-
सेवाव्रती: शिबानी जोशी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते तळागाळातल्या, वंचित, दुर्गम भागातील लोकांसाठी काम करत असतातच; परंतु अचानक उद्भवलेल्या आपत्तीच्या काळातही स्वयंस्फूर्तीने धावून जात असतात. १९९३ साली लातूरमध्ये भीषण भूकंप झाला. अनेक घरं आणि कुटुंब विस्थापित झाली. लातूरला जनकल्याण समितीचे अनेक कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांनी मदत व पुनर्वसनाचे काम सुरू केले. त्यातूनच जनकल्याण निवासी विद्यालय सुरू झाले. या शाळेचा जन्मच भूकंप आपत्ती संबंधित सामाजिक सहसंवेदनेतून व सामाजिक दायित्व जाणिवेतून झालाय. त्यामुळे पीडितांच्या कुटुंबांना मदत हा उद्देश ठेवून अनेक पुनर्वसनाची कामे हाती घेतली गेली. शिक्षण हे सेवेचे व शाश्वत समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम असल्याने शैक्षणिक कार्य प्राथमिकता देऊन संस्थेने हाती घेतले. भूकंपात हजारो कुटुंबांची घरं कोलमडून पडली होती. कुटुंबातील कर्त्या पुरुषासह अनेकांचे निधन झाले होते. घरातील तरुण मुले-मुली दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आटापिटा करत होती. त्यांच्या भविष्याचा विचार करून निवासी शाळा सुरू करावी, असे योजले गेले. सुरुवातीला छोट्या जागेत आणि ३५० मुलांना घेऊन शाळा सुरू झाली. आणखी एक काही गरजू मुलांना शाळेची गरज आहे हे लक्षात घेतल्यावर शाळेचा विस्तार करण्यासाठी ठरले आणि संघ कार्यकर्त्यांच्या मेहनतीने मोठे संकुल उभे राहिले.
कोणत्याही संस्थाचालकाचा, व्यक्तीविशेषाचा संस्थेवर प्रभाव नाही. आज शिक्षणक्षेत्रात अर्थार्जन, राजकीय हेतू, वैयक्तिक मान-सन्मान, प्रतिष्ठा, सत्ता, नातेवाईक व स्वज्ञाती बांधवांच्या रोजगाराची व्यवस्था इत्यादी अशैक्षणिक विपरित हेतू संस्थाचालकामध्ये आढळतात. यापैकी कोणत्याही हेतूचा इथे दुरान्वयानेही संबंध नाही. संस्थाचालक कुणीही आजीवन किंवा प्रदीर्घकाळ संस्थाचालक नसतो, सातत्याने व्यवस्थापनातील लोक आवश्यकतेनुसार बदलत असतात. शाळा तर खूप ठिकाणी चालतात. पण या भागात विस्थापित झालेल्या ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण द्यायचं होतं त्यामुळे त्यांना निवासी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं गरजेचं होत. जनकल्याण समितीने या ठिकाणी सहा, सात एकर जमीन घेतली आणि त्यावर निवासी शाळा उभी राहिली. इथे ग्रामीण भागातील गरीब तसेच विस्थापित झालेल्या कुटुंबातील मुलांना प्रवेश दिला. आताही त्यांनाच प्राधान्य दिलं जाते. नेहमीच पुस्तकी शिक्षण दिले जातेच. त्याशिवाय विद्यालयात प्रयोगशीलता, अनौपचारिक व नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती, शुद्ध स्वदेशी व भारतीय शिक्षण संकल्पनेवर आधारित अध्यापन, अध्ययन व मूल्यमापन, प्रात्यक्षिकाद्वारे अनुभवात्मक शिक्षण अशा विशेष शैक्षणिक संकल्पना रुजविण्याचे प्रयत्न होत असतात. संस्थेने दीड एकर जमीन कृषी क्षेत्रासाठी राखून ठेवली असून इथे विद्यार्थ्यांना कृषी प्रशिक्षणही दिले जाते. शासकीय धोरण व नियम-संकेतानुसार शिक्षण देण्यासोबतच प्रयोगशीलतेतून विशेष शिक्षण व संस्काराचे प्रयत्न होत असतात. इथे सर्वच सुमारे ५७५ विद्यार्थी-विद्यार्थिनी पूर्णवेळ निवासी आहेत. सात तासांच्या नियमित शालेय वेळापत्रकाबाहेरच्या संपूर्ण कालावधीतही विद्यार्थी प्रकल्पातच असतात. सकाळी ५ पासून रात्री १० पर्यंत विशिष्ट दिनचर्या प्रचलित केलेली आहे. सर्व काही शिस्तीत तरीही विद्यार्थी प्रसन्नचित्त राहतील अशा दिनचर्येतून विद्यार्थ्यांचे विकसन होत असते. वसतिगृह विभागात प्रत्येक वर्ग तुकडीसाठी पालक पर्यवेक्षक असतात. ते त्या त्या तुकड्यातील प्रत्येक मुलाच्या सर्व समस्यांकडे लक्ष ठेवून असतात. वेगवेगळ्या संस्कारप्रद उपक्रमातून विद्यार्थ्यांचे स्वभाव व वर्तन कसे प्रभावित व परिवर्तित होत राहतात याचे निरीक्षण केले जाते. वर्तनात इच्छित इष्ट परिवर्तन होण्यालाच शिक्षण मानले जाते. पर्यटन सहलींचा महत्त्व लक्षात घेऊन अनेक सहली आयोजित केल्या जातात. नववीच्या वर्गातील शंभर विद्यार्थी दरवर्षी २६ जानेवारी या दिवशी रायगडावर ध्वजारोहण करण्यासाठी पाठवले जातात. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त इथे श्री गणेशाचे भव्य मंदिर, ध्यान मंदिर ही स्थापन करण्यात आले आहे. या ठिकाणी विद्यार्थी पूजा तसेच ध्यान करू शकतात. विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था संत गाडगेबाबा तसेच शालिवाहन या इमारतीत केली जाते. विद्यार्थिनींची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. शेजारीच असलेल्या जिजाऊ नामक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्रंथ हे गुरू असतात, असं आपण मानतो. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून शासकीय अनुदान नसतानाही ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक शिक्षण, संगीत शिक्षण, क्रीडा व शारीरिक शिक्षणातून मानसिक तसेच शारीरिक सबलीकरण याद्वारे सर्वांगीण विकास होणे असे प्रयत्न केले जातात. केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार… असे रामदास स्वामींनी लिहून ठेवले आहे. त्यामुळे विविध सहली, विद्वानांची भाषणं होतात. तसेच सभांचे सूत्रसंचालन, संवाद, भाषणे विद्यार्थ्यांना करायला प्रेरित करून विद्यार्थी घडवले जातात. दरवर्षी शाळेचा वार्षिक उत्सव मोठ्या उच्छाहात तब्बल तीन दिवस चालतो. सर्व विद्यार्थ्यांना यात काही ना काही करण्याची संधी मिळत असते. दरवर्षीच्या लातूरमधल्या गणेशोत्सव विसर्जनांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. आज लातूरच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये शाळेने आपली एक ओळख बनवली आहे. याशिवाय नवरात्रीत शस्त्रपूजन, होळी, भाऊबीज असे सर्व सण साजरे केले जातात. २०१६ पासून शाळेचा दहावीचा निकाल ९० ते १००% लागत आहे. उपेक्षित तसेच विविध जातींच्या विद्यार्थ्यांचा सहनिवास, नित्य सहभोजन असते. यातून स्वाभाविकपणे जातीभेदांचे पूर्णतः विस्मरण होऊन सहज समरसतेचा भाव दृढ होतो. भोजनमंत्र म्हणूनच भोजन करणे, पात्रात कांही टाकून न देणे अशा बारकाव्यांमधूनही विद्यार्थ्यांचे मानस विकसित होत राहते. ‘जे आवडते, ते मिळाले नाही तर जे मिळते ते आवडले पाहिजे’ हा जीवनशिक्षणाचा मंत्र त्यांच्यामध्ये क्रमशः रुजू लागतो. विद्यालयातील क्रमिक शिक्षण नसते; परंतु वसतिगृहात उपक्रम शाळेचे नियोजन केले जाते. याद्वारे त्यांच्यामध्ये हिंदुत्वनिष्ठा म्हणजेच राष्ट्रभक्ती, व्यक्तिमत्त्व विकसन व शैक्षणिक प्रबलीकरणाचे प्रयत्न होतात. प्रकल्पाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त १६ डिसेंबर २०१८ रोजी प्रारंभीपासूनच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. त्यावेळी अनेक उच्चपदावर असलेले विद्यार्थी आवर्जून उपस्थित राहिले होते आणि त्यांच्या जडणघडणीत शाळेचे महत्त्व त्यांनी आवर्जून सांगितले होते. एक ऊसतोड कामगाराचा मुलगा सुदामराव काळे आज न्यायाधीश आहे. अनेक जण व्यवसाय, नोकरीत स्थिरावलेले आहेत. लहान मुलांसमोर मूर्तिमंत प्रत्यक्ष आदर्श उदाहरण ठेवली तर ते अधिक प्रभावित होतात असा अनुभव आहे. त्यामुळे प्रकल्पातील शिक्षक, पर्यवेक्षक, कर्मचाऱ्यांचे वर्तन हे विद्यार्थ्यांसमोर उदाहरण ठरावे यासाठी प्रयत्न केले जातात. पुनरुत्थान विश्वविद्यालय, कर्णावती (अहमदाबाद) यांच्या शुद्ध भारतीय शिक्षण संकल्पनांचा कांही शिक्षक, पर्यवेक्षक अभ्यास करीत आहेत, यावर आधारित काही शैक्षणिक प्रयोग करण्याचा शाळेचा मानस आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक, कार्यकर्ते, संस्थाचालक आणि दाते या सर्वांच्या सहकार्यातूनच शिस्तबद्ध, विश्वसनीय, प्रामाणिकपणे संस्थेचे कार्य अथकपणे सुरू आहे. आता लवकरच नवे शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. त्यासाठी अभ्यास करून शैक्षणिक अनुसंधान केंद्र लवकरच सुरू होईल, यातूनही काही मूलभूत संशोधन व नव-नवीन शैक्षणिक प्रयोग होऊ शकतील असे प्रयोजन आहे. लातूरसारख्या ठिकाणी भूकंपग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सुरू झालेली शाळा आज मुंबई-पुण्यासारख्या दर्जाची आणि सर्वांगीण शिक्षण देणारी निवासी शाळा जनकल्याण निवासी विद्यालयाच्या रूपात उभी आहे.