Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीMaharashtra : महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार

Maharashtra : महाराष्ट्राला ३ राष्ट्रीय जल पुरस्कार

साताऱ्यातील मलकापूर, जालन्यातील कडेगाव यासह भारतीय जैन संघटनेस पुरस्कार

नवी दिल्ली : पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते आज चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्काराने गौरविण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने आज चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि विश्वेश्वर टुडू, तसेच केंद्रीय सचिव पंकज कुमार उपस्थित होते.

उत्कृष्ट ग्राम पंचायत पुरस्कार या श्रेणीमध्ये जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्राम पंचायतीला तिसरा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सरपंच दत्तु निबांळकर, माजी सरपंच भीमराव जाधव आणि खरपूडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ एस.व्ही. सोनुने यांनी स्वीकारला. हा पुरस्कार मेघालय राज्यातील री भोई जिल्हा येथील मावकिर्देप या ग्राम पंचायती सोबत विभागून मिळालेला आहे.

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील मलकापूर या नगर परिषदेस उत्कृष्ट नागरी स्थान‍िक संस्था या श्रेणीत तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आज केंद्रीय मंत्री श्री शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नगराध्यक्ष निलम येडगे आणि उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा जलनिस्सारण व आरोग्य सभापती मनोहर शिंदे यांनी स्वीकारला. हा पुरस्कार सुरत महानगर पालिकेसह विभागून देण्यात आला.

तर स्वयंसेवी सामाजिक संस्था या श्रेणीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पुणे येथील ‘भारतीय जैन संघटनेस’ (बीजेएस) तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री शेखावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे प्रमुख शांतीलाल मुथा आणि सहायक संचालक स्वप्ना पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -