुंजी घालू लागल्या… त्या रंगामुळेच ही कविता आजही मला आठवते. रंग जर आपल्या आयुष्यात नसतील, तर माणसाचं आयुष्य बेरंग होईल. नाही का?
काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट एक दिवस ज्येष्ठ संगीतकार पंडित यशवंत देवांच्या घरी गेले असताना सहजच रंगाचा विषय निघाला आणि मी म्हणाले, हे रंग कोणी निर्माण केले असतील? त्यावेळेला देवसरांनी एक रुबयी म्हणून दाखवली. ती अशी…
ऊर्जाच घालते लाख जीव जन्माला
त्यांचेच लाभती रंग विश्वकोशाला।
त्यामध्ये खेळतो एक रंग ‘श्रीरंग’
त्याचाच वेध लागो रे पुरुषार्थाला।।
मी आश्चर्याने देव सरांकडे पाहिलं आणि सरांना म्हटलं की, मला याचा अर्थ सांगा. खूप छान अर्थ त्यांनी समजून सांगितला तो असा… जगात लाखो जीव आहेत त्या सगळ्यांमध्ये ऊर्जा आहे, ती सर्वत्र एकच आहे. तीच ऊर्जा अनेक रंगांना जन्म देते. या सर्व रंगाचा माणसाला मोह पडतो. जितके रंग इतक्या प्रकारचे वेगवेगळे मोह. याच मोहपाशात मनुष्य स्वतःला अडकवून घेतो. मात्र या सर्व रंगांना जन्म देणारा एक रंग आहे, त्याला पकडायला शिकूया. त्या रंगाचं नाव ‘श्रीरंग’. तो दिसू लागतो तेव्हा इतर सर्व रंग मावळू लागतात आणि आपण अंतरंगात खेळू लागतो. त्यावेळेला आपल्याला जो आनंद होतो तो कायमस्वरूपी मनात सुखाचा, समाधानाचा, चैतन्याचा मोहविरहित रंग पुरुषार्थाकडे घेऊन जातो तो आहे सदानंदाचा. त्यांचं बोलणं ऐकून मी निशब्द झाले…
अनादिकाळापासून या रंगाच्या मोहात माणूस अडकून आहे. अनेक रंग प्रतीकात्मक. हिरवा, भगवा, निळा, पांढरा, काळा रंग अनेक गोष्टी सूचित करतात. लाल रंग प्रेमाचं प्रतीक, फिका रंग विरहाचे. काही धर्माचे, तर काही त्यागाचे. सर्व रंगांत मिसळून जातो तो पांढरा रंग. वसंत ऋतूत फुलणारी अनंत रंगाच्या फुलं. त्या फुलांचा मोह प्रत्येकाच्याच मनाला भुलवितो. रंगाच्या छटा आपल्या आजूबाजूला आपलं मन आकर्षित करून घेतात… याच रंगाची धुळवड आपलं जीवन व्यापून टाकते.
आज पावसाळी सकाळ झाकाळून आलेला आसमंत या धुंद वातावरणात एक बासरीवाला रस्त्याने बासरी वाजवत जात होता, ती मंत्रमुग्ध करणारी बासरी ऐकली अन् नजरेसमोर उभा राहिला तो श्रीरंग. त्याचं चैतन्यमय रूप ऊर्जा देणारं ते पाहिलं आणि त्या एकाच सावळ्या रांगात सर्व रंग मिसळून गेले. आणि मी त्या रंगाची एकरूप झाले.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…