
मुंबई: राज्यात पाऊस (Rain) काही ठिकाणी दडी मारण्याची शक्यता असल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना (Farmer) जर दुबार पेरणी करावी लागली तर बी बियाणं तयार ठेवण्याचे आदेशही मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस काही दिवस तरी दडी मारण्याची शक्यता आहे. विशेषत: मराठवाड्यामध्ये दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता मंत्रिमंडळ बैठकीत वर्तवण्यात आली आहे.
राज्यभरामध्ये काय आहे पावसाची परिस्थिती आणि किती झाली पेरणी?
राज्यात १ जून ते २१ जून या कालावधीत १६.७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीच्या ११.५ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. राज्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून ) १४२.०२ लाख हेक्टर असून २१ जूनपर्यंत या वरती १.९८ लाख हेक्टर (१.३९ टक्के) क्षेत्रावर ती पेरणी झालेली आहे. तर, राज्यात खरीप पिकांचे (ऊस पिकासह ) सरासरी क्षेत्र १५२. ९७ लाख हेक्टर असून १.९८ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १.३० टक्के पेरणी झालेली आहे.
कोणत्या विभागात किती पेरणी झालेली आहे (२१ जूनपर्यंतची आकडेवारी)
- कोकण विभाग
कोकण विभागात खरीप पिकाखाली सरासरी क्षेत्र ४.१४ लाख हेक्टर असून ०.४२ लाख हेक्टर क्षेत्रावर (१०.६ टक्के) पेरणी झाली आहे.
- नाशिक विभाग
नाशिक विभागात खरीप पिकाखाली सरासरी क्षेत्र २०.६५ लाख हेक्टर असून १.०८ लाख हेक्टरक्षेत्रावर ५.२३ टक्के पेरणी झालेली आहे. नाशिक विभागात बागायती क्षेत्रात कापूस, तांदूळ, मका पिकांच्या पेरणीची काम सुरू आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी पावसाभावी पेरण्याची कामे खोळंबली आहेत
- पुणे विभाग
पुणे विभागात खरीप पिकाखाली सरासरी क्षेत्र 10.65 लाख हेक्टर असून 324 हेक्टर क्षेत्रावर ती पेरणी झालेली आहे.