Saturday, March 15, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखLoksabha Election 2024 : भाजपने मराठवाड्यातून फुंकले रणशिंग

Loksabha Election 2024 : भाजपने मराठवाड्यातून फुंकले रणशिंग

मराठवाडा वार्तापत्र : अभयकुमार दांडगे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगमान्य नेतृत्व म्हणून पुढे आलेले आहेत. पंतप्रधानपदाच्या नऊ वर्षांच्या कालावधीत त्यांनी असंख्य जनसामान्यांची व विकासाची कामे केलेली आहेत. काँग्रेसची भारतात ६५ वर्षे सत्ता होती. काँग्रेसचा कालखंड व भाजपचा कालखंड पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळातील निर्णय सुवर्णअक्षरात लिहिण्याजोगे आहेत. सेवा, सुशासन व गरिबांचे कल्याण या त्रिसूत्री धोरणांचा अवलंब करत भाजपने आपले ध्येय केवळ विकास हेच आहे, हे या कालावधीत दाखवून दिले. भाजपने नऊ वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी महा जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरुवात मराठवाड्यातील नांदेड येथून करण्यात आली. हे केवळ जनसंपर्क अभियान नसून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग भाजपने यानिमित्ताने फुंकले आहे. भाजपने जनतेसमोर येऊन केलेल्या कामांच्या आधारे निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. मराठवाडा हा एकेकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला होता; परंतु आता मराठवाड्यात तशी परिस्थिती राहिलेली नाही. भाजपला मराठवाड्यातून लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळाव्यात या उद्देशाने मराठवाड्यातून भाजपने निवडणुकीची तयारी सुरू
केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नुकतेच महाराष्ट्रात आले होते. महाराष्ट्रात भाजपच्या वतीने २५ ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येणार आहेत. त्या जाहीर सभांचा शुभारंभ नांदेडात शनिवारी करण्यात आला. भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत, कराड भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह भाजपचे खासदार, आमदार व सर्व पदाधिकारी यानिमित्ताने मराठवाड्यात आले होते. मराठवाड्यातील नांदेडमध्ये झालेल्या प्रचंड जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सरकारची कामगिरी जनतेसमोर मांडली. महाराष्ट्रातून लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू असल्याचे नांदेडमधील सभेतून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या चार पिढीने देशावर अनेक वर्षे राज्य केले. काँग्रेसचे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांनी गरिबांसाठी काय केले? असा सवाल भाजपच्या महा जनसंपर्क अभियानातून उपस्थित करत येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सोनिया गांधी यांच्या काळात मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा पाकिस्तानमधून दहशतवादी खुलेआम भारतात शिरत होते. काश्मीरमध्ये कधीही गोळीबार व्हायचा. कोणाचा जीव कधी जाईल, याचा काही नेम नव्हता; परंतु भाजपच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सर्जिकल स्ट्राइक करून पाकच्या हद्दीत घुसून भारतीय जवानांनी त्यांना उत्तर दिले. हे काम फक्त मोदीजीच करू शकतात, असा पुनरुच्चार यावेळी भाजपच्या नेत्यांनी भाषणातून केला. देशातील ८० कोटी गोरगरीब नागरिकांसाठी भाजपने वीज, पाणी, शौचालय, गॅस सिलिंडर, मोफत धान्य, जलयुक्त शिवार, तरुणांना रोजगार, महिला व उद्योजकांना कर्ज यांसह विविध कल्याणकारी योजनांच्या आधारावर भाजपने पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी मत मागायला सुरुवात केली आहे. निवडणूक आणि प्रचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येक पक्ष सत्तेवर येण्यासाठी धडपड करीत असतो. मतदारही पक्षासोबतच आजवर झालेली विकासकामे तसेच पक्षाचे नेतृत्व करणारे राजकारणी पाहून मतदान करीत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षभरात तसेच तत्पूर्वी राजकीय उलथापालथ लक्षात घेऊन कोणाला मतदान करायचे, याची मनधरणी मनोमन झालेली आहे. मराठवाड्यातील मतदारही आता सजग झाला आहे. राजकारणी लोकांची पूर्वीची भाषणे व सध्याच्या काळात झालेला विकास, या दोन्ही बाबी नक्कीच मतदार लक्षात घेतील. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विकासालाच मतदान करतील, असा विश्वास सर्वच राजकीय पक्षांना आहे. असे असले तरी मराठवाड्यातून यावेळेस भाजपला चांगली साथ मिळेल, असा अंदाज राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला ३० मे २०२३ रोजी नऊ वर्षे पूर्ण झाली. २०१४ मध्ये जगात भारत देशाचा क्रमांक अर्थव्यवस्थेच्या बाबतीत दहाव्या नंबरवर होता; परंतु आता भारत पाचव्या नंबरवर आहे. हा मुद्दा देखील निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलेला आहे. कोविड काळात अमेरिकेत जी व्हॅक्सिन नागरिकांना दिली जायची त्याच व्हॅक्सिनची किंमत ३००० रुपये होती. तीच व्हॅक्सिन भारतात कोट्यवधी नागरिकांना मोफत देण्यात आली. भारतातील जनतेला जवळपास २२० कोटी डोस मोफत देण्यात आले, ही भाजपची कोविड काळातील फलनिष्पत्ती होय. भारतात सात नवीन आय.आय.एम. इन्स्टिट्यूट, ३९० विद्यापीठे, सातशे वैद्यकीय महाविद्यालये, ५४ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग तसेच वीस शहरात मेट्रो रेल्वे, १७ नवीन वंदे भारत रेल्वे, ७४ नवीन विमानतळ बनविणाऱ्या भाजपला पुन्हा एकदा सत्तेवर बसविण्याचे आवाहन देशभर राबविण्यात येत असलेल्या अभियानातून करण्यात येत आहे. या सर्व विकासकामांचा परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नक्कीच दिसून येणार आहे. यंदा मराठवाड्यातून लोकसभेवर भाजपचे सर्वाधिक उमेदवार जातील, असे राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे स्पष्ट मत आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -