रवींद्र मालुसरे
महाराष्ट्र राज्य संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, तर मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशीचा मोठा उत्साह. या आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरू आहे. देशासह जगभरातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. मुंबईत विशेषतः मध्य मुंबईच्या गिरणगावात विठ्ठल मंदिरासह काही ठिकाणी गेली अनेक वर्षे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जाते. बदलत्या काळासोबत मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा अस्तंगत होत आहेत. वाड्या-वस्त्यांची मुंबई गगनभेदी होत आकाशाला भिडत चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी काही महाराष्ट्रीय परंपरा अजूनही टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेली श्री विठ्ठलाची मंदिरे आणि त्यात होणारे अखंड हरिनाम सप्ताह.
मुंबई नगरीला ‘सोन्याची नगरी’ म्हटले जाते. पण त्यापेक्षा तिला मंदिराची नगरी म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल. मुंबई नगरीत जवळजवळ ४८१ पेक्षा अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीची, त्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा, तर देवींची मंदिरे ही पुरातन आहेत. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची शंभर वर्षांहून अधिक वर्षे वारकरी परंपरा जोपासणारी अनेक मंदिरे सुद्धा मुंबईत आहेत. प्रत्येक आषाढी एकादशीला टाळ मृदंगाचा गजर आणि ‘ग्यानबा-तुकाराम’च्या जयघोषात तल्लीन वारकरी हेच दृश्य मुंबईतल्या मंदिरांमध्येही पाहायला मिळते.
श्री विठ्ठल मंदिर : वडाळा
वडाळा बस डेपोजवळ, कात्रक रोडवरील श्री विठ्ठल मंदिर सर्वांना परिचित आहे. एकेकाळी या मिठागराच्या बेटावर व्यापारी असत. त्यातील एका व्यापाऱ्याला विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. त्यांनी ती पंढरपूरला संत तुकाराम महाराजांना दाखवली आणि त्यांनी मंदिर बांधण्यास सांगितले अशी आख्यायिका आहे. पुढे मुंबई विस्तारात गेली आणि या मंदिराचा लौकिक वाढू लागला. आषाढी एकादशीला सर्वदूर मुंबईतील हजारो भाविक भक्त दिंड्या-पताका घेऊन येथे येत असतात. मुंबईतील ज्या विठ्ठल भक्तांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हे मंदिर एक ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून उभे आहे.
प्रभादेवी : प्रभादेवी गावासाठी कै. हरी दामाजी परळकर यांच्या स्मरणार्थ त्यांची सून ताराबाई परळकर यांनी हे मुरारी घाग मार्गावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सन १९०० मध्ये बांधले. गुरुवर्य अर्जुन मामा साळुंखे, गुरुवर्य नारायणदादा घाडगे, गुरुवर्य रामदादा घाडगे अशा चार पिढ्या परमार्थ करीत आहेत. सन १९१५ च्या काळात हभप रामकृष्ण भावे महाराज मुंबईत ‘जगाच्या कल्याणा’ या ध्येयाने प्रेरित होऊन आले होते. रामभाऊ हे श्री विठ्ठलभक्त आणि सेवाधारी होते, बाळकृष्ण वासुदेव चाळीत असा सप्ताह उत्तमरीत्या पार पडल्याचे त्यांनी स्वतः अनुभवले होते. आपल्या आचार-विचाराद्वारे ‘जग लावावे सत्पथी’ हेच कार्य ठळकपणे करणाऱ्या भावे महाराजांना रामभाऊ नाईक भेटले आणि विनंती केली, आमच्या मंदिरात सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू करावा. त्यांनी या सूचनेचे स्वागत केले आणि मग सन १९२१ पासून गोकूळ अष्टमीनिमित्त श्रावण शुद्ध चतुर्थीपासून पुढे सात दिवसांचा दुसरा अखंड हरिनाम सप्ताह प्रभादेवीत सुरू झाला. त्याच मंदिरात पुढे काही काळानंतर माघ शुद्ध दशमीपासून सात दिवसांचा तिसरा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला.
वान्द्रे : सरकारी वसाहतीत १९७६ पासून अस्तित्वात असलेल्या या मंदिरात श्रीविठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती या काळ्या पाषाणातील, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती संगमरवरी स्वरूपात आहेत. संत मुक्ताबाईंची सुंदर तसबीर आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘संत मुक्ताबाई पुण्यतिथी समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह’ साजरा होत असतो. वरळी : सेंच्युरी मिल वसाहत हरीहर संत सेवा मंडळ येथील कामगार वसाहतीत प्रांगणात निवृत्ती महाराज समाधी पुण्यतिथी सोहाळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण १९६५ पासून आयोजित केले जाते.
लोअर परेल : बारा चाळ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर. श्रीक्षेत्र पंढरपूरला बडवे मंडळींकडून भाविकांना होणारा त्रास आणि यात्रेच्या वेळी शासनाने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १९६७ मध्ये जुन्नरचे कीर्तन केसरी गुरुवर्य रामदासबुवा मनसुख यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू होता. लोअर परेल येथील या मंदिरात भक्ती करणारे ज्ञानेश्वर मोरे माऊली हे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष होते.
वरळी कोळीवाडा : श्री शंकर मंदिर हे कोळी बांधवांनी १८ ऑगस्ट १९०४ मध्ये बांधले. त्यानंतर १९२२ ला आळंदी निवासी गुरुवर्य तुकाराम महाराज कबीर त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. साधारण १९२५ पासून या ठिकाणी त्रयी सप्ताह (तीन आठवड्यांचा) अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. तीन आठवडे सातत्याने चाललेला असा हरिनाम सप्ताह महाराष्ट्रात इतरत्र कुठेही नाही. १९५३ पासून आजतागायत हैबतबाबा दिंडी क्रमांक १ रथाच्या पुढे आळंदी ते पंढरपूर अशी पायी दिंडी वारी या मंदिरातील भाविक भक्त निष्ठेने करीत आहेत.
सायन : शीव म्हणजे आताच्या सायन फ्लायओव्हर जवळील श्री विठ्ठल मंदिर. श्रीधर दामोदर खरे हे १८६० साली मुंबईत आल्यानंतर सायनमध्ये स्थायिक झाले. ते एकदा पंढरपूरला वारीसाठी गेले असता त्यांनी धातूंची मूर्ती आणली; परंतु ती चोरीस गेली. त्यानंतर त्यांनी पाषाणाची मूर्ती घडवून घेतली. त्यावेळी त्या ठिकाणी आगरी-कोळी लोकांची वस्ती मोठ्या प्रमाणात होती, त्यांनी एकत्र येऊन मंदिर बांधले आणि १८९३ मध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. आषाढी एकादशीला मंदिराला विलोभनीय सजावट करण्यात येते.
माहीम : माहीम फाटक ते मोरी रोड या भागातील १९१६ सालचे प्रसिद्ध माहीम विठ्ठल-रखुमाई मंदिर. १९१४-१५ मध्ये माहीम इलाख्यात प्लेगची साथ पसरली होती. भयभयीत झालेले लोक एका तांत्रिक भगताकडे गेले तेव्हा त्याने सांगितले, या बेटावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची उभारणी करा. तेव्हा १९१६ साली मंदिराचे निर्माण केले. आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक आणि भजनाचे कार्यक्रम हजारो गर्दीत होत असतात.
बांद्रे – बाळाभाऊ तुपे यांनी संकल्पना मांडल्यानंतर नाभिक समाजाने ९ जानेवारी १९४० साली श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराची उभारणी केली. स्थानिक भाविकांच्या गर्दीत आषाढी एकादशी साजरी केली. अनेक दिंड्या
येत असतात.
भायखळा : भायखळा पश्चिमेला ना. म. जोशी मार्गावर श्री विठ्ठल रखुमाई १२९ वर्षांचे हे पुरातन मंदिर आहे. मंदिरात नित्य भजन, पोथीवाचन, आरती, हरिपाठ होत असतात. प्रदीर्घ चाललेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा निष्ठेने पार पाडली जात आहे. आषाढी एकादशीला सातरस्त्यापासून भायखळ्यापर्यंत हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.
दादर : जीवनाचा सुरुवातीचा अधिक काळ अलिबाग येथे झाल्याने अलिबागकर हे आडनाव स्वीकारलेले; परंतु मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपत ल. गुडेकर यांनी आपल्या धार्मिक कार्याला प्रभादेवीतील गोखले रोड झेंडू फार्मसी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात १९५२ पासून श्रीराम नवमी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली. गाथ्यावरील भजन, पोथी वाचन, एकादशीला कीर्तन हे तेव्हापासून नित्य होत असतात. आषाढी एकादशीला दादर सैतानचौकी, एल्फिन्स्टन परिसरातील शेकडो भक्त दर्शनाला येत असतात.
(लेखक हे मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे अध्यक्ष आहेत.)