घन घन माला नभी दाटल्या
कोसळती धारा…
आभाळाचा शॉवर ऑन झालाय आणि त्यात आपण सर्व मनसोक्त भिजण्यास तयार झालो आहोत. यावेळी पावसाचं आगमन जरा उशिराच झालंय. तरीही तो आल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटलंय. मनं उल्हसित झाली आहेत.
प्रखर उन्हाच्या झळा सोसून उष्णतेचे चटके घेत घेत घामाच्या धारा वाहत असताना माणूस एकटक आभाळाकडे डोळे लावून पावसाच्या धारांची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो आणि तसाही प्रत्येक सजीव-निर्जीव घटक या वर्षा ऋतूचीच आतुरतेने वाट पाहत असतो.
गदिमांनी केलेलं वर्णन आठवतं –
माऊलीच्या दुधापरी
आले मृगाचे तुषार…
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार……
तापलेली, तृषार्त धरती पहिल्या पावसाच्या थेंबांनी सुगंधित होते. तिचा मत्त गंध सर्वत्र दरवळू लागतो. पावसांच्या सरींसोबत मनातही नवचैतन्याचा वर्षाव होतो. पहिल्या पावसात भिजणारी लहान मुलं, त्यांचा तो नाच पाहून वाटतं, त्या मुलांसोबत पानं, फुलं, वेली, रस्ते, दगड, माती, सारेच चिंब होऊन नाचतायत. पावसाच्या सरींचं गाणं त्यात सामील होतं. त्यांना साथ देत मग सर्वजण ताल धरतात. धमाल करतात.
पण हा पाऊस कधीकधी आपल्याला अंतर्मुखही बनवतो. पावसाची रूपं आणि माणसाचा जीवनक्रम यात मला खूप साधर्म्य जाणवतं. बघा ना, आपलं बालपण कसं छान, निरागस, लोभसवाणं असतं. बाळ जसं हळूहळू रांगतं, त्याप्रमाणे पाऊसही थेंबा-थेंबांनी जणू रांगत आपल्याकडे येतो. जसं बाळ मोठं होऊ लागतं, तसाच पाऊसही जोरदार हवेसोबत आपला आवेग वाढवतो. तारुण्यात माणसाचा उत्साह उच्च कोटीला असतो. त्याचप्रमाणे पाऊस ढगांच्या गडगटासह, विजांच्या लखलखाटासह धुवांधार बरसत असतो. तारुण्याच्या ऐन उंबरठ्यावर असताना जसं आपण गुलाबी रंगात न्हाऊन निघतो, तसाच पाऊसही हलके- हलके, रिमझिम-रिमझिम प्रेमधारांनी वर्षाव करू लागतो. माणूस पोक्त होऊ लागतो, बरे-वाईट अनुभव घेऊन स्थिर होतो. शांत होतो. त्याचप्रमाणे पाऊसही धुवांधार बरसून झाल्यावर शांत होतो. स्थिर होतो. असं हे पावसाचं आणि माणसाचं नातं किंवा रूप सर्वच स्तरांवर एकसारखं जाणवतं.
पाऊस कधी सुखद रिमझिम धारा, तर कधी भीषण वादळं घेऊन येतो. माणसाच्या आयुष्यातही सुखदुःखही पावसाच्या सरींप्रमाणे येतात आणि जातात. माणसाचं आयुष्य असंच पावसाच्या वेगासारखं आहे.
पाऊस म्हणजे नवनिर्मितीची चाहूल. माणूसही आयुष्यात बऱ्याच सर्जनशील गोष्टींचा नव्याने वेध घेतो. चुकतो-धडपडतो, पुन्हा उठतो-सुधारतो. हे चक्र आयुष्यभर चालूच राहातं. पावसाचंही तसंच. पाऊस येतो आणि जातो. पुन्हा त्याच वेळेप्रमाणे येतो आणि आसमंत बहरून टाकतो. चराचर सृष्टीला हिरवा साज चढवतो. आपण म्हणतो ना की, ‘नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा!’
चला तर मग, आपल्या मनमोराचा पिसारा फुलवलेल्या या पावसाचा आपणही पुरेपूर आनंद घेऊ या आणि त्याच्याप्रमाणेच सर्वत्र आनंदाची बरसात करू या!
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…