
पालिका उभारणार ४ ठिकाणी प्रक्रिया केंद्र
मुंबई (प्रतिनिधी) : सागरी किनारा मार्ग प्रकल्प परिसरालगत व समुद्रालगत असणाऱ्या झोपडपट्ट्यांमधील सांडपाण्याचा विसर्ग तेथील समुद्रात होतो. मात्र, पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचा पथदर्शी प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. या पथदर्शी प्रकल्पांतर्गत ४ ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत असून याद्वारे दररोज तब्बल ४ लाख ८५ हजार लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करता येणार आहे. या प्रकल्पातील ४ प्रक्रिया केंद्रांद्वारे प्रक्रिया केलेले पाणी हे परिसरातील शौचालयांमध्ये व उद्यानांमध्ये वापरण्यात येणार आहे. यामुळे सांडपाण्याचा योग्य वापर होण्यासोबतच पर्यावरणपूरकता देखील जपली जाणार आहे.
सध्या पूर्णत्वाकडे वेगाने वाटचाल सुरू असलेल्या सागरी किनारा रस्ता प्रकल्पालगत विविध ४ ठिकाणी झोपडपट्टी परिसर आहे. यामध्ये टाटा उद्यानाजवळ असणारा शिवाजी नगर परिसर, महालक्ष्मी मंदिराच्या दक्षिण बाजूला असणारा दर्या सागर परिसर, महालक्ष्मी मंदिराच्या उत्तर बाजूला असणारा दर्या नगर परिसर आणि अॅनी बेझंट मार्गावरील लव्हग्रोव्ह पंपिंग स्टेशनच्या समोर असणाऱ्या मार्केडेश्वरच्या मागील परिसर या ४ परिसरांचा समावेश आहे. या चारही परिसरांमध्ये सुमारे ९ हजार ५०० इतकी लोकवस्ती आहे. या चारही परिसरांसाठी तेथील लोकसंख्येच्या गरजेनुसार सांडपाणी प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी शिवाजी नगर येथील प्रक्रिया केंद्राचे काम आता अंतिम टप्प्यात असून उर्वरित ३ प्रक्रिया केंद्रांचे काम देखील वेगाने सुरू आहे.
शिवाजी नगर येथील प्रक्रिया केंद्राची क्षमता ही दररोज ५० हजार लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची असून दर्या सागर प्रक्रिया केंद्राची क्षमता ही ३५ हजार लीटर इतकी आहे. तर दर्या नगर व मार्कंडेश्वर मंदिराच्या मागील परिसर येथील प्रक्रिया केंद्रांची क्षमता ही अनुक्रमे दररोज १ लाख लीटर व ३ लाख लीटर इतक्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची असणार आहे. यानुसार चारही प्रक्रिया केंद्रांची एकत्रित क्षमता ही दररोज ४ लाख ८५ हजार लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची असणार आहे.