कोल्हापूर: कोल्हापूरातील (Kolhapur) जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीतील (Panchganga River) पाण्याची पातळी इशाऱ्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. पंचगंगा नदीचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंत आल्याने गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांना स्थलांतराच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत असल्यामुळे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांना आता जिल्हा प्रशासनाबरोबरच ग्रामपंचायतकडूनही वेळीच स्थलांतरीत होण्याचा सूचना दिल्या जात आहेत. कोल्हापुरात महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली गावात सध्या ग्रामपंचायतकडून स्पीकरच्या सहाय्याने आवश्यक साहित्यासह आज सायंकाळपर्यंतच गाव सोडण्यासाठी सांगितलं जात आहे.
पंचंगंगेची पातळी इशाऱ्यापर्यंत
आज दुपारी तीनपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी ३८ फुट २ इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ आणि धोका पातळी ४३ फूट आहे. जिल्ह्यातील ८२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
ऑरेंज अलर्ट
दरम्यान, हवामान विभागाकडून कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून २६ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, सांगली जिल्ह्यासाठी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.
गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस
गेल्या २४ तासात जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली. तालुक्यात गेल्या २४ तासात १०५. ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.