
नाशिक : पावसाचे अद्याप आगमन झाले नसल्याने नाशिकमध्ये एकीकडे धरणांनी तळ गाठला आहे. तर दुसरीकडे पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात कोथिंबीर जुडी ४ ते ५ रुपये दराने विकली जात होती, त्याच कोथिंबीरीला आज १०० ते ११० रुपयांचा भाव आला आहे. कोथिंबीरीसोबतच मेथी, शेपू, पालक या पालेभाज्यांचे दर देखील ५० टक्क्यांनी वाढले आहेत.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात असून इथूनच राज्यातील अनेक जिल्ह्यात भाजीपाला पुरवठा केला जातो. पण नाशिक कृषी उत्पन्न समितीत मुख्यत्वे पालेभाज्या आणि कोथिंबिरसोबत अन्य काही भाजीपाल्याची आवक घटून दर कमालीचे उंचावले आहेत.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाचे दमदार आगमन झाले नसल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे शेतीला देखील पाणी उपलब्ध होत नसल्याने भाजीपाल्याची आवक घटली आहे.
गेल्या महिन्यात भाजीपाल्याला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून देत आंदोलने केली होती. आता मात्र भाज्यांचे दर कडाडले असून सर्वच भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामांन्यांच्या खिशाला झळ सोसावी लागणार आहे.
दरम्यान पाऊस लांबल्याने आवक जवळपास ६० ते ७० टक्के कमी झाली असून जवळपास एक महिना ही परिस्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.