मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि आर्थिक विषयासारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आज योगा महत्त्वाची भूमिका बजावत आहे, हे आज संपूर्ण जगाला कळून चुकले आहे. म्हणूनच तर आज आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाला महत्त्व प्राप्त झाले असून त्याला जागतिक मान्यताही मिळू लागली आहे. दरवर्षी २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जातो. या निमित्ताने गेल्या काही वर्षांपासून भारतातील सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीची ही समृद्ध परंपरा विश्वापर्यंत पोहोचत आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाच्या शारीरिक हालचालींना स्वास्थ ठेवणं क्रमप्राप्त झालं आहे. स्पर्धेच्या युगात जीवनातील स्वास्थ्य आणि स्थैर्य हरपले. सकाळी उठल्यापासून कामावर जाईपर्यंतच्या घडामोडी, कार्यालयातील काम, अधिक कामामुळे वाढणारा ताण-तणाव, घरातील अडीअडचणी, आर्थिक सामस्या यामुळे नैराश्य येणे, या व अशासारख्या परिस्थितीमुळेच सध्याचा समाज हा अनेकानेक समस्यांचे भांडार बनला आहे. त्यात अनेकांची घुसमट होत आहे. तणाव हा शब्द नित्याचाच झाला आहे. या शब्दाचा नेमका अर्थ न जाणणारे अल्पवयीनदेखील त्याच्या पाशवी विळख्यात अडकत आहेत. म्हणूनच आज नव्याने योगाभ्यास, प्राणायाम आणि पर्यायाने मन:शांती या सर्व मुद्द्यांचा परामर्श घेणे क्रमप्राप्त झाले आहे.
सध्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी साह्यभूत ठरणारी अनेक उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. विविध प्रकारचे व्यायामप्रकार शारीरिक तंदुरुस्ती मिळवून देऊ शकतात. मात्र शरीर हे केवळ हाडामासाचा गोळा नाही, तर त्याला मनही आहे. मनाची अस्थिरता आपल्या सर्व क्षमतांना प्रभावित करू शकते. म्हणूनच शरीराप्रमाणे मनाला नियंत्रित ठेवणारं, त्याचा विचार करणारं आणि व्यक्तीला शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक उन्नत अवस्थेपर्यंत नेणारं शास्त्र म्हणून योगाभ्यासाचा विचार व्हायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचे मन अत्यंत चंचल असते. हे मन सतत विचारांच्या गर्तेत अडकलेले असते. या सगळ्या परिस्थितीत मन ठिकाणावर ठेवण्यासाठी योगासनांची मोलाची मदत होते. योगासनांमुळे शरीरातील चयापचय क्रियाही सुरळीत राहते. मन स्वस्थ राहते आणि योगासाधनेमुळे मनाची एकाग्रता वाढून मन प्रफुल्लित बनते. योगासनांचे परिणाम शारीरिक आणि मानसिक या दोन्ही दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात. योगासनं हा केवळ व्यायाम प्रकार नाही तर हा मनाचाही व्यायाम आहे. म्हणूनच त्याचा दुहेरी लाभ मिळतो.
आजच्या धकाधकीच्या काळात आणि गुंतागुंतीच्या जीवन शैलीत तणाव वाढत आहेत. त्याचं नियोजन करायचं तर केवळ शारीरिक व्यायाम पुरेसे अथवा पर्याप्त नाहीत. त्यासाठी मनही संस्कारित असायला हवे, त्याच्यावर नियंत्रण मिळवायला हवे. या अर्थाने योगासनांचा अत्यंत चांगला उपयोग होतो. सूर्यनमस्काराला सर्वांगसुंदर व्यायाम म्हटलं जातं. म्हणूनच दररोज सूर्यनमस्कार केले तरी चांगले परिणाम दिसून येतात. अनेकजण प्राणायामही करतात. शरीराला ऑक्सिजनचा पर्याप्त पुरवठा होतो. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना योगासनांचे लाभ मिळतात. मुलांची आकलनशक्ती वाढणं, स्मरणशक्ती सुधारणं, एकाग्रता निर्माण होणे या हेतूने प्राणायाम आणि योगासनांचा अत्यंत चांगला उपयोग होतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘मन, मनगट आणि मेंदू बलवान असेपर्यंत माणूस हा माणूस आहे.’ म्हणूनच स्वत:मधले दोष दूर करून बलवान व्हावयाचे असेल तर योगासनांशिवाय पर्याय नाही. शारीरिक व्याधी, ताणतणावातून मानवाला मुक्ती मिळावी यासाठी गौतम बुद्धानेही विपश्यनेचा मार्ग पत्करला. या विपश्यनेमुळेच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यातूनच त्यांनी प्रज्ञा, करुणा, शील आणि शांततेचा संपूर्ण जगाला संदेश दिला. या विपश्यनेचे महत्त्व आज सर्वांनाच पटले आहे. म्हणूनच आज अनेक ठिकाणी विपश्यनेची शिबिरे घेऊन लहान-थोरामोठ्यांचे मन परावर्तीत केले जाते. यासाठी सत्यनारायण गोयंका गुरुजींनी आपली संपूर्ण हयात घालवून विपश्यनेचा प्रचार आणि प्रसार केला तो मानव कल्याणासाठीच. या विपश्यना किंवा योगाचे महत्त्व सर्वांना कळून चुकले आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला अधिकच महत्त्व देत अन्य देशांतून भारतात येणाऱ्या अनेक देशांच्या प्रमुखांना योगा करण्यास भाग पाडले. मोदी स्वत: योगा करतात आणि इतरांनाही करायला लावतात. आज शासकीय कार्यालये, अनेक संस्था, शाळा-महाविद्यालयात योगा केला जातो. आज २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस असून देशाच्या कानाकोपऱ्यांत हा दिन साजरा तर केला जाईलच, पण प्रत्यक्षात तो सर्वत्र कृतीत आणून लहान मुलांपासून महिला- पुरुषांकडून योगा केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून त्यांच्या पुढाकाराने बुधवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५.३० वाजता अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात योग प्रदर्शन केले जाणार आहे. योग म्हणजे मन आणि शरीर, विचार आणि कर्म, संयम आणि उपलब्धी यांची एकाग्रतेचे आणि मानव व निसर्गामधील सामंज्यस्याचे प्रतीक आहे, आरोग्य आणि कल्याणाचा एकत्रित दृष्टिकोन आहे, असे स्वत: मोदी मानतात. म्हणूनच मानवाला स्वस्थ, निरोगी व आनंदी जीवन जगावयाचे असेल, ताणतणावातून मुक्ती मिळवावयाची असेल तर योगाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे सर्वांनीच ध्यानात घेतले पाहिजे.