मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत असलेल्या शिवडी येथील १२ चाळींच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली जाईल. त्यानंतर, केंद्र शासनाकडून या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली. सदस्य अजय चौधरी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री सावे म्हणाले की, म्हाडाने वास्तूशास्त्रज्ञ मे. जी. डी. सांभारे अॅन्ड कंपनी यांची नियुक्ती करुन शिवडी येथील पुनर्विकास प्रकल्पाचा सुसाध्यता अहवाल तयार केला आहे व सदर सुसाध्यता अहवाल मुंबई बंदर न्यासाकडे पाठविला आहे. राज्य शासनानेदेखील हा सुसाध्यता अहवाल केंद्र शासनास पाठविला आहे. शिवडी येथील बी.डी.डी. चाळ प्रकल्पास केंद्र शासनाची मंजुरी मिळविणे तसेच शिवडी बी.डी.डी. चाळीची जमीन राज्य शासनास पुनर्विकासाकरिता हस्तांतरित करणे याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती राज्य शासनाने मुंबई बंदर न्यास यांना केली आहे. राज्य शासनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन याबाबत तातडीने कार्यवाही होण्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे. या चाळी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असल्याने सदर चाळींचा पुनर्विकास प्रक्रियेत समावेश करण्यासाठी प्रथम केंद्र शासनाची परवानगी मिळणे तसेच शिवडी बी.डी.डी. चाळीची जागा राज्य शासनाच्या नावे होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने शिवडी येथील बीडीडी चाळींची जमीन राज्य शासनास हस्तांतरित करण्याकरिता केंद्र सरकारला विनंती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई विकास विभागामार्फत (बी.डी.डी.) सन 1921-25 च्या दरम्यान मुंबईतील वरळी, नायगांव, ना.म.जोशी मार्ग (डिलाईल रोड) व शिवडी येथे एकूण 207 चाळी बांधण्यात आल्या आहेत. या बी.डी.डी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये जवळपास एकूण 15 हजार 584 भाडेकरूंचे पुनर्वसन करणे नियोजित आहे. या जुन्या झालेल्या व मोडकळीस आलेल्या बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास प्रकल्प राबविण्यासाठी शासनाने म्हाडास सुकाणू अभिकरण (Nodal Agency) व नियोजन प्राधिकरण (Planning Authority) म्हणून नेमले आहे. शिवडी येथील 12 बी. डी. डी. चाळींमधील 960 गाळयांपैकी सुमारे 114 निवासी गाळे व 46 अनिवासी गाळे असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुनील राणे, कालिदास कोळंबकर, योगेश सागर यांनी सहभाग घेतला.