
आज 'शासन आपल्या दारी'साठीचा फडणवीसांचा कोल्हापूर दौरा रद्द
मुंबई : आज शिवसेनेकडून प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची जाहिरातबाजी करण्यात आली. यामुळे शिवसेना-भाजपा युतीत काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र आज राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी शिवसैनिकांसोबत स्पष्ट चर्चा केली. 'युतीत या गोष्टी होत राहतात, त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'आपण युतीमध्ये आहोत, त्यामुळे या गोष्टी होतच राहतात. काळजी करु नका, एकत्र काम करत राहूयात', असा सल्ला फडणवीसांनी शिवसैनिकांना दिला. तसेच युतीत खडा पडेल असं कुणीही काहीही बोलू नये, असा कानमंत्र त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला आहे.
विजय टिकवणं ही आमची जबाबदारी : उदय सामंत
देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी गेल्या ११ महिन्यांत सांघिकपणे महाराष्ट्रात जे काम केलं त्याची महाराष्ट्राने नोंद घेतली आहे. सर्वेक्षण झालं याचा अर्थ आमची जबाबदारी वाढली आहे, विजय टिकवणं ही आमची जबाबदारी आहे, असं मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं.
देवेंद्र फडणवीस कोल्हापूरला जाऊ शकणार नाहीत
आज कोल्हापूर येथे होणा-या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. मात्र त्यांना कानाचा त्रास सुरु झाल्याने त्यांनी दौरा रद्द केला आहे. सायनसचा त्रास बळावल्याने देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवस विमान प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे फडणवीस आज कोल्हापूरला जाणार नाहीत, अशी माहिती दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना दिली. त्यांच्याऐवजी आता चंद्रकांत पाटील कोल्हापूरला रवाना होणार आहेत.