मुंबई (प्रतिनिधी) : ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने ‘७ ज्योतिर्लिंग यात्रा’ भारत गौरव ट्रेन सुरू केली आहे. आयआरसीटीसीद्वारे चालवली जाणारी ‘७ ज्योतिर्लिंग यात्रा’ भारत गौरव ट्रेन गुरुवारी सकाळी ६.४५ वाजता योग नगरी ऋषिकेश येथून निघाली आहे.
ही गाडी पश्चिम मार्गाने १ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेला पोहोचेल. ही ट्रेन कमान रोड, नाशिक रोड, अंकाई येथे थांबेल आणि २ ऑगस्ट रोजी दक्षिण मध्य रेल्वेच्या दिशेने प्रवास करेल. परतीच्या प्रवासात ही गाडी ३ ऑगस्ट रोजी अंकाई आणि पुणे येथे जाईल आणि ४ ऑगस्ट रोजी पश्चिम मध्य रेल्वेच्या दिशेने प्रवास करेल. एलएचबी रेक – एक एसी २ टियर, १ एसी ३ टियर, ९ शयनयान वर्ग, १ पॅन्ट्री कार आणि १ जनरेटर व्हॅन अशी या गाडीची संरचना असेल.
देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या पुढाकाराने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ आणि ‘देखो अपना देश’ अंतर्गत भारत गौरव पर्यटक ट्रेन सुरू केली गेली आहे. ही आयआरसीटीसी टुरिस्ट ट्रेन एक सर्वसमावेशक टूर पॅकेज असेल आणि आयआरसीटीसी प्रवाशांना सुरक्षित आणि संस्मरणीय अनुभव देण्याचा प्रयत्न करेल, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे.