Saturday, July 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखUddhav Thackrey: पाटण्यातील बैठकीत, ठाकरेंची फरफट

Uddhav Thackrey: पाटण्यातील बैठकीत, ठाकरेंची फरफट

केंद्रातील सत्तेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटविण्यासाठी आणि येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी बिहारमधील पाटणा येथे पंधरा विरोधी पक्षांची बैठक झाली. आगामी निवडणूक एकत्रपणे लढवणे, मोदी आणि भाजपचा पराभव करणे याचा निर्धार या बैठकीत उपस्थित नेत्यांनी बोलून दाखवला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेऊन बोलावलेल्या या बैठकीस राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, ममता बॅनर्जी, शरद पवार, लालू प्रसाद यादव, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, सीताराम येचुरी असे दिग्गज नेते हजर होते. पंधरा पक्षांचे बत्तीस नेते बैठकीला उपस्थित होते. लालू प्रसाद यादव हे तेजस्वीसह, उद्धव ठाकरे हे आदित्यसह, ममता बॅनर्जी आपला भाचा अभिषेकसह, शरद पवार हे त्यांची कन्या सुप्रियासह तेथे उपस्थित होते. हे मोदी विरोधकांचे संमेलन होते की, मोदींच्या झंझावातापुढे परिवार बचाव संमेलन होते? कट्टर मोदी विरोधक आणि भाजप विरोधी पक्षाचे नेते पाटण्यात एकत्र आणण्याचा पराक्रम नितीश कुमार यांनी करून दाखवला. देशात विधानसभा निवडणुकीनंतर जर कुठे भाजपविरोधी पक्ष सत्तेवर आला तर हेच नेते त्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला आवर्जून उपस्थित राहतात व आपल्या एकजुटीचे प्रदर्शन घडविण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रत्यक्षात ही एकजूट आहे की, केवळ फोटोसाठी जमणारा हा गोतावळा आहे? कर्नाटकमध्ये भाजपकडून काँग्रेसने सत्ता हिसकावून घेतल्यापासून आपण केंद्रात मोदींना पराभूत करू शकतो, असे भाजप विरोधकांना वाटू लागले आहे. मोदींना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मतदार उत्सुक आहेत व आगामी निवडणुकीची अगदी मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत, असा त्यांनी समज करून घेतला आहे. केंद्राची सत्ता हासिल करणे सोपे नाही याची विरोधी पक्षांतील काही बड्या नेत्यांना जाणीव आहे.

पण काँग्रेस वगळता विरोधी पक्षांतील बहुतेक नेते आपले राज्य व आपला परिवार यांतच गुंतलेले असल्याने विरोधकांची एकजूट किती टिकेल हे कोणी सांगू शकत नाही. उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बिहारला कदाचित प्रथमच गेले असावेत. आता त्यांच्याकडे महाराष्ट्राची सत्ता नाही. एकनाथ शिंदे यांनी धाडस दाखवून त्यांना सत्तेवरून अडीच वर्षांत हटवले. भाजपच्या पाठिंब्याने ते स्वत: मुख्यमंत्री झाले. सत्ता गेल्यापासून ठाकरे स्वत: चाचपडत आहेत. आता मुंबई महापालिकाही ताब्यात नाही. राज्य गेले, महापालिकाही गेल्यातच जमा आहे, त्यामुळे ज्याच्या जीवावर मातोश्रीचा रुबाब चालायचा, तो आता संपुष्टात आला आहे. आकडेवारीच्या खेळात एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आणि शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्य बाण हे पक्षाचे चिन्हही ठाकरेंना गमवावे लागले व ते शिंदे यांना मिळाले. त्यामुळे हातात काहीच नसताना ठाकरे, मुलाला व प्रवक्त्याला बरोबर घेऊन पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीला गेले. मुख्यमंत्रीपद गेल्यावर व पक्ष गमावल्यावरही त्यांचे पाटण्यात स्वागत करायला स्वत: मुख्यमंत्री नितीश कुमार आले, याचेच ठाकरे व त्यांच्या चेल्यांना अप्रूप वाटत आहे. नितीश कुमार यांना सध्या तरी काही गमवायचे नाही, उलट ते देशाच्या पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत आहेत. देशातील व विरोधी पक्षांचा नेता होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर नसले किंवा त्यांच्याकडे चार-पाच खासदार उरले असले तरीही त्यांना प्रत्येक विरोधी पक्षांचे महत्त्व आहे. सर्व विरोधकांना एकत्र केल्याशिवाय व भाजपच्या विरोधात एकत्रपणे लढल्याशिवाय मोदींचा पराभव होणार नाही, हे नितीश कुमार यांना चांगले समजते. म्हणूनच त्यांनी केलेल्या स्वागताने ठाकरेंना हुरळून जाण्याचे काहीच कारण नव्हते. पण त्यांचे चेले त्यांच्या स्वागताचे वर्णन करताना, असे भाग्य एखाद्या चक्रवर्ती राजालाच मिळते, असे सांगून त्यांना स्वप्नरंजनात ढकलत आहेत.

पाटण्याच्या विरोधकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची हजेरी म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या शब्दात सांगायचे तर ठाकरे यांनी सत्तेसाठी अगोदर हिंदुत्व खुंटीवर टांगले आणि आता पाटण्यात जाऊन वेशीवर टांगले.… पाटण्यातील बैठकीत ठाकरे हे जम्मू-काश्मीरमधील पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारीच बसले होते. त्यांच्याशी बातचित करतानाही दिसले. आता मेहबुबा या माजी मुख्यमंत्री आहेत व ठाकरे हेही माजी मुख्यमंत्री आहेत. कदाचित दोघांचे दु:ख समान असावे. पाटण्यातील बैठक ही दोन्ही नेत्यांची अपरिहार्यता होती. या दोघांचे राजकारण आता भाजपच्या विरोधात आहे. दोघांनी जो मार्ग निवडलाय त्यावरून त्यांना मागेही जाता येत नाही. नितीश कुमारपासून ते ममता किंवा मेहबुबांपर्यंत सारे नेते हे हिंदुत्वविरोधी आहेत. जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्यास या सर्वांचा विरोध होता. याच बैठकीला हजर असलेल्यांनी अयोध्येत राम मंदिर उभे राहावे म्हणून समर्थन केले नव्हते. मोदी सरकारने तिहेरी तलाख कायदा रद्द केल्यावर या बैठकीला हजर असलेल्यांनी बोटे मोडून सरकारच्या नावे ठणाणा केला होता. अशा हिंदुत्व विरोधकांच्या मांडीला मांडी लावून मोदी हटाव मोहिमेत सहभागी होण्याची पाळी उद्धव ठाकरेंवर आली आहे. भाजपकडे परतण्याचे दोर त्यांनी स्वत:च कापून टाकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना टोमणे मारून ते स्वत:ची किमत करून घेत आहेत. राहुल गांधी, नितीश कुमार आणि शरद पवार यांच्यामागे ठाकरे यांची फरफट चालू आहे आणि त्यांचे भविष्यही आता त्यांच्यावर अवलंबून आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -