Shahid Afridi : आफ्रिदीचा पीसीबीला (PCB) सवाल
कराची : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यास तयार नसल्याचे समजते. त्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) पीसीबीच्या या वृत्तीवर टीका केली आहे. “ते अहमदाबादमध्ये खेळण्यास का नकार देत आहेत? ती खेळपट्टी आग ओकते की झपाटलेली आहे?
पुढे आफ्रिदी म्हणाला की, “जा, खेळा आणि जिंका. जर काही पूर्वनियोजित आव्हाने असतील तर त्यावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जिंकणे. दिवसअखेरीस पाकिस्तान संघ जिंकला हे महत्त्वाचे आहे. सकारात्मक पद्धतीने घ्या. तुम्ही जा, खचाखच भरलेल्या भारतीय प्रेक्षकांसमोर जिंका आणि तुम्ही काय साध्य केले ते त्यांना सांगितले पाहिजे, असे आफ्रिदी म्हणाला.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात आयोजित होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरू होण्यास तीन महिन्यांहून अधिक कालावधी शिल्लक आहे, परंतु स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, वेळापत्रकाला उशीर होण्यामागे एक प्रमुख कारण समोर आले आहे.
पीसीबी अजूनही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध साखळी सामना खेळण्यास तयार नाही. हे वेळापत्रकाच्या घोषणेला उशीर होण्याचे मुख्य कारण असल्याचे मानले जाते.