
निवेदन देणार कोणाला?
मुंबई : उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गट मुंबई महापालिकेवर (BMC) विराट मोर्चा काढणार असून महापालिकेत प्रशासकीय राजवटीत सुरू असलेल्या उधळपट्टीला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. परंतु आता ठाकरे गटाच्या समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे. १ जुलै रोजी शनिवार असून या दिवशी पालिका मुख्यालयाला सुट्टी (Holiday) असते, त्यामुळे ठाकरे गट निवेदन देणार कोणाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठाकरे गटाच्या या मोर्चाची पालिका वर्तुळात चर्चा रंगत होती. मात्र आता या नव्या बाबीमुळे ठाकरे गटाचा मोर्चा बारगळणार की काय, अशी चिन्हे दिसत आहेत. १ जुलै रोजी शनिवार असून या दिवशी पालिका मुख्यालयाला सुट्टी असते. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असल्याने शनिवारी व रविवारी पालिका मुख्यालय बंद असते. केवळ सुरक्षा रक्षक असतात. त्यामुळे या दिवशी मोर्चा आणून मागण्यांचे निवेदन कोणाला देणार असा प्रश्न ठाकरे गटासमोर उभा ठाकला आहे.