
एका महिलेच्या तक्रारीनंतर काळ्या जादूचे किळसवाणे प्रकार उघडकीस आल्याने मुंबईपासून ठाण्यापर्यंत हजारो बाबाभक्त हादरले
फसवणूक झालेल्या महिलांनी पुढे येण्याचे भाईंदर पोलिसांचे आवाहन
भाईंदर : सरकारने राज्यात अनिष्ट-अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. तसेच जादूटोणा, तंत्रमंत्र वगैरेंनी आयुष्यात काहीही फरक पडत नाही, असे विज्ञानाने वारंवार दाखवून दिले आहे. नरेंद्र दाभोलकर, शाम मानव यांच्यासारख्या अनेकांनी आपले आयुष्य जनजागृतीसाठी खर्ची घातले. तरीही मुंबई- ठाण्यासारख्या शहरातील आणि सुशिक्षित लोकही मांत्रिक-तांत्रिकांच्या आहारी जातात आणि सर्वस्व गमावून बसतात. असाच एक धक्कादायक प्रकार भाईंदर मधून समोर आला आहे. महिलांना फसवून त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून काळा जादूच्या (Black Magic) नावाखाली महिलांना हेरून त्यांच्यावर बलात्कार करणा-या मुकेश दर्जी नावाच्या ढोंगी बाबाला भाईंदर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उपाय म्हणून तीला जे सांगितले ते ऐकून सर्वांचे होश उडाले आहे. सलग पाच वर्ष महिलेचा छळ केल्याचे समोर आले आहे. तसेच अशा प्रकारे त्या नराधमाने कित्येक महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे देखिल यानिमित्ताने उघडकीस आल्याने मुंबईपासून ठाण्यापर्यंत असलेले हजारो बाबाभक्त अनुयायी हादरले आहेत.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर या ढोंगी बाबावर बलात्कार आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट-अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पस्तीस वर्षांच्या या पीडित महिलेच्या तक्रारीत तिने म्हटले आहे की, दैनंदिन जीवनातील समस्या, अडचणी आणि समस्यांनी त्रस्त असलेल्या या पीडितेने आपले मन तिच्या एका मैत्रिणीकडे मोकळे केले. या वेळी तिच्या मैत्रिणीने तिला या मांत्रिकाची वाट दाखवली. त्याच्याकडे जाऊन उपचार करण्याचा सल्ला दिला. इतकेच नव्हे तर आपल्या आयुष्यातही अनेक अडचणी होत्या. पण त्या मांत्रिकामुळेच दूर झाल्याचे तिने सांगितले.
पीडितेने मैत्रिणीवर विश्वास ठेवला. मैत्रिणीनेही पीडितेला मांत्रिकाबाबत अनेक चुकीच्या गोष्टी सकारात्मक दृष्टीने सांगितल्या. इतक्या की, मांत्रिक फार जालीम आहे. तो कोणत्याही कठीण समस्या बऱ्या करतो असे सांगितले. पीडिता मांत्रिकाकडे गेली. त्याने तिला तुझ्या आयुष्यातील समस्या दूर होतील. परंतू, त्यासाठी पूजा करावी लागेल. उपाय म्हणून माझ्यासमोर विवस्त्र होऊन ही पूजा करावी लागेल. गरज पडल्यास आपल्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करावे लागतील असेही त्याने सांगितले. आपलं दु:ख, दारिद्र्य संपेल आणि समस्यांचे निराकरण होणार म्हणून पीडितेने या सर्व गोष्टींना संमती दर्शवली.
धक्कादायक म्हणजे पीडिता पाठिमागचे पाच वर्षे तांत्रिकाच्या सल्ल्याने वागत होती. तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. ती मुकाटपणे सहन करत होती. मात्र, वारंवार वर्षानुवर्षे अत्याचार करुनही परिस्थितीत काहीच बदल होत नव्हता. त्यामुळे पीडितेला संशय आला. तिने थेट भाईंदर पोलीस स्टेशन गाठले आणि तांत्रिकाविरोधात तक्रार दिली.
हा भोंदू बाबा काळी जादू करताना लहान मुलीच्या पोटातील कुठल्यातरी अवयवापासून बनवलेला धूप वापरतो, असे या महिलेने सांगितले. लिंबू विधी, महिलांशी संभोग विधी, जिनला बोलावण्याचा विधी असे प्रकार तो करत असल्याचेही महिला म्हणाली. धुपामध्ये एक कापूस आणि लाल डाग असल्याचे पीडित महिलेने सांगितले. या भोंदू बाबाच्या आहारी गेलेल्या अनेक महिलांनी काळी जादू करण्यासाठी आपले मंगळसूत्र आणि घर विकून पैसे काढल्याचे पीडित महिलेने सांगितले.
पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखवत तांत्रिकाला अटक केली. त्याच्याविरोधात अघोरी व जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात आरोपीने आणखी किती महिलांना जाळ्यात अडकवून ठेवले आहे? किती महिलांची फसवणूक झाली आहे, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
या प्रकरणात फसवणूक झालेल्या महिलांनी समोर येऊन आपल्या तक्रारी दाखल कराव्यात, कोणाचेही नाव उघड केले जाणार नाही, सर्व माहिती गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन भाईंदर पोलिसांनी केले आहे.