Shrawan in Konkan : कोकणातील श्रावण…

Share
  • मानसी मंगेश सावर्डेकर

श्रावण म्हणजे काय? असे कोणालाही विचारले तरी सर्वांच्या समोर निसर्गाचं मनमोहक रूप उभे राहते. श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस, श्रावण म्हणजे ऊन-पावसाचा खेळ, अशी किती तरी श्रावणाची रूपे आपणाला सांगता येतील. श्रावण म्हणजे एक मांगल्याचे प्रतीक असलेला महिना असे वर्णन करता येईल. जो तो आपापल्या परीने व्रतवैकल्य उपासतापास करीत असतो. माणसाच्या गरजा या वेगवेगळ्या असतात आणि या गरजा माणसाला आनंद निर्माण करून देत असतात. जगात सुखी असा कोण आहे? हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे माणसांच्या गरजांच्या चक्राप्रमाणे त्याचा आनंद सादर होतो. म्हणून श्रावण तुम्हाला कसा वाटला, कसा भावला हे माणसागणिक अगदी वेगवेगळे असते.

मुळात श्रावण हा शब्दच ऊर्जा देणारा आहे. अगदी गरिबापासून श्रीमंतापर्यंत श्रावण हा मनाच्या कोपऱ्यात अगदी घर करून बसलेला असतो. श्रावण हा शब्द येताच प्रथम ‘श्रावणात घननिळा बरसला..’ हे लताताईंचे शब्द आपल्या ओठावर तरळू लागतात. श्रावण हा ऋतूच आपल्याला प्रेमाचा गोड संदेश देत असतो. निसर्गाची किमया म्हणावी, तर या दिवसांत उधळण करत असतो. सारा निसर्ग जणू नवचैतन्याने न्हाऊन गेलेला असतो.

कोकणातील श्रावण नयनरम्य असतो असे म्हणायला काहीच हरकत नाही. निसर्गाने कोकणावर जणू अलंकाराची उधळणच केली आहे. माझे मन हे कोकणातील नयनरम्य अशा निसर्गातच अडकले. माझ्या कोकणची माती मला नेहमीच साद घालत असते.

कोकण म्हटल की, आपल्या डोळ्यांसमोर येत ते सह्याद्रीच्या पर्वत रंगा, माडांच्या रांगा, आंबा, काजू, कोकमाची, फणसाची झाडे आणि अथांग समुद व मोठमोठ्या नद्या असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. कोकणातील खूपशी ठिकाणे प्रसिद्ध आहेत. लोटे परशुराम, वेळणेश्वर, गणपतीपुळे, हेदवी, डेरवण, पावस, मार्लेश्वर. पण काही ठिकाणे खूप सुंदर असूनसुद्धा अपरिचित जरा हटके आहेत.

श्रावण म्हटले की, आजही माझ्या डोळ्यांसमोर कोकणातील नयनरम्य निसर्ग ठाण मांडून उभा राहत असतो. श्रावणात भूमी हिरवागार शालू नेसून अगदी नव्या नवरीसारखी नटलेली असते. नद्या-नाले वाहत असतात. धबधबे तर किती बघू आणि किती नको, असे वाटत असते. भातलावणीची कामे आटोपून नाचणी टोवण्याची कामे सुरू झालेली असतात. शेतकरी कामात अगदी गढून गेलेला असतो आणि या काळात त्याला आनंद देण्याचे काम हा श्रावण करत असतो. श्रावणात येणारे सण हे कोकणात अगदी आनंदाने साजरे केले जातात. सण कसे साजरे केले जातात हे आपल्याला कोकणात दिसून येतं, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. या काळात रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, नागपंचमी, जन्माष्टमी, दहीकाला हे सण कसे साजरे करावेत याचा आदर्श आपण कोकणातून घ्यावे. कुठलाही गाजावाजा न करता अगदी भक्तिभावाने हे सण साजरे केले जातात.

कोकण हा भौगोलिकदृष्ट्या डोंगर-नद्या-नाले-टेकड्या यांनी व्यापलेला आहे. श्रावणामध्ये निसर्गाच्या सृष्टीचा आस्वाद घेताना अगदी दृष्टी कमी पडते. हिरवागार निसर्ग वाहणाऱ्या नद्या-नाले हे सगळं अगदी विलोभनीय. श्रावणात पडणारा पाऊस हादेखील जणू जिवलग वाटणारा सखा असतो. कोणतेही नुकसान न पोहोचवणारा पाऊस अगदी उन्हाबरोबर लपंडाव खेळत असतो.

आम्ही लग्न झाल्यावर पहिल्यांदाच श्रावण अनुभवण्यासाठी आमच्या गावी सावर्डे (चिपळूण) येथे गेलो. रात्रीची गाडी पकडून सकाळी कोकणात पोहोचणार होतो. एवढा लांबचा प्रवास मी कधीच केला नव्हता. सकाळी ४ वाजता गरमगरम चहा घेतला. पुढे निघालो, तर वाशिष्ठी नदी धुक्याचे दुलई पांघरून आमचं स्वागत करायला तयार होती. सकाळी धुक्यातून गाडी जाताना काश्मीरलाही मागे टाकणारे सृष्टीसौंदर्य दृष्टीस पडत होते. कधीही कोकण न पाहिलेली मी फारच भारावून गेले. सूर्यराजाचे स्वागत करायला या मस्त वातावरणात सावर्डे कधी आलं आम्हाला समजलेही नाही. सकाळी ८ वाजता आम्ही सावर्ड्याला पोहोचलो. आमचे नवीन लग्न झाले. त्यामुळे आमचे भाचे कंपनी, पुतण्या-पुतणे, दीर-नणंदा यांना तर किती करू आणि किती नाही झाले.

नंतरच्या दिवशी आम्ही सगळे सावर्ड्यापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर मालदोली बंदर आहे. तेथे कोकण क्रोकोडाईल सफारी आहे. चिपळूण गुहागर मार्गावर आत शिरल्यावर प्रत्येक ठिकाणी संदेश संसारे यांचे कोकण क्रोकोडाईल सफारीचे फलक लावलेले आपल्याला दिसतात. मालदोलीला पोहचल्यावर वशिष्ठी नदीचे विशाल पात्र आपल्या दृष्टीस पडते. नदीत जाण्यासाठी तेथे मोटार बोटींची सोया केली आहे. बोटीतून प्रवास करतानाचा अनुभव खूपच छान होता. अंदाजे ३ किलोमीटर आत गेल्यावर आपल्याला क्रोकोडाईल (मगरी) दिसायला लागतात. आपल्या बोटींजवळ मगरी येतात, पण आपल्याला काहीही इजा करीत नाहीत. अस्ताला जाणारा सूर्य आणि मगरींचे स्वछंद विहार करतानाचे दृष्य डोळ्यांत साठवून ठेवावेसे वाटते. मनसोक्त फोटो व शूटिंगच्या आनंद घेता येतो. बोटीत जवळजवळ तासभर मनसोक्त भटकलो. ठिकाण खूपच स्वच्छ आहे. मला कोकणातील श्रावण महिन्याचा अनुभव घ्यायचा असल्यामुळे मी आणि माझे पती काही दिवसांची सुट्टी काढून तेथेच राहण्याचे ठरवले. बाकी सगळे मुंबईत परतले.

दुसऱ्या दिवशीपासून ‘श्रावण’ सुरू झाला म्हणजे सणावारांची सुरुवात होत असे. नागपंचमीची मज्जा तर विचारू नका. दहा-दहा दिवस अगोदर माती आणून बनवलेला नाग, त्याचे रंगकाम आणि नागपंचमीच्या दिवशी बसवलेला नाग, त्याची पूजा आजही लक्षात आहे. नागाची पूजा झाल्यावर आम्ही सगळ्या नवीन लग्न झालेल्या मुली फुगड्या घातल्या. गाणी म्हंटली झोके घेतले. नागपंचमीच्या दिवसापासून जाखडी नृत्याची तालीम सुरू होत असे, ती अगदी गणपती येईपर्यंत. मंगळागौरीला तर विचारूच नका. इतकी धमाल की बास. जिची मंगळागौर असायची तिच्या घरी आदल्या दिवशीपासून तयारी करायची. मंगळागौरीचे वेगवेगळे खेळ खेळलो. जिची मंगळागौर तिने मौन घेऊन जेवायचे. बाकीच्यांनी तिला बोलण्यासाठी उचकावयचे. किती मज्जा ती.

जन्माष्टमीच्या दिवशी जागवलेली रात्र आणि दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येणारा दहीहंडी उत्सव हा जणू एकात्मतेचे प्रतीक. दही-हंडी उत्सव कसा साजरा करावा हे आजच्या शहरातील लोकांनी गावातील लोकांकडून शिकले पाहिजे. श्रावणी सोमवार, मंगळवार आणि शनिवार या दिवशी धरलेले उपवास, श्रावणात घडणाऱ्या विलोभनीय अशा गणपतीच्या मूर्ती असा हा विलोभनीय श्रावण अगदी सर्वांना हवाहवासा वाटतो. आजच्या या सिमेंटच्या युगात खरंच ती मजा हरवल्यासारखी वाटते. मुंबईमधले सण आता कृत्रिम वाटू लागले आहेत. अशा वेळी कोकणातले श्रावणातले विलोभनीय असे दिवस आठवतात. तेच दिवस माझ्या आयुष्यात इंद्रधनुष्याप्रमाणे रंग भरतील, यात शंका नाही.

काही दिवसांत जीवनाचा आनंद मनसोक्त लुटून घेतला आणि फ्रेश मूडमध्ये गावाच्या आठवणींची आयुष्यभराची शिदोरी घेऊन आम्ही परतीला निघालो खरे. पण माझे मन मला परत परत कोकणाकडे वळवत होते. किती रम्य होते, ते कोकणातील दिवस.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

14 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

15 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

22 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

26 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

35 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

38 minutes ago