वैजयंती कुलकर्णी-आपटे
गेल्या काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध भागांत महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या प्रकरणांत, महिलांवर अत्याचार करून त्यांना ठार मारण्यात येत आहेच, मात्र त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट ज्या क्रूर पद्धतीने लावली जात आहे, ते अतिशय किळसवणे आणि घृणास्पद तर आहेच, पण मन विषण्ण करणारे आहे. एव्हढे क्रौर्य येते कुठून? असा प्रश्न पडतो. ज्या स्त्रीवर प्रेम केले, तिची हत्या आणि तिच्या मृतदेहाची इतक्या घाणेरड्या पद्धतीने विल्हेवाट लावणे ही क्रौर्याची परिसीमा आहे. एकूणच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खरे तर, गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या देशात महिलांवर अत्याचार होतच आहेत. या घटना कधी प्रकाशात येतात, तर कधी येत नाहीत. पण वसईतील श्रद्धा वालकर या मुलीची आफताब पूनावाला या मुस्लीम इसमाने दिल्लीत नेऊन निर्घृण हत्या केली आणि तिच्या पार्थिवाचे ३५ तुकडे करून ते घरातल्याच फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज थोडे थोडे तुकडे बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट तो लावत होता. आपल्याला हे ऐकूनच अंगावर काटा येतो. मात्र श्रद्धा त्याच्या प्रेमात वेडी झाली होती, त्याच्यावर अंध विश्वास ठेवून, आई-वडिलांच्या मनाविरुद्ध आफताबबरोबर ‘लीव्ह इन रेलेशिनशिप’मध्ये राहत होती. मात्र दिल्लीला नेऊन हा अफताब हिची अशी हत्या करेल, अशी तिला पुसटशी कल्पनाही नव्हती. अशी लव्ह जिहादची अनेक प्रकरणे त्यानंतर बाहेर आली. एकीकडे आपल्या देशातल्या महिला प्रगतीची उंच शिखरे गाठत आहेत. सैन्यात उच्च पदावर काम करत आहेत, विमानात पायलट, रेल्वे ड्रायव्हर, आता एसटी ड्रायव्हर, इस्रोमध्ये संशोधक. मात्र दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराचे विदारक चित्र, असा विरोधाभास सध्या दिसतो आहे.
नुकतीच मीरा रोड येथे अशाच प्रकारची घटना घडली. मनोज साने या ५६ वर्षांच्या इसमाने सरस्वती वैद्य या ३६ वर्षांच्या, त्याच्या लीव्ह इन पार्टनरची हत्या केली आणि अतिशय निर्घृण पद्धतीने तिच्या प्रेताची विल्हेवाट लावली. त्यानेही अतिशय किळसवाणा प्रकार केला. तिच्या मृत शरीराचे ३५ तुकडे केले, ते कुकरमध्ये शिजवले, नंतर मिक्सरमध्ये बारीक केले आणि फ्रीजमध्ये ठेवले. काही तुकडे संडासात टाकले. काही कुत्र्यांना खायला घातले. अशा पुरुषांची मानसिकता काय असते, ही खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीतही अशीच घटना घडली. साक्षी नावाच्या तरुणीला साहिल खान या तरुणाने भर रस्त्यात भोसकून ठार मारले. त्याने तिच्यावर २४ वेळा चाकूने वार केला आणि हे कमी होते की काय म्हणून नंतर एक मोठा दगड घेऊन तिच्या डोक्यात मारला. ही सर्व घटना त्या रस्त्यावरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळेच ती उघडकीस आली. पोलिसांनी साहिल खानला अटक केली. पण तो जेव्हा साक्षीला भोसकत होता, तेव्हा समोर बघ्यांची गर्दी झाली होती. मात्र एकाही व्यक्तीला असे वाटले नाही की, त्याला थांबवून साक्षीचे प्राण वाचवावे. त्यामुळे अशा लोकांची मानसिकता तरी काय असते, असाही प्रश्न पडतो. काही दिवसांपूर्वी ट्यूनिशा शर्मा नावाच्या हिन्दी मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीने सेटवरच गळफास लावून आत्महत्या केली. झिशान खान नावाच्या कलाकाराच्या प्रेमात ती पडली. तेही दोघे लीव्ह इन रेलेशनशिपमध्ये होते. मात्र त्याचे मन भरल्यावर त्याने तिला सोडून दिले आणि त्याचे दुसऱ्या मुलीबरोबर प्रेम प्रकरण सुरू झाले. त्याचा धसका घेऊन ट्यूनिशाने आत्महत्या केली. ही केस अजून कोर्टात प्रलंबित आहे. अलीकडेच मुंबईतील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलीवर अत्याचार होऊन तिची हत्या झाली.
या प्रकरणाचाही तपास चालू आहे. अनेक मुली शिक्षणासाठी किंवा नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या घरापासून लांब मुंबईत राहतात. अनेकजणी अशा वसतिगृहात राहतात. मात्र अशी शासकीय वसतिगृहेही त्यांच्यासाठी सुरक्षित नाहीत, हेच दिसून येते. आपल्या समाजात अजूनही लीव्ह इन रेलेशनशिपला मान्यता नाही. अशा संबंधांना कायद्याचेही संरक्षण नाही. त्यामुळे लीव्ह इनमध्ये जर संबंध बिघडले तर एकट्या महिलेला त्रास होतो. तिला कुठलेच कायदेशीर आणि सामाजिक संरक्षण नसते. संबंध बिघडल्यावर एक तर अशा हत्या होतात, किंवा मुलींना आत्महत्येला प्रवृत्त केले जाते. सध्या मुली या उच्चशिक्षित असतात, आपला जीवनसाथी निवडण्याचा त्यांना अधिकार असतो आणि अशा अनेक मुलींचा आणि मुलांचाही आजकाल लग्न संस्थेवर विश्वास नाही. मात्र अलीकडच्या काळात अशी लव्ह जिहादची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. बहुतेक प्रकरणात हिदू मुली आणि मुस्लीम पुरुष असेच जोडपे असते. यामध्ये त्या मुलीवर अत्याचार झाले, तिची फसवणूक झाली किंवा तिची हत्या झाली तरी या विषयावर महिला संघटना गप्पच आहेत. श्रद्धा वालकर या मराठमोळ्या वसईकर मुलीची आफताब पूनावाला याने हत्या केली. त्यावेळीही एकही महिला संघटना, महिला नेत्या किंवा स्त्री मुक्तीची कास धरणाऱ्या महिला नेत्या आणि संघटना गप्पच होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. मात्र या मराठमोळ्या मुलीच्या हत्येसंदर्भात न त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली, ना कुठली कारवाई केली. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका मुलीवर अत्याचार झाले, तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी तातडीने हातरसला भेट दिली होती. मात्र श्रद्धा वालकर हत्येच्या वेळी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण हत्यारा मुस्लीम आहे म्हणून. निदान अशा प्रकरणात तरी धर्म मध्ये आणू नये. मुस्लिमांचे लांगूलचालन करू नये आणि अत्याचारित, पीडित महिलेला न्याय मिळावा, एव्हढीच अपेक्षा आहे.