Saturday, December 14, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखMy BMC : उघडे मॅनहोल्स, मृत्यूचे सापळे

My BMC : उघडे मॅनहोल्स, मृत्यूचे सापळे

नेमेची येतो पावसाळा, या उक्तीप्रमाणे काही काही प्रश्न कित्येक दिवस अनुत्तरित राहतात किंवा अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या त्या समस्या सोडविल्या जात नाहीत आणि नेमका पावसाळा तोंडावर आला की, त्यांची चर्चा सुरू होते. त्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित (My BMC) विभागाकडून, प्रशासनाकडून आदेशही निघतात. कामही सुरू झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात. कालांतराने त्या समस्यांचे कायमचे निरसन होण्याच्या दृष्टीने काय झाले, कोणते उपाय योजण्यात आले, याचा आढावा घेतला जात नाही किंवा सोयीस्करपणे त्या गोष्टी मागे पडतात… त्यांचे विस्मरण होते. त्यानंतर परत वेळ आल्यावर सर्वांना त्याची आठवण होते आणि पुन्हा तो मूळ प्रश्न आ वासून उभा राहतो. त्याबाबत नव्याने आदेश निघतात… आणि हे चक्र पुन्हा सुरू राहते. पावसाळा आला की जसा नालेसफाईचा प्रश्न उभा राहतो, तसा आता उघड्या मॅनहोल्सचा मुद्दाही चर्चिला जाऊ लागला आहे. या मुद्द्याचे गांभीर्यच संबंधितांना कळलेले नाही किंवा कळले तरी त्यात दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने काही ठोस पावले उचलली गेलीत असे झालेले नाही. पावसाळ्यात उघडे मॅनहोल ही समस्याच किती गंभीर आहे हे सहा वर्षांपूर्वी डॉ. दीपक अमरापूरकर या तज्ज्ञ ज्येष्ठ डाॅक्टरांचा बळी गेल्याच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर पालिकेने सर्व मॅनहोलसाठी सुरक्षित पावले उचलली आणि पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने मॅनहोलना सुरक्षित जाळ्या बसविण्यास सुरुवात झाली.

पावसाळ्याच्या दिवसांत उघडे मॅनहोल हे मृत्यूचे सापळे ठरून नागरिकांचे जीव धोक्यात येऊ शकतात, अशी परिस्थिती असताना आणि कुठेही मॅनहोल उघडे राहता कामा नयेत याची काळजी यंत्रणांनी घेणे गरजेचे आहे. पण पालिकेतर्फे केवळ पूरसदृश भागांतील मॅनहोलनाच संरक्षक जाळी बसविण्यात आल्याचे उघड झाल्याने उच्च न्यायालयाने सर्व मॅनहोल्सना जाळ्या का नाहीत, असा जाब महापालिकेला विचारला आहे. तसेच याबाबतचा नियोजन आराखडा सोमवारी सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. मुंबईत एकूण ७४ हजार ६८२ मॅनहोल्सपैकी पूरसदृश भागांतील अवघ्या एक हजार ९०८ मॅनहोल्सना संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्याची माहिती पालिकेने दिल्यानंतर न्यायालयाने हा जाब विचारला आहे. खराब रस्ते, उघडे मॅनहोलच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने यापूर्वी स्वत:हून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेत अनेक आदेश दिलेले आहेत. तरीही आदेशांचे पालन झालेले दिसत नाही. उघड्या मॅनहोलमध्ये पडून नागरिक गंभीर जखमी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयातील वकील अॅड. रुजू ठक्कर यांनी अवमान याचिका दाखल केली आहे. त्यातच वांद्रे परिसरात चार मॅनहोल उघडे असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाल्याने त्या आधारे न्यायालयाने पालिकेला खडसावले आहे. मॅनहोल्सवरील झाकणे चोरीला गेल्यास किंवा त्यांचे नुकसान झाल्यास प्रशासनाला त्याबाबत तत्काळ माहिती कळावी यादृष्टीने मॅनहोल्सचे जीओ-टॅगिंग करण्याचा विचार सुरू असल्याचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी न्यायालयास सांगितले. मुंबईतील सर्वच मॅनहोल्सना संरक्षक जाळी का बसविण्यात आलेली नाही नाहीत असा जाब न्यायालयाने पालिकेला विचारला. एकही नागरिक किंवा प्राणी उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यादृष्टीने सर्वच मॅनहोल्सना जाळी बसवायला हवीत.

उच्च न्यायालयाने या प्रश्नावर २०१८ मध्ये आदेश दिले होते. आता पाच वर्षे झाली तरीही अवघे दहा टक्के मॅनहोल संरक्षित करण्यात आले आहेत. ही गंभीर बाब आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मॅनहोल संदर्भात केलेल्या आणि करण्यात येणाऱ्या व विविध उपाययोजनांबाबत उच्च न्यायालयानेही पालिकेला निर्देश दिले होते. पावसाळ्यात कोणतेही मॅनहोल उघडे राहू नयेत व दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र वारंवार सूचना देऊनही मुंबईत काही ठिकाणी मॅनहोल उघडी असतात ही गंभीर बाब आहे. मुंबईत पावसाळा काही दिवसांत सुरू होईत. मात्र अजूनही अनेक ठिकाणी मॅनहोल उघडे असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मुंबईतील उघडी मॅनहोल येत्या १९ जून पूर्वी बंद करावीत, कोणतेही मॅनहोल उघडे राहणार नाहीत, याची खबरदारी घ्या असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरवर्षी पावसापूर्वी उघड्या किंवा असुरिक्षत मॅनहोल दुरुस्त करून जाळ्या बसवल्या जातात. मुंबईत एक लाखांवर मॅनहोल आहेत. यात पर्जन्य वाहिनी विभागाच्या अखत्यारीत २५ हजार ६००, तर मलनिस्सारण विभागाच्या अखत्यारीत ७४, ६८२ मॅनहोल आहेत. मलनिस्सारण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ७४ हजार मॅनहोलपैकी फ्लडिंग पाईट्स जवळ असलेल्या १९०० मॅनहोलवर तर शहरातील २५ हजार पर्जन्य वाहिनी असलेल्या तीन हजार अशा सुमारे पाच हजार मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे उर्वरित असुरक्षित असलेल्या मॅनहोलवर अजूनही सुरक्षित जाळ्या बसविलेल्या नाहीत. पाऊस सुरू झाला असतानाही अनेक मॅनहोल उघडी असल्याचे समोर आले आहे. पालिका आयुक्तांच्या निर्देशानंतर मॅनहोल बंद करण्याच्या कामासाठी आता संबंधित अधिकाऱ्यांची आता धावपळ उडाली आहे. ही बाब गंभीर असून याप्रश्नी युद्धपातळीवर उपाययोजना करून हा प्रश्न कायमचा निकाली काढणे ही काळाची गरज बनली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -