मुंबई : मुंबई खड्डे मुक्त व्हावी यासाठी सिमेंट काँक्रीटचे ४०० किलोमीटरचे रस्ते करण्याचे कामे हाती घेण्यात आले आहे. शहरातील एकूण ९१२ रस्ते सिमेंट क्रॉंक्रीटचे होणार असून सध्या ८६ रस्त्यांची कामे सुरु आहेत तर ३९ सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्ते बांधून पूर्ण झाले आहेत. तर उर्वरित सिमेंट क्रॉंक्रीटच्या रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर सुरु होतील, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली. तसेच सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांवर ३ वर्षांत खड्डे पडल्यास त्याला ठेकेदार जबाबदार असेल, असा इशारा सुद्धा पी वेलरासू यांनी दिला आहे.
मुंबईतील ४०० किलोमीटरचे रस्ते सिमेंट क्रॉंक्रीटचे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांना दिले होते. चहल यांनी पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील आणि संपूर्ण रस्ते सिमेंट काँक्रिटचे असतील, अशी ग्वाही दिली आहे. मुंबईत सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्यासाठी पाच ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकूण ९१२ रस्त्यांची कामे होणार असून आतापर्यंत ३९ कामे पूर्ण झाली आहेत. मात्र पावसाळ्यात सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्त्याचे काम करणे शक्य नसल्याने ऑक्टोबरपासून पुन्हा सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्ते करण्यास सुरुवात होईल, असेही वेलरासू यांनी सांगितले. सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असणार आहे, असेही ते म्हणाले. १० वर्षे हमी कालावधीत रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी ठेकेदारांची असेल.