-
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आगामी लोकसभा निवडणूक लढवावी म्हणजे भाजपचा पराभव करणे शक्य होईल, असे राहुल गांधींपासून नितीशकुमार, शरद पवारांपर्यंत सारे विरोधी नेते एका सुरात बोलत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी एकत्र असणार आहे का, हे सुद्धा ठामपणे सांगता येत नाही, मग देशपातळीवर भाजपचा पराभव व्हावा म्हणून देशव्यापी विरोधी पक्षांचे ऐक्य कितपत शक्य आहे?
लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी पाच दशकांपूर्वी काँग्रेसच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र आणले होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या कालखंडात १९७५ ते ७७ या काळात सोळा महिने काँग्रेस विरोधी नेते जेलमध्ये होते. त्यामुळे सर्व विरोधकांची मानसिकता काँग्रेसचा पराभव करण्यासाठी एकत्र येऊन लढण्याची झाली होती. आता जयप्रकाश नारायण यांचे शिष्य म्हणविणारे मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांचे ऐक्य घडविण्यासाठी धडपड करीत आहेत. केंद्रात व राज्यात सत्ता मिळविण्यासाठी सत्तेच्या परिघात राहण्यासाठी याच नितीशकुमार यांनी आजवर पाच वेळा इकडून तिकडे उड्या मारल्या आहेत. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, म्हणून राजदचा स्वार्थ समजू शकतो. पण नितीशकुमार यांना विरोधकांच्या ऐक्यासाठी एवढी घाई कशासाठी झाली आहे? कर्नाटकमध्ये भाजपला हटवून काँग्रेसची सत्ता आली, यामुळे नितीशकुमार यांना जोर चढला आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन २०२४ च्या निवडणुकीतील पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून आपले नाव जाहीर व्हावे ही त्यांची सुप्त इच्छा आहे. पाटण्यातील मेळाव्याला काँग्रेसच्या वतीने कोण हजर राहणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता आहे. विरोधकांच्या ऐक्यासाठी दुसऱ्या कोणी पुढाकार घेतला, तर काँग्रेसकडून फारसा प्रतिसाद दिला जात नाही हा आजवरचा अनुभव आहे. अगोदर भारत जोडो यात्रा व नंतर हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेला विजय, यानंतर राहुल गांधी यांचे राजकीय वजन वाढले आहे. पूर्वीचे राहुल व आताचे राहुल यात मोठा फरक आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून दुसऱ्या कोणाचे नाव जाहीर होणे हे काँग्रेसला कधीच मान्य होणार नाही. नितीशकुमार यांनी बोलविलेल्या बैठकीला राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे राहतील का?
निवडणुकीच्या जागा वाटपात काँग्रेस पक्ष त्या त्या राज्यात प्रबळ असलेल्या प्रादेशिक पक्षांपेक्षा कमी जागा स्वीकारायला तयार होईल का? गेल्या महिनाभरात नितीशकुमार यांनी ममता बॅनर्जी, शरद पवार, केसीआर, अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे आदी विरोधी नेत्यांच्या व्यक्तिश: भेटी घेतल्या. भाजप हटाव हाच सर्वांचा अजेंडा आहे. केवळ भाजप हटाव या एकाच मुद्द्यावर विरोधी पक्षांचे ऐक्य घडू शकेल का? दि. ५ जून १९७४ रोजी पाटण्यातील गांधी मैदानावरून जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीची घोषणा केली. काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्याचा संकल्प केला होता. पाटण्यातील याच गांधी मैदानावर विरोक्षी पक्षांचे शक्तिप्रदर्शन घडविण्यासाठी व भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा संकल्प जाहीर करण्यासाठी नितीशकुमार आतुर झाले आहेत. नितीशकुमार यांचे राजकारण सत्ताकेंद्रित असते. अटलबिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदींपर्यंत ते कसे त्यांच्याभोवती पिंगा घालत होते हे ममता बॅनर्जी व काँग्रेसच्या नेत्यांनी पाहिले आहे. जयप्रकाश नारायण यांनी पन्नास वर्षांपूर्वी संपूर्ण क्रांतीची घोषणा केली व त्यांच्या प्रेरणेतूनच काँग्रेसला सत्तेवरून हटविण्यासाठी जनता पक्ष स्थापन झाला. डावे, उजवे, समाजवादी सारे विरोधक जनता पक्षात सामील झाले होते. भारतीय जनसंघही जनता पक्षात सामील झाला होता. जनता पक्षाचे केंद्रात व अनेक राज्यांत सरकार आले, पण स्वत: जयप्रकाश नारायण हे पंतप्रधान झाले नाहीत किंवा सत्तेच्या परिघात राहिले नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे हे त्यांचे वेगळेपण म्हणावे लागेल. विरोधकांच्या ऐक्यासाठी पुढाकार घेणारे व भाजपच्या विरोधात वन टू वन लढू म्हणणारे नितीशकुमार हे कोणी जयप्रकाश नारायण नाहीत. ते सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत हा त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास आहे.
लोकसभेच्या ५४३ जागांपैकी १९० जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे. अन्य प्रादेशिक पक्षांचे तिथे काही काम नाही. या जागांपैकी ९२ टक्के जागांवर भाजपचे खासदार निवडून आले आहेत. याचा अर्थ १७५ जागांवर भाजपचे खासदार आहेत. काँग्रेसचे केवळ १५ खासदार येथे आहेत. लोकसभेच्या १८५ जागा अशा आहेत की, तेथे भाजपची लढाई बिगर काँग्रेस पक्षांबरोबर आहे. त्यातील १२८ जागांवर भाजपचे खासदार आहेत, तर ५७ जागांवर अन्य पक्षांचे खासदार निवडून आले आहेत. देशातील ७१ लोकसभा मतदारसंघांत काँग्रेसची लढाई बिगर भाजप पक्षांबरोबर आहे. त्यात ३७ मतदारसंघांत गेल्या वेळी काँग्रेसचा विजय झाला, तर ३४ मतदारसंघांत अन्य प्रादेशिक पक्षांचा विजय झाला. मध्य व उत्तर भारतातील बारा राज्यांत व तीन केंद्र शासित प्रदेशात लोकसभेच्या १६१ जागा आहेत. यामध्ये १४७ मतदारसंघांत काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे. बारा जागांवर काँग्रेस किंवा भाजप यांना प्रादेशिक पक्षांशी सामना करावा लागणार आहे. सन २०१९ मध्ये भाजपने बारा राज्यांतील १६१ पैकी १४७ जागा जिंकल्या व काँग्रेसला केवळ ९ जागा मिळाल्या होत्या. मध्य प्रदेशच्या सर्व २९ व छत्तीसगडमधील सर्व ११ जागांवर भाजपचा भगवा फडकला होता. कर्नाटकमधील २८ पैकी २१ जागांवर, गुजरातमधील सर्व २६ जागांवर, राजस्थानमधील २५ पैकी २४ जागांवर, हरियाणातील ११ पैकी १० जागांवर भाजपने विजय मिळवला होता. आसाममधील १४ पैकी ९ जगांवर भाजपचे खासदार निवडून आले होते. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल व ओडिसा मिळून १९८ लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यात भाजपचे ११६ खासदार आहेत. या राज्यात भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्ष असा १५४ मतदारसंघांत मुकाबला आहे. काँग्रेसला २५ जागांवर प्रादेशिक पक्षांचे आव्हान आहे, तर १९ जागांवर प्रादेशिक पक्ष हे एकमेकांशी लढत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, डावे पक्ष व भाजप असा चौरंगी सामना आहे.
या राज्यातील ४२ मतदारसंघांपैकी ३९ मतदारसंघांत भाजप विजयी झाला आहे किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशातून ८० पैकी भाजपचे ६२ खासदार निवडून आले आहेत. या राज्यात ७४ मतदारसंघांत भाजपची सपा किंवा बसपा यांच्याशी लढत आहे. केवळ चार मतदारसंघांत काँग्रेसला विजय मिळाला किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळ, लक्षद्वीप, नागालँड, मेघालय, पुडुचेरीमधील २५ पैकी १७ जागांवर काँग्रेसचे खासदार आहेत. वीस जागांवर काँग्रेस एक किंवा दोन क्रमांकावर आहे. महाराष्ट्र, पंजाब, तेलंगणासह ६ राज्यांतील ९३ लोकसभा मतदारसंघांत बहुरंगी लढत आहे. २०१९ मध्ये भाजपचे येथून ४० खासदार निवडून आले, तर अन्य पक्षांचे ४१ विजयी झाले. महाराष्ट्रात शिवसेना उद्धव गट आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली शिवसेना भाजपबरोबर आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मिजोराम, सिक्किम या राज्यांत मिळून ६६ जागा आहेत. पण इथे कुठे भाजपचा प्रभाव नाही. प्रादेशिक पक्षांनीच ३९ जागा जिंकल्या आहेत.
नितीशकुमार यांचा वन टू वन फॉर्म्युला २०२४ च्या निवडणुकीत वास्तवात उतरेल का? हाच कळीचा मुद्दा आहे. विविध राज्यांतील दोन डझन विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र येऊन निवडणूक लढवतील का? नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलरचे प्रमुख एच. डी. देवेगौडा, वायएसआर काँग्रेसचे प्रमुख के. जगमोहन रेड्डी, तसेच बीजू जनता दल व शिरोमणी अकाली दलाचे नेते उपस्थित होते. बसपाच्या नेत्या मायावती यांनीही आपला शुभ संदेश पाठवला होता. विरोधकांकडे सर्वमान्य नेता नाही आणि जागा वाटपात मतैक्य होण्याची शक्यता नाही.
[email protected]
[email protected]