शिबानी जोशी
हुबळीला २० मे १८७९ ला संपन्न कुटुंबात जन्म झालेल्या कूर्तकोटी शंकराचार्य यांची नाशिक कर्मभूमी होती. आपल्या निर्वाणापूर्वी ११ वर्षे त्यांनी शंकराचार्य न्यास स्थापन केला. कूर्तकोटी लिंगेश पाटील समाजातले. लहानपणापासून अत्यंत हुशार. त्याबरोबरच धार्मिक, अध्यात्मिक विचारांनी भारावलेले होते. १९१७ साली त्यांची करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून नियुक्ती झाली. कूर्तकोटी गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य. महाराजांनी त्यांना महाभागवत पदवी दिली. गोंदवल्यास कूर्तकोटींचे एक तप महाराजांबरोबर सान्निध्य होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या सल्ल्यावरून ते १९१८ पासून नाशिकला स्थायिक झाले. धार्मिक गुरूंनीसुद्धा सामाजिक विकासामध्ये सहभागी झालं पाहिजे, असं त्यांचं ठाम मत होतं. कूर्तकोटी महाराजांचे डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर बी. एस. मुंजे, वीर सावरकर, डॉ. भांडारकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी घनिष्ठ संबंध होते.
हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या कूर्तकोटींना बनारस हिंदू विद्यापीठाच्या कुलगुरू पदाकरिता पंडित मदन मोहन मालवीय यांनी गळ घातली होती. अहिंदू झालेल्यांची शुद्धी करून घेणे तसेच हिंदू धर्मात पुनर्प्रवेशासाठी त्यांनी खूप काम केले. मंदिरांमध्ये हिंदूंबरोबरच मागासवर्गीयांना देखील प्रवेश मिळाला पाहिजे, या विचाराने नाशिकच्या काळाराम मंदिर, महाड तळ्याच्या सत्याग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर तेही पुरस्कर्ते होते. नाशिकमध्ये अस्खलित संस्कृत भाषेत भाषण देणारे ते पहिलेच व्यक्ती ठरतात. त्यांचा गीतेवरील गाढा अभ्यास पाहून अमेरिकेतील ओरिएंटल इन्स्टिट्यूट (सध्याचे हार्वर्ड) विद्यापीठाने त्यांना १९१९ साली डॉक्टरेट पदवी सन्मानानं प्रदान केली होती. ते स्वतः साहित्य आणि कलांचे चाहते होते. कूर्तकोटी महाराजांनी स्वतः संस्कृत भाषेत एक नाटक लिहिले होते. तसेच संगीतातही त्यांना रुची होती. १९६७ साली वसुबारसेच्या दिवशी त्यांचं निधन झाले (२९ ऑक्टोबर १९६७).
हिंदू धर्मामध्ये गाईला मातेसमान मानलं जाते. गाईचे अनेक उपयोग आहेत. गाईची महती लक्षात यावी, यासाठी शंकराचार्य न्यासाने मोरोपंत जी. पिंगळे यांच्या प्रेरणेने २००५ मध्ये गोशाळा स्थापित केली. कूर्तकोटींचे महानिर्वाण वसुबारसेच्या दिवशी झाले असल्यामुळेही त्याचे औचित्य व वेगळेपण विशेष! संघाचे वंदनीय कार्यकर्ते मोरोपंत पिंगळे यांच्या नावाने कार्यरत, पूर्ण गीर गाई असलेली, ही गोशाळा परिसरातील नागरिकांचे पर्यटनस्थळच झाले आहे. दरवर्षी वसुबारसेला या ठिकाणी गो-पूजन केले जाते. या ठिकाणी देवाचं अधिष्ठान असावं म्हणून २००६ साली वेंकटेशाचं मंदिर उभारण्यात आले. ७ फुटी मूर्ती तिरुपती देवस्थानकडून सप्रेम भेट देण्यात आली आहे.
शृंगेरी मठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती यांचा शंकराचार्य न्यासातर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. न्यासाला अनेक थोर व्यक्ती आवर्जून भेट देत असतात. यामध्ये मोरोपंत पिंगळे, माननीय मोहन भागवत, भय्याजी जोशी, दादा वेदक, प्रभाताई अत्रे, स्व. मनोहर पर्रिकर, राम नाईक, देवेंद्र फडणवीस, पद्मनाभ आचार्य अशी काही नावे घेता येतील. २००५ मध्ये न्यासाचा कार्यविस्तार मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर शहरात मध्यवस्तीत ४५० आसनांचे उत्कृष्ट वातानुकूलित, प्रशस्त पार्किंग सुविधा असलेले सभागृह बांधण्यात आले. त्यावरील मजल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भव्य कार्यालय आहे. त्या बाजूलाच सामाजिक चळवळींवरील मराठी ग्रंथांचे संदर्भ वाचनालय सर्वांसाठी खुले आहे. रुग्ण उपयोगी साहित्य केंद्रात विनाशुल्क उपकरणे उपलब्ध करून दिली जातात. जनकल्याण समितीच्या वतीने अद्ययावत अशी रक्तपेढी येथे चालवली जाते. रक्तपेढीची स्वतःची स्वतंत्र अशी इमारत आहे. न्यासाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर अनेक सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रम येथे आयोजित केले जातात आणि सर्व कार्यक्रम सर्वांना विनामूल्य उपलब्ध असतात.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात नाशिकमधल्या सुखद, थंड वातावरणामध्ये शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेता यावा यासाठी दिग्गज शास्त्रीय गायक वादकांना निमंत्रित करुन दोन दिवसांचा ‘कूर्तकोटी संगीत महोत्सव’आयोजित केला जातो. कलापिने कोमकली, पं. सतीश व्यास अशा अनेक शास्त्रीय संगीतकारांना ऐकायला महोत्सवाला नाशिककर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मुंबईतील एनसीपीए या नामांकित संस्थेशी संयुक्त करार करून शंकराचार्य न्यासातर्फे केवळ भारतीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार, रसिकांना नाशिकमध्येच ऐकायला मिळत आहेत, ते देखील विनामूल्य! यात पद्मभूषण बुधादित्य मुखर्जी तसेच केन झुकरमन, जोश फाईनबर्ग यांची नावे घेता येतील.
‘वाचाल तर वाचाल’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणून गेले होते की, आपल्या देशात ज्यावेळी देवालयाकडून वाचनालयाकडे पावलं वळतील, त्याचवेळी आपल्या देशाचा खरा विकास होईल. पुस्तके ही सुद्धा गुरुस्थानी असतात आणि म्हणूनच ‘लेखक तुमच्या भेटीला’ या ज्योती स्टोअर्सवरील संयुक्त उपक्रमांतर्गत ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सुप्रसिद्ध, ज्येष्ठ आठ ते दहा लेखकांना निमंत्रित करून त्यांच्या पुस्तकांवर तसंच साहित्य विश्वावर चर्चा घडवल्या जातात. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, संगीत, उद्योग, पर्यटन, ललित, कला, सामाजिक कार्य, इतिहास अशा सर्वच विषयांवरच्या लेखकांना यामध्ये आवर्जून आमंत्रित केले जाते. यात दीपक करंजीकर, श्रीनिवास प्रभू देसाई, प्राजक्ता देशमुख, दत्ता पाटील, योजना शिवानंद अशा विविध क्षेत्रांत लिखाण करणाऱ्या अनेकांना ऐकायची संधी नाशिककरांना मिळत आहे. आजकालच्या तरुणांना हिंदू धर्म, त्यातील तत्त्वज्ञान याची फारच कमी माहिती असते. पठण, पूजा कार्य करणारे आज फारच थोडे समाजात दिसून येतात. त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देता यावे, यासाठी पूजा प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. या प्रशिक्षण वर्गाचे अभ्यासक्रमास करवीर पीठ शंकराचार्यांनी मान्यता दिली आहे. तसंच या प्रशिक्षणाकरिता सहाय्य केले आहे. राज्यातील गिरीजन-आदिवासी, मागासवर्गीय वस्त्या खेड्या-पाड्यांतील तरुणांसाठी १४ दिवसांचा निवासी अभ्यासक्रमही इथे आयोजित केला जातो. गेल्या आठ वर्षांत विविध जाती-जमातीतल्या एकूण चारशे तरुणांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले आहे. गरीब घरातील विद्यार्थ्यांसाठी इथे हॉस्टेलची सोयही उपलब्ध करून दिली आहे.
जनकल्याण समितीच्या वतीने नाशिकमध्ये सुरू असलेल्या श्री गुरुजी रुग्णालयामध्ये डायलिसिसच्या रुग्णांना व अन्य सवलत योजनेचा लाभ न मिळू शकणाऱ्या रुग्णांस मदत व्हावी, यासाठी वार्षिक ठरावीक रकमेचा विनियोग केला जातो. कामगार वर्गातील मुलींच्या सोयीसाठी सिडकोमध्ये सावित्रीबाई फुले अभ्यासिका स्थापन करण्यात आली आहे. धर्म-तत्त्वज्ञान-संस्कृत व संस्कृतीमधील पायाभूत अभ्यासासाठी निवडक हुशार पात्र व संशोधन आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचाही न्यासाचा मानस आहे आणि त्यादृष्टीने या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा समावेश असलेल्या शिक्षण परिषदेचीही जून २०२३ मध्ये स्थापना करण्यात आली आहे. अशा रितीने नाशिकमधील सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील एक नामांकित, दर्जेदार संस्था म्हणून गेली ६५ वर्षे शंकराचार्य न्यास कार्य करीत असून दरवर्षी कार्याचा चढता आलेख दर्शवत आहे.